सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : भारत सरकार राजपत्र अधिसूचना दि. 17 जून 2025 आणि मुख्य महाप्रबंधक (तक), दिल्ली यांचे प्रमाणित कार्यपध्दती पत्र दि. 7 ऑगस्ट 2025 नुसार 15 ऑगस्ट 2025 पासून भारतातील अव्यवसायिक (कार/जीप/व्हॅन) वाहनांसाठी / प्रवाशांसाठी वार्षिक टोल (फास्टॅग) पास सुरू होत आहे, असे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प.का.ई. कोल्हापूरचे प्रकल्प संचालक एस. एस. कदम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
वार्षिक टोल (फास्टॅग) पासची किंमत फक्त 3 हजार रूपये आहे. ही योजना फक्त अव्यवसायिक (कार/जीप/व्हॅन) वाहनांसाठी असणार आहे. वार्षिक टोल (फास्टॅग) पासची वैधता 1 वर्ष किंवा 200 एकेरी वाहनांच्या फेऱ्यांसाठी यापैकी जे आधी होईल ते लागू असून फक्त राष्ट्रीय महामार्ग व राष्ट्रीय द्रुतगती महामार्गावरील टोल प्लाझांसाठी वैध आहे. कोल्हापूर सांगली व सातारा या जिल्ह्यातील किणी टोल प्लाझा, बोरगाव टोल प्लाझा व तासवडे टोल प्लाझावर सदर वार्षिक टोल पास लागू होतील.
वार्षिक टोल पास (फास्टॅग) मिळविण्यासाठी तसेच सक्रियता आणि नूतनीकरणासाठी राजमार्ग यात्रा मोबाईल अॅपवर तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर देखील उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 1033 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰