सांगली, दि. 5, (जि. मा. का.) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथील प्रसूतिपश्चात (pnc) कक्ष क्रमांक 64 येथून दिनांक 3 मे 2025 रोजी दुपारी 12 च्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील कोळे येथील कविता समाधान अलदार या महिलेचे 3 दिवसांचे पुरुष जातीचे बाळ अज्ञात महिलेने घेऊन गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात महिलेविरुध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस प्रशासनातर्फे सुरु असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज चे अधिष्ठाता यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
सौ. अलदार यांची सिझेरियन प्रसुति दि. 1 मे 2025 रोजी झाली होती. प्रसुतिनंतर त्यांना प्रसुतिपश्चात कक्ष येथे आंतररुग्ण स्वरुपात ठेवले होते. बाळ गहाळ झाल्याची बाब कर्तव्यावर उपस्थित परिचारिका यांच्या निदर्शनास आल्यानंतर तातडीने महात्मा गांधी चौक, पोलिस स्टेशन, मिरज येथे तक्रार नोंदविण्यात आली. पोलिस प्रशासनाने घटनास्थळी तपासणी करुन संबंधितांचे जाब-जबाब घेऊन तसेच रुग्णालयातील सी.सी.टी.व्ही. फुटेज यांची तपासणी करुन संबंधित अज्ञात महिलेविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाबाबतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे संस्थास्तरावर वरिष्ठ अध्यापकांची चौकशी समिती स्थापन केली असून त्यांना त्वरीत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰