सांगली दि. 26 (जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यात दि. 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. तसेच दि. 5 सप्टेंबर 2025 रोजी ईद-ए-मिलाद (महमद पैंगबर जयंती) साजरी केली जाणार आहे. गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद च्या अनुषंगाने मिरवणुका, विविध आंदोलने या सर्व बाबीवर पोलीस प्रशासनाचे नियंत्रण राहून कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरीता पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 36 प्रमाणे प्रदान केलेल्या अधिकारान्वये जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना पुढीलप्रमाणे अधिकार प्रदान केले आहेत.
रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे व त्यांची वर्तणूक कशी असावी या विषयी निर्देश देणे, मिरवणुका कोणत्या मार्गाने व कोणत्या वेळात काढू नयेत असे मार्ग, अशा वेळा विहीत करणे, सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी उपासनेच्या सर्व जागेच्या आसपास, उपासनेच्यावेळी कोणत्याही रस्त्यावरून किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होवू न देणे, सर्व रस्त्यावर किंवा रस्त्यांमध्ये, घाटात, किंवा घाटावर किंवा सर्व धक्क्यांवर व धक्क्यांमागे आणि सार्वजनिक स्नानाच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागांमध्ये जत्रा, देवळे, आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणे, कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ किंवा सार्वजनिक जागेत, किंवा सार्वजनिक जागेजवळ वाद्ये वाजविण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, कोणत्याही सार्वजनिक जागी किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक उपहाराच्या जागेत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, सक्षम प्राधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 33. 35, 37 ते 40, 43, 45 अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाचे अधिन असलेल्या व त्यास पुष्ठी देणारे योग्य ते आदेश काढणे, असे अधिकार जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रदान केले आहेत.
हा आदेश दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजीचे 00.01 वाजल्यापूसन ते दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील. या दरम्यान संबंधित पोलीस ठाणे स्थलसिमा हद्दीत कोणालाही मोर्चे, मिरवणुका, निदर्शने, सभा इत्यादी आयोजित करावयाचे असल्यास त्यांनी संबंधित पोलीस ठाणे अधिकारी किंवा त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून वेळ, मार्ग, घोषणा, सभेचे ठिकाण, जनसमुदाय इत्यादी बाबी ठरवून घेवून परवानगी घेतली पाहिजे. या आदेशाचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 134 प्रमाणे कारवाईस पात्र राहील, असे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जारी केले आहेत.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰