सांगली, दि. 13, (जि. मा. का.) : निरनिराळी सार्वजनिक कार्ये, उत्सव (गणेशोत्सव, दुर्गाउत्सव) साजरे करण्यासाठी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात नोंदणीकृत नसलेले मंडळ, संस्था, उत्सव कमिट्या जनतेकडून वर्गणी, देणगी रुपाने मदत गोळा करीत असतात. सार्वजनिक कार्य, उत्सव करणाऱ्या संस्था, मंडळे, उत्सव समित्या यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 चे कलम 41 (क) अन्वये धर्मादाय उप आयुक्त, सांगली विभाग, सांगली सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, सांगली यांना वर्गणी गोळा करीत आहोत किंवा करणार याबद्दल विहीत नमुन्यात कळविणे बंधनकारक आहे. त्याप्रमाणे न कळविल्यास अधिनियमाच्या कलम 67 अन्वये गुन्हा ठरतो, असे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय सांगली धर्मादाय उप आयुक्त डॉ. मनिष पवार यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
कलम 41 (क) अन्वये ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज भरण्यासंबंधी माहिती संकेतस्थळावरील प्रणाली मार्गदर्शनमध्ये उपलब्ध आहे. अर्ज भरण्यासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक राहतील. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार व इतर सदस्यांचे ओळखपत्र (आधारकार्ड व पॅन कार्ड/ निवडणूक कार्ड/ वाहन चालक परवाना), मागील वर्षाचे हिशोब आणि या वर्षाचे हिशोब आणि या वर्षाचे अंदाजपत्रक (उत्सवाचा खर्च रु. 5000/- पेक्षा जास्त असल्यास सनदी लेखापालांकडून तयार करुन घ्यावेत.), कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या परवानगीची प्रत (मागील वर्षी परवानगी घेतली असल्यास), या वर्षापासून नव्याने कार्य / उत्सव साजरे करीत असल्यास नगरपालिका हद्दीतील मंडळांनी त्यांच्या भागातील नगरसेवकांचे (प्रथम वर्ष उत्सव साजरा करीत असलेबाबतचे) शिफारसपत्र व ग्रामीण भागातील असल्यास संबंधित ग्रामपंचायतीचे शिफारसपत्र आवश्यक आहे, याची नोंद घ्यावी,
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 चे कलम 41 (क) अन्वये असणारी चौकशी ही न्यायीक स्वरुपाची असल्यामुळे अर्ज योग्य रीतीने सादर करणे ही अर्जदाराची जबाबदारी आहे. न्यायीक चौकशीमधील सहायक धर्मादाय आयुक्त यांचे आदेश पारित झाल्यानंतरच परवानगी देण्यात येते. संबंधितांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करावेत, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰