आपण इतिहासाकडे जरा दृष्टीक्षेप टाकला, तर अनेक राजे महाराजे होऊन गेले. आपण भारताचा इतिहास अभ्यासिला तर आपणास असे दिसून येते की, प्रजेवर मुलासारखे प्रेम करणारे राजे फार कमी होऊन गेले. त्यापैकी राजश्री शाहू महाराज हे एक होते.
शाहू महाराजांच्या चळवळी या अनेक क्षेत्रातील होत्या. त्या समाजातील शेवटच्या माणसांपर्यंत पोहचल्या होत्या. त्यांचे जीवनकार्य आणि प्रेरणा हे सामाजिक महापुरुषाचे होते. नव्या सामाजिक रचनेचा ध्यास आणि मानवी विकास हे महाराजांच्या कार्याचे केंद्रबिंदू होते.
शिक्षण प्रसार हा त्यांचा स्थायीभाव. आयुष्याच्या व्यस्ततेतही त्यांनी शिक्षण प्रसाराकडे त्याचप्रमाणे समाज शिक्षणाकडे कदापि दुर्लक्ष केले नाही. राज्यकारभार हाती घेतल्यापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत म्हणजे १८९४ ते १९२२ पर्यंत सतत २८ वर्षे शिक्षणाचा प्रसार केला. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा उघडल्या. १९०२ साली ५० टक्के आरक्षणाची तरतूद केली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ. स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगवेगळ्या शाळा भरविण्याची पद्धत बंद केली.
जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. तसेच इ. स. १९१७ साली पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता प्राप्त करून दिली.
परदेशातून उच्च विद्याविभूषित होऊन आल्यावर डाॅ. बाबासाहेबांचा सत्कार माणगांव येथे करण्यात आला. त्यावेळी केलेल्या भाषणामध्ये त्यांनी अस्पृश्यांना उद्देशून म्हटले होते, "तुम्हाला तुमचा नेता मिळाला आहे. तो तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही." त्यांचे हे द्रष्टे बोल अगदी सत्य ठरले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ अस्पृश्यांचे नेते ठरले नाहीत, तर संपूर्ण देशाचे नेते ठरले. त्यांनी भारताचे संविधान लिहून एक प्रकारे राजर्षी शाहू महाराजांप्रती कृतज्ञताच व्यक्त केली. डाॅ. बाबासाहेबांनी 'मूकनायक' काढण्याचे ठरविले. त्याबद्दल त्यांनी राजर्षी शाहू महाराजांशी चर्चा केली. महाराजांनी त्यांच्या या कार्याला आर्थिक मदत केली. महाराजांचे व डाॅ. बाबासाहेबांचे घनिष्ठ संबंध होते. एकदा स्वतः महाराज डाॅ. बाबासाहेबांना भेटण्यासाठी मुंबईला आले. त्यावर डाॅ. बाबासाहेब महाराजांनाच म्हणाले की, 'तुम्ही राजे आहात, तुम्ही कशाला आलात? मला बोलावले असते, तर मीच तिकडे आलो असतो.' त्यावर महाराज म्हणाले, 'आम्ही संस्थांनाचे राजे, तुम्ही ज्ञानाचे राजे, आमचे राज्य आज आहे, उद्या नाही, पण तुमचे ज्ञान हे सदोदित राहील.
डाॅ. बाबासाहेबांनी सुरू केलेले "मूकनायक" पाक्षिक बंद पडले, त्यावेळी शाहू महाराजांनी त्यांना आर्थिक मदत देऊ केली. जातीयता नष्ट करण्याच्या हेतूने ते गंगाराम कांबळे नावाच्या व्यक्तीच्या हाॅटेलमध्ये मुद्दामच आपल्या सहकाऱ्यांसमवेत चहा घेण्यासाठी जात असत. वेदोक्त मंत्र न उच्चारताना पुराणातील मंत्राचे उच्चारण करून शाहू महाराजांना शूद्र लेखण्याचा प्रयत्न पुरोहितांनी केला. त्यांचा मानसिक छळ सुरू केला. पण महाराज किंचितही न डागमगता आपले कार्य सुरळीतपणे करीतच राहीले.
त्यांनी महिलांसाठी कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायदा व आंतरजातीय विवाह कायदा तयार केला. त्यांनी स्वतःच्या कुटुंबातील मुलगी धनगर समाजाच्या होळकर यांच्या घराण्यात विवाह करून दिला व आंतरजातीय विवाह करून दिल्यानंतर त्यांना कानपूरच्या कुर्मी समाजाने राजर्षी ही पदवी दिली होती.
अस्पृश्यांच्या महिलांनी शिकून जागृत व्हावे व आपल्या मुलींनाही शाळेत पाठवावे अशी त्यांच्यात समजदारी यावी, म्हणून त्यांनी एक धाडसी प्रयोग केला. हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या दिल्या. त्याचप्रमाणे राज्याबाहेरीलही होतकरू मुलींना शिष्यवृत्त्या देऊन इतकेच नव्हे, तर काही गुजराती मुलींनाही शिष्यवृत्ती देण्याचे औदार्य शाहू महाराजांनी दाखविले. मुलींच्या शिक्षणाचा प्रसार शिक्षकांनी आत्मीयतेने करावा, याकरिता राजर्षींनी मुलांच्या शाळेत शिक्षकांना प्रोत्साहनात्मक पारितोषिके जाहीर केली. अशाप्रकारे दुर्लक्षित व दुबळ्या जनतेला शिक्षणाचा मंत्र शाहूंनी दिला. म्हणूनच स्त्रीशिक्षणाच्या शेतातील कुंदा, कचरा व दगडधोंडे काढून पेरणीच्या पूर्व तयारीसाठी स्त्रीशिक्षणाचे शेत शाहूंनी तयार करून ठेवले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
राजे-राजवाड्यांना शाहूंनी शिक्षण प्रसाराच्या कार्यात सहभागी करून शेतकरी, कष्टकरी, सरंजामदार, राजेराजवाडे, बुद्धिवंत आणि व्यापारी अशा सर्व समाजातील लोकांना एका मंचावर आणले. त्याच माध्यमातून धारवाड, बडोदे, ग्वाल्हेर, देवास, इंदूर इ. ठिकाणी शिक्षण संस्था स्थापन्यासाठी प्रोत्साहन दिले. ते म्हणायचे, 'शिक्षणाचे कार्य हे आक्रोडाच्या झाडासारखे असते. आक्रोडाचे झाड लावल्यापासून साठ वर्षांनी फळ धरते, असे म्हणतात. शिक्षणाचेही असेच आहे. राजर्षींनी जे शिक्षण प्रसाराचे कार्य केले त्याची फळे आता दिसू लागली आहेत.
या प्रजाहितवादी राजाला अवघे ४८ वर्षांचे आयुष्य लाभले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना शाहू महाराजांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले.
राजर्षींनी दिलेले मानवमुक्तीचे, सन्मानाचे, स्वाभिमानाचे विचार सदैव लोकांना प्रेरणा देत राहतील. त्यांचे कार्य पुढे घेऊन जाण्याचा संकल्प करणे हेच आजच्या त्यांच्या जयंतीदिनानिमित्त खऱ्या अर्थाने अभिवादन होईल.
आर.के.जुमळे
दि.२६.६.२०२५
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰