मुकुंद उर्फ राजू खेराडकर हे व्यक्तिमत्व नुकतेच काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या जीवन प्रवासाच्या अगदी अंतिमक्षणी मी त्यांच्यासोबत होतो. गुरुवारी दुपारी १ वाजून २२ मिनिटांनी मला राजूशेठचा फोन आला होता. त्यांना मी एका लग्नाच्या पूजा समारंभाला चाललो आहे, ३ वाजता फोन करा असे सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी मला २.५८ ला मिस कॉल दिला होता, परंतु तो मी बघितला नव्हता. मग परत ३.१० ला त्यांचा फोन आला, त्यांनी मला त्यांच्या घरी यायला सांगितले. मग मात्र मी पाचव्या मिनिटाला त्यांच्या घरी पोहोचलो. तिथे त्यांची पत्नी आणि चुलते संजय उर्फ बाळासाहेब होते. मी राजू शेठजवळ सोफ्यावर बसलो, संजय आमच्या समोर वेगळ्या खुर्चीवर बसला होता. त्यांनी मला काम सांगितले ते संजयशी संबंधित होते. मात्र अतिशय किरकोळ स्वरूपाचे ते काम होते, त्यामुळे पाच मिनिटात आमची त्या कामाबद्दल चर्चा झाली तो विषय संपला. त्यांना माझ्याशी माझ्या लेखनाविषयी आणि शाळेच्या वॉट्सअप ग्रुपबद्दल चर्चा करायची होती. त्यांनी मला चहा हवा कि सरबत असे विचारले. मी चहा चालेल म्हटल्यावर वहिनी आता गेल्या आणि चहा घेवून आल्या. त्यांनी मला पाण्याचा पेला दिला आणि कप असलेला ट्रे टीपॉयवर ठेवून वहिनी आत गेल्या. मी पाणी पित होतो, इतक्यात राजूशेठ डाव्या कुशीवर हळूच कलंडले. मी अर्धा पेला पाणी पिलो आणि पेला खाली ठेवला, चहाचा कप घेणार इतक्यात राजू शेठच्या घशातून घरघर आवाज आला. मला शंका आली म्हणून मी पटकन उठलो आणि त्यांच्याजवळ गेलो. हाका मारल्या, त्यांचे डोके लोडा वर टेकविले आणि छातीवर हात ठेवून बघितले तर काहीच हालचाल दिसेना. मी, संजू आणि वहिनी आम्ही तिघे जण हाका मारत होतो. परंतु काहीच प्रतिसाद येत नव्हता. त्यांच्या सुना पळत आल्या, त्यांनी मुलांना फोन केला, मुलंही दोन मिनिटात आली. सगळ्यांनी मिळून त्यांना उचलून गाडीत नेवून ठेवले. पाच मिनिटात त्यांना दवाखान्यात नेले. तिथे डॉक्टरांनी खुप प्रयत्न केले परंतु दुर्दैवाने त्यांना यश आले नाही. त्यांचा प्राण जाताना कसलाही आवाज आला नाही. पायांची हालचाल नाही, घामसुद्धा आला नाही. अतिशय शांतपणे त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. आमच्यासमोर हे सगळं घडलं पण आम्ही काहीच करू शकलो नाही, याची खंत वाटते. एका दुर्दैवी घटनेचा साक्षीदार होण्याचे दुर्भाग्य आपल्या वाट्याला आले, याचे दु:ख वाटते.
राजूशेठचे आणि माझे माध्यमिक शिक्षण घेत असल्यापासूनचे संबंध होते. तासगांव हायस्कूल मध्ये मी पाचवीला असताना ते आठवीला होते. त्यामुळे आम्ही एकमेकाशी अरेतुरे करूनच बोलत असू. १९८२ ला दहावी झाल्यावर अकरावी ते बी. कॉम सांगली रस्त्यावरील पूर्वीचे आर्ट्स, कॉमर्स कॉलेज आणि सध्याचे वसंतदादा कॉलेज इथे त्याचे शिक्षण झाले. अगदी अकरावीत असल्या पासून कॉलेजला राजू बुलेटवरून जात असे. बुलेटवर पाचजण मित्र बसवून नेत असे. कॉलेजवरच्या शशीच्या कँटिनमध्ये मित्रांना भजी आणि चहा राजूच देत असे. त्यांच्या मित्रांच्या कॉलेजमधील अनेक रसभरीत आठवणी आहेत. सोमवार पेठेतील गणेशोत्सव मंडळ, सराफ कट्ट्यातील गणेशोत्सव मंडळ, हनुमान जयंती यामध्ये सक्रीय सह भाग घेत असे. हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करणे, इतकंच नव्हे तर भारताने क्रिकेटची मॅच जरी जिंकली तरी फटाके उडवायला राजूच आघाडी वर असे. गल्लीतील किमान पंचवीस तरुणांचे टोळके राजुसोबत नेहमी असे. त्यामुळे नगरसेवक होण्यात त्याला कोणतीही अडचण आली नाही. नेहमी टापटीप राहणे स्वच्छ सुंदर कपडे घालणे, दर्जेदार अत्तर, गॉगल, वगैरे सगळेच राजेशाही थाटात असे. त्याला मुकुंद या मूळ नावापेक्षा राजू किंवा राजा हे टोपणनांवच जास्त शोभून दिसायचे. तो नेहमी राजा सारखाच वागला, जगला. घरात असो कि दुकानात असो, सगळ्या वस्तू दर्जेदार आणि रुबाबदार असायच्या. जगण्यातला आणि वागण्यातला रुबाब त्याने कधीही कमी होवू दिला नाही. राजा हे संबोधन खऱ्या अर्थाने सार्थ करणाऱ्या या आमच्या मित्राने जगाचा निरोपसुद्धा तितक्याच रुबाबात घेतला. कोणाचेही जाणे हे दुख: दायीच असते, मात्र चालू असलेल्या मैफिलीतून कंटाळा आला म्हणून निघून जाण्याइतके सोपे मरण येवू शकते. हे सिद्ध करून हा राजा निघून गेला. सगळे आयुष्य राजा सारखे जगलेल्या माणसाचा शेवट सुद्धा त्याच्या लौकिकाला साजेसाच झाला. राजूस भावपूर्ण श्रद्धांजली.
लेखन -
मिलींद सुतार
तासगांव जि. सांगली
भ्र. भा. 9405285609
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰