पलूस दि. २६ : पलूस जि. (सांगली) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये "२६ जुलै" कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करुन देशासाठी बलिदान देणाऱ्या शहिद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
1999 मध्ये कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी पलूस जि. (सांगली) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो.
युद्धादरम्यान, भारतीय लष्कराने पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावले आणि "ऑपरेशन विजय" चा भाग म्हणून टायगर हिल आणि इतर सर्व चौक्यांवर कब्जा करण्यात भारतीय सैनिकांनी यश मिळवले होते. लडाखच्या कारगिलमध्ये 60 दिवसांहून अधिक काळ भारत विरुद्ध पाकिस्तान युद्ध सुरु राहिले आणि शेवटी या लढाईत भारताने युद्ध जिंकले. दरवर्षी प्रमाणे आज देखील कारगील युद्धात शहीद झालेल्या शेकडो भारतीय जवानांना पलूस येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
प्रमुख मान्यवरांनी दीप प्रज्वलन व अमर जवान ज्योतीला पुष्पहार अर्पण करुन शहिद जवानांना श्रध्दांजली वाहिली.
तसेच यावेळी मेजर मोकाशी, आवटे आणि चव्हाण या माजी सैनिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विद्यार्थ्यासह सर्व उपस्थितांना कारगिल युद्धाबाबतची चित्रफित दाखविण्यात आली.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे मिलींद सुतार यांनी कारगिल युद्धाची कारणं आणि पार्श्वभूमी थोडक्यात विषद केली. तसेच त्यांनी ग्राहक संरक्षण कायदा आणि स्वावलंबी भारत अभियानाची माहिती सांगितली. ते पुढे म्हणाले कि आपल्या जीवनाच्या अंतापर्यंत आपल्यातील विद्यार्थी जिवंत राहिला पाहिजे. त्यासाठी नेहमी चिकीस्त्सकपणे प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचा अभ्यास करत राहिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत जगात घडणाऱ्या घडामोडींचे निरीक्षण करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. प्रत्येकाला सैन्यात जाणे शक्य नसल्याने आपण नेहमी कायदे आणि नियम पाळून सुद्धा देश भक्ती सिद्ध करू शकतो.
प्राचार्य एस. बी. सपकाळ यांनी अध्यक्षीय भाषण करताना सांगितले कि केवळ सीमेवर लढणाऱ्या जवानांप्रती प्रेम न दाखविता सेवानिवृत्त जवानांप्रती सुद्धा तितकाच आदर आणि प्रेम प्रत्येकाच्या मनात असले पाहिजे. आपल्या प्रत्येक कृतीमध्ये देशभक्ती दिसली पाहिजे.
दरम्यान कारगिल युद्धाविषयी विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे आणि लिहिलेल्या निबंधांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आय. टी. आय. च्या आवारात सुमारे २५० फळ झाडांचे वृक्षारोपण करण्याचा संस्थेचा संकल्प असून त्याची प्रतिकात्मक सुरुवात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी. आर. क्षिरसागर यांनी केले तर आभार रोहिणी पोतदार यांनी मानले.
या कार्यक्रमाला विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰