सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने काढण्यात आलेली समता दिंडी व सामाजिक समता चित्ररथ रॅली उत्साहात पार पडले. प्रारंभी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, एस.टी स्टँड एरिया येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर समता दिंडी काढण्यात आली. ही समता दिंडी सांगली बसस्थानक येथून सुरू होऊन पुढे राजवाडा चौक मार्गे स्टेशन चौकात रॅलीची सांगता झाली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन राज्य सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने सामाजिक न्याय दिन अधिक लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने शासन निर्देशानुसार समता दिंडी व चित्ररथाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संविधान जनजागृती अभियानअंतर्गत संविधान उद्देशिका वाचन करण्यात आले. यावेळी समाज कल्याण सांगली कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त मेघराज भाते, राहुल जाधव, अमृता लिमये, तुषार शिवशरण, श्री. हाके, श्रीमती शिंदे व विविध शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
या प्रसंगी शाहू महाराजांना अभिवादन करून, त्यांच्या आदर्शांचे, विचारांचे पालन करण्याचा संकल्प सर्वांनी केला. समता दिंडीत शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रॅलीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली येथे प्रा. प्रज्ञावंत कांबळे यांचे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक योगदान व जीवन कार्यावर आधारित माहिती देणारे व्याख्यान पार पडले. लोककल्याणकारी राजा, समाजसुधारक आणि समतेचे पुरस्कर्ते म्हणून शाहू महाराजांचे कार्य हे नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष प्रतिभा इंगळे यांनी मार्गदर्शन केले. शाहीर बजरंग आंबी यांचा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांवर आधारित पोवाडा व गीते हा जलसा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त नागनाथ चौगुले यांनी आभार मानले.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰