सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने संबंधित विभागांनी गाव पातळीवर सूक्ष्म नियोजन करावे. अद्ययावत आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार ठेवावेत. संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी प्रभावी नियोजन करून संबंधित सर्व यंत्रणांनी सदैव सतर्क राहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिल्या.
आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस प्रभारी पोलीस अधीक्षक रितू खोखर, महापालिका उपायुक्त रवीकांत आडसूळ, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, यापूर्वीच्या सन २०१९ व सन २०२१ मध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीचा अनुभव लक्षात घेऊन अचूक नियोजन करावे व त्यानुसार सज्जता ठेवावी. महापूर, दुष्काळ, भूकंप, आग अशा अनेक स्वरूपात नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. या प्रत्येक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रत्येक विभागाने सूक्ष्म नियोजन करून आठवडाभरात सविस्तर कृती आराखडा सादर करावा. आपत्कालिन स्थितीत सर्व यंत्रणांनी अंतर्गत व परस्पर समन्वय ठेवावा, असे त्यांनी यावेळी सूचित केले.
यावेळी गाव पातळीवरील आपत्ती व्यवस्थापन तसेच महत्त्वाच्या विभागांनी केलेल्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. बैठकीत विविध घटकांची जबाबदारी निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. संभाव्य पूरस्थितीत नागरिकांच्या मूलभूत गरजा भागवणे, आपत्कालिन कक्ष, विविध आपत्कालिन संपर्क क्रमांक, बचाव पथक, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, निवारा व्यवस्था, अन्नधान्य, औषधे, जनजागृती, रूग्णवाहिका, मदत केंद्रे यासारख्या बाबींसाठी तयारीचा आढावा घेण्यात आला. ग्रामस्थांना वेळोवेळी योग्य माहिती मिळावी यासाठी स्थानिक स्तरावर जनजागृती, आणि पूर्वसूचना गट तयार करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.
हेही पहा ---
https://youtu.be/iAAv8RU2hKI?si=C2tmp72vsUPMRtoW
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰