- महसूल सप्ताहाचा जिल्हास्तरीय शुभारंभ
- नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी सकारात्मकतेने काम करण्याचे आवाहन
- जिल्हाधिकारी कार्यालय, क्षेत्रीय स्तरावरील उत्कृष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान
सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : महसूल विभाग शासनाचा कणा आहे. महसूल विभाग हा वटवृक्षासारखा पसरला असून, या विभागावर सर्वांचा विश्वास आहे. महसूल विभाग हा कायदा आणि लोकांच्या आकांक्षा यांची सांगड घालतो. लोकांचा हा विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोनाने काम करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.
महसूल दिनानिमित्त महसूल सप्ताहाच्या जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी अजय पवार आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
महसूल दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, महसूल विभागाकडून राज्य शासन, अन्य विभाग तसेच सामान्य जनतेच्या अपेक्षा असतात. सुनावणीचे निकाल, जातीचे दाखले अशा अनेक प्रकरणांतून आपण जनतेचे भविष्य बदलत असतो. हीच महसूल विभागाची ताकद आहे. दुष्काळ, महापूर, नैसर्गिक आपत्ती असे अनेक विषय महसूल विभाग भक्कमपणे व जबाबदारीने हाताळतो. ही विश्वासार्हता हेच आपले यश असून, लोकांचा हा विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी महसूल विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने सकारात्मकता ठेवावी. नवीन बाबी, अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करावे. त्रृटींचे अवलोकन करून त्यात सुधारणा करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच, सन्मान झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर म्हणाले, महसूल विभाग हा शासनाचा प्रमुख विभाग व चेहरा आहे. हा जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारा विभाग आहे. नैसर्गिक आपत्ती, निवडणूक, टंचाई, कायदा व सुव्यवस्था अशा अनेक योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी शासन मोठ्या विश्वासाने महसूल विभागावर टाकते. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येकाचा अभ्यास हवा. संगणकीकरण, नवतंत्रज्ञान असे चांगले बदल आपण आत्मसात करायला हवेत, असे सांगून त्यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी कडेगावचे उपविभागीय अधिकारी रणजीत भोसले, कवठेमहांकाळ तहसीलदार अर्चना कापसे, नायब तहसीलदार मनोहर पाटील, सेवानिवृत्त अधिकारी शेखर परब आणि विलास डुबल आदिंनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी विविध प्रकल्पांतर्गत प्रकल्पग्रस्तांना जमीन व भूखंड वाटप डॅशबोर्ड व नैसर्गिक आपत्ती अंतर्गत चॅटबोटचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले. यावेळी महसूल विभागातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, महसूल विभागातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र व पुष्प देवून गौरव करण्यात आला. यामध्ये उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, सहायक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, महसूल सहायक, ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), वाहनचालक, शिपाई, पोलीस पाटील, महसूल सेवक (कोतवाल) यांचा समावेश आहे.
प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांनी केले. आभार तहसिलदार (सर्वसाधारण) लीना खरात यांनी मानले. सूत्रसंचालन तहसीलदार अमोल कुंभार यांनी केले. रोपट्यास जल अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी रघुनाथ पोटे, शिवाजी जगताप, राजीव शिंदे, नीता शिंदे, सविता लष्करे, विजया यादव यांच्यासह महसूल कर्मचारी संघटना सांगली जिल्हाध्यक्ष कैलास कोळेकर, मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी संघटना सांगली जिल्हाध्यक्ष विजय तोडकर, महसूल सेवक संघटना सांगली जिल्हाध्यक्ष संजय जाधव, वाहनचालक संघटना सांगली जिल्हाध्यक्ष खुदबुद्दीन दादासो पिंपरे यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महसूल विभागातील सत्कार झालेले जिल्हाधिकारी कार्यालय व क्षेत्रिय स्तरावरील उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी – अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपविभागीय अधिकारी कडेगाव रणजीत भोसले, तहसिलदार कडेगाव अजित शेलार, तहसिलदार पुनर्वसन रंजना बिचकर, तहसिलदार कवठेमहांकाळ अर्चना कापसे, नायब तहसिलदार मनोहर नांदे-पाटील, नायब तहसिलदार नागेश गायकवाड, लघुलेखक ताहेरा डांगे व रमेश शिंदे, सहायक महसूल अधिकारी प्रमोद पाटील व रोहिणी जैन, मंडळ अधिकारी राजेश चाचे व मनोज शिरसे, महसूल सहाय्यक बाळकृष्ण चव्हाण व प्रशांत जडे, ग्राम महसूल अधिकारी विनायक बालटे, वाहनचालक खुदबुद्दीन पिंपरे, अनिल नागरगोजे व संतोष कानडे, शिपाई पोपट सानप, नेताजी भोसले व रविंद्र पारधी, महसूल सेवक दिपक तोडकर व सुधीर गोंधळी, पोलीस पाटील बांबवडे धनंजय माने.
सत्कार झालेले सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी असे - शेखर परब, विलास डुबल, बाळासो बागडे, शंकर वडर, श्री. मुलाणी, सुनिल कवठेकर, दिलीप लोंढे, कुमार कोलप.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰