काही कारणास्तव गेला महिनाभर वैयक्तिक कामात व्यस्त असल्याने ‘बाळू कोकणे’ आणि 'अभिनव लग्न सोहळा' सोडून फारसं काही लिहू शकलो नाही. मात्र माझ्या सराफकट्ट्या बद्दलच्या लेखनमालेतील एक भाग थोडा दुरुस्त करून परत सादर करत आहे. शंकर गणेश जोशी आणि मोतीराम दादा बागवडे या पेढ्यांवरील लेखांकानंतर काहींचे अभिप्राय आले कि प्रत्येक पेढीवरच्या लेखाचा आकार समान असायला हवा. परंतु एका दुकानाला कमी आणि दुसऱ्याला जास्त जागा देण्याचा माझा अजिबात विचार नाही. मात्र ज्याची जितकी माहिती माझ्या पर्यंत येईल तितकी मी लिहिण्याचा प्रयत्न करतोय माझे तासगांव शहरावर आणि इथल्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टीवर नितांत प्रेम आहे. म्हणून नुसते भाबडेपणाने काहीतरी लिहून लोकांचे मनोरंजन करावे असा स्वार्थी विचार तर बिलकुल माझ्या मनात येत नाही. या लेखनमालेचे अपेक्षित परिणाम दिसू लागले आहेत. नोकरी धंद्यासाठी परगावी राहणारे मुळचे तासगांवकर किंवा लग्न होऊन परगांवी गेलेल्या सासुरवाशीणींना ही लेखनमाला वाचून अत्यंत आनंद होत आहे. एक भाग वाचला की पुढच्या भागाबद्दलची उत्सुकता लागून रहाते. लेख टाकायला जरा उशिर झाला की मला ते विचारतात. यावरून या लेखनाची सफलता ध्यानी येते.
आता आपण जुन्या जमान्यातील एका सुप्रसिद्ध पेढीची माहिती पाहू. त्या पेढीच्या बोर्डावर ‘हेच ते चेंडूभाई उर्फ तुकाराम वालचंद शहा’ असे लिहिले होते. पूर्वी दुकानाला किंवा पेढीला नांव देताना मालकाचे पूर्ण नांवच दिले जायचे. पुढच्या पिढीत पेढीचे नांव तसेच रहायचे मालक फक्त बदलायचा. चेंडूभाई शहांच्या पेढीचा इतिहास असा की मुळचे गुजरातमधील मेहसाना येथून तासगांव तालुक्यातील मांजर्डे येथे येवून स्थायिक झालेले हे शहा कुटुंब अठराव्या शतकात तासगांवात आले असावे. सन १९०१ साली वालचंद रामचंद शहा यांनी तासगांवातील सराफ पेठेतील कट्ट्यावर सोने चांदीचा व्यापार सुरु केला. त्याकाळी दुकान वगैरे नव्हते अनेक कप्पे असलेल्या जाड कापडाच्या पिशवीत लहान मोठे जिन्नस आणि जुजबी हत्यारे, शाळीग्राम वगैरे भरून कट्ट्या वर सकाळी येवून बसायचे आणि संध्याकाळी आपापली पिशवी घेवून परत घरी जायचे. इंग्रजांच्या काळात सोने काठीला बांधून फिरले तरी त्याची चोरी होत नसे. असं म्हणण्याची जी पद्धत होती त्याचा प्रत्यय म्हणजे अशा पद्धतीने सराफी व्यवसाय चालायचा. वालचंदभाईंच्या शेजारी मोतीवाले बिडकर म्हणून एक निव्वळ मोत्यांचे व्यापारी बसायचे. ते मुळचे बीडचे असल्याने त्यांना बिडकर म्हणत. त्यांच्याकडे जे मोती मिळायचे ते एकदम अस्सल शिंपल्यात तयार झालेले असायचे. नंतर त्यावर थोडे कसब करून दागिन्यात सजविण्यास योग्य करून ते द्यायचे. हे बिडकर फिरस्त्यासारखा व्यवसाय करायचे म्हणून ते दररोज कट्ट्यावर दिसायचे नाहीत. त्यामुळे पुढे त्यांनी दुकान वगैरे थाटले नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल फारशी कोणाला माहिती नाही. वालचंदभाई मात्र त्याच जागी स्थिर झाले. त्यांच्या वेश अस्सल मारवाडी पद्धतीचा होता. दोन टांगी धोतर, पांढरी शुभ्र पैरण किंवा बारा बंदी आणि डोक्यावर सोन्याची जर असलेली मारवाडी पगडी असा त्यांचा वेश होता. ते धंद्यात अतिशय हुशार आणि प्रामाणिक होते. त्यांच्यानंतर या पेढीची धुरा तुकाराम वालचंद उर्फ चेंडूभाई यांचेवर येवून पडली. १९४४ साली तासगांवच्या नगर भूमापन (सिटी सर्व्हे) खात्याने सर्व जागांची पाहणी करुन परंपरागत वहिवाटीने ज्याच्या कब्जात जी जागा असेल त्याच्या नांवावर ती जागा करून दिली. त्यानंतर मग प्रत्येकाने दुकाने थाटली. हे चेंडूभाई थोडे शाळा शिकलेले आणि जागोजागी प्रवास केलेले व आधुनिक विचारांचे होते. त्यांनी आपला मुलगा कमलाकर यास चांगले शिक्षण दिले. तो तासगांव तालुक्यातील पहिला दातांचा डॉक्टर (डेंटीस्ट) झाला. कमलाकर यांनी गोखल्यांच्या कापड दुकानाच्या माडीवर दातांचा दवाखाना सुरु केला होता. त्यामुळे त्यांचे सराफी धंद्यात फारसे लक्ष नव्हते. मग चेंडूभाईनी आपला नातू रणजित यांस आपल्या धंद्यात आणले. ते सुद्धा धंद्यात अत्यंत हुशार होते. त्यांनी चेंडूभाईंच्या पश्चात अतिशय चांगल्या पद्धतीने धंदा सांभाळला. मात्र रणजितभाईनंतर त्यांच्या घराण्यातील कोणीही या धंद्यात आले नाही. नंतर शहा बंधूनी ही पेढी गौरीहरदादा खेराडकर यांना विकली. अशा रितीने चेंडूभाईंचे घराणे सराफकट्ट्यातून बाहेर पडले आणि एक उज्वल परंपरा खंडित झाली याची खंत वाटते. असो.
लेखन -
मिलींद सुतार
तासगांव जि. सांगली
भ्र. भा. 9405285609
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰