सांगली : आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली आहे. बारावीत शिकणाऱ्या साधना भोसले या हुशार विद्यार्थिनीला नीटच्या चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या रागातून तिच्या वडिलांनी लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली. मारहाण करणारे वडील स्वतः खाजगी माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक आहेत. या मारहाणीत साधना गंभीर जखमी झाली आणि अखेर तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी साधनाचे वडील धोंडीराम भोसले यांना आटपाडी पोलिसांनी अटक केली आहे. चीड आणणारी ही घटना शुक्रवारी (20 जून 2025) रात्री 9:30 च्या सुमारास घडली. साधना ही विज्ञान शाखेत बारावीत शिकत होती आणि डॉक्टर बनण्याचं तिचं स्वप्न होतं. दहावीच्या परीक्षेत तिने 95 टक्के गुण मिळवले होते, पण नीटच्या चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्यानं तिचे वडील धोंडीराम भोसले संतापले.
"परीक्षेत कमी गुण कसे पडले?" असं विचारत त्यांनी रागाच्या भरात साधनाला घरातच लाकडी खुंट्याने मारहाण केली. या मारहाणीत साधना गंभीर जखमी झाली. धक्कादायक बाब म्हणजे, मारहाणीनंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्याऐवजी धोंडीराम दुसऱ्या दिवशी सकाळी योग दिन साजरा करण्यासाठी शाळेत गेले. घरी परतल्यानंतर त्यांना साधना बेशुद्ध अवस्थेत आढळली. तेव्हा तिला रुग्णालयात दाखल केलं, पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
साधनाची आई प्रीती भोसले यांनी याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानंतर रविवारी (22 जून 2025) धोंडीराम भोसले यांना अटक करण्यात आली. साधना ही आटपाडी येथील विद्यालयात राहत होती आणि दोन दिवसांपूर्वीच ती घरी आली होती. तिच्या हुशारी आणि डॉक्टर बनण्याच्या स्वप्नाबद्दल गावात चर्चा होती, पण फक्त एका चाचणी परीक्षेतील कमी गुणांमुळे तिचा हकनाक बळी गेला.
दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, शैक्षणिक दबाव आणि पालकांच्या अवास्तव अपेक्षांवरून पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.
या संदर्भात काही मुद्दे विचारात घ्यावे लागतील.
पालकांकडे पैसे आहेत म्हणून नीट किंवा जेईईसारख्या परीक्षांच्या तयारीसाठी शिकवणी लावली जाते. दहावीत मिळालेले भरमसाट मार्क्स अकरावी-बारावी विज्ञान आणि त्यापुढील प्रवेश परीक्षेत फारसे कामाला येत नाहीत. आपल्या मुलांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय किंवा आयआयटीमध्ये जाण्याचे स्वप्नं उराशी बाळगलेली असतात. पालक आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा आकांक्षा मुलांकडून पूर्ण करून घेण्याच्या उद्देशाने महागडे क्लास लावतात. पैसे खर्च केले तर मार्क्स मिळायला हवे असा पालकांचा आग्रह असतो.
अनेक मुलांना गुंतागुंतीचे किचकट प्रश्न सोडवता येत नाहीत. संकल्पना स्पष्ट नसतात. शिकवलेलं, समजलेलं नसलं तरी परीक्षा कठोर वातावरणात होतात. अशा वेळी मुलांच्या नाकी नऊ येतात. तीव्र स्पर्धा असते. आई-बाबांनी पैसे खर्च केलेले आहेत. अपेक्षित मार्क्स मिळत नाहीयेत. आई-वडिलांना मार्क्स पाहिजेत. अभ्यासात मन लागत नाही. तीव्र चिंता सतावत असते. मनात भीती घर करून बसलेली असते. आतल्या आत प्रचंड खळबळ सुरू असते. रेसच्या घोड्यावर लावतात तसे पालकांनी मुलांवर पैसे लावलेले असतात! त्यांना केवळ यश हवं असतं!
परिणामी मुलं त्रासात व तणावात जातात. त्यांची विचित्र कोंडी होते. सांगता येत नाही आणि सहनही होत नाही. अशी मनोवस्था मुलं अनुभवत असतात... पालकांना मुलांच्या अंतरंगातला कल्लोळ आणि त्रास यांचा अंदाज येत नाही.
निमूटपणे सहन करण्याशिवाय मुलांपुढे अन्य पर्याय नसतो. आतली खळबळ न सांगता. अनेकदा या मानसिक ताणतणावातून मुलं नैराश्याच्या फेऱ्यात सापडतात.
जेईई, नीट या पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले तरच आपल्या मुलांना उज्ज्वल भविष्य आहे असे बहुसंख्य पालकांना वाटू लागते. यातूनच तुलना केली जाते. ताण असह्य होऊन किंवा कथित अपयशाची भीती वाटल्याने, मनावर प्रचंड दडपण आल्यामुळे ‘आई बाबा मला माफ करा...' अशी नोट लिहून मुलं आत्महत्या केल्याचे बातम्या येतात.
खलिल जिब्रान म्हणतो,
"तुमची मुलं तुमच्या पोटी जन्माला आलेली असली तरी ती काळ प्रवाहाची अपत्ये आहेत. तुमचे विचार तुमच्या अपेक्षा मुलांवर लादू नयेत."
हाच बोध या घटनेवरून घेता येईल.
शब्दांकन - आर.के.जुमळे
दि.२३.६.२०२५
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰