सांगली दि. 30 (जि. मा. का.) : सांगली जिल्हा हरित ऊर्जायुक्त बनवण्यासाठी महावितरण व महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा/मेडा) या दोन्ही कार्यालयांच्या वतीने शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना २.०, प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना, मागेल त्याला सौर ऊर्जा पंप आदि योजनांतून याचे दाखले मिळत आहेत.
मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना २.० या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. याबाबत महावितरण सांगली ग्रामीणचे प्रभारी अधीक्षक अभियंता सुरेश सवाईराम म्हणाले, मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना २.० या योजनेतून जिल्ह्यात 46 ठिकाणी एक हजार 670 एकर जागा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, या योजनेतून जिल्ह्यातील पहिला चार मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प जत तालुक्यातील बसर्गी येथे सुरू झाला आहे. या योजनेतून शेतीपंपांना दिवसा अखंडित व शाश्वत वीजपुरवठा करता येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रभारी अधीक्षक अभियंता सुरेश सवाईराम म्हणाले, मागेल त्याला सौर ऊर्जा पंप योजनेंतर्गत जिल्ह्यात 3 एचपी, 5 एचपी व 7.5 एचपी क्षमतेचे सौरपंप वितरीत करण्यात आले आहेत. या पंपांसाठी सर्वसाधारण लाभार्थीकरिता 10 टक्के लाभार्थी हिस्सा व अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी 5 टक्के लाभार्थी हिस्सा ठेवला आहे. जिल्ह्यातील अकराशे चाळीस शेतकऱ्यांनी सौर ऊर्जा पंप बसविले आहेत. उर्वरित अर्जदारांची कामे सुरू आहेत. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करता येणार आहे, असे ते म्हणाले.
महाऊर्जाचे प्रकल्प अधिकारी अजिंक्य आबिटकर म्हणाले, प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनेतून जिल्हा परिषद अंतर्गत एकूण 56 प्राथमिक आरोग्य केंद्रांकरिता प्रत्येकी 10 किलोवॅट याप्रमाणे एकूण 560 किलोवॅट क्षमतेचे छतावरील पारेषण संलग्न सौरविद्युत प्रकल्प आस्थापित करण्यात येत आहेत. त्यासाठी 4 कोटी 12 लाख रूपये किमतीच्या कामास जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2024-25 मधून मान्यता देण्यात आली आहे. तसेच, 63 शासकीय व निमशासकीय इमारतींना 863 किलोवॅट क्षमतेचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर केले आहेत. पारंपरिक वीज बचतीकरिता जिल्ह्यातील एकूण 155 शासकीय – निमशासकीय इमारतींवर एकूण 733.5 किलोवॅट क्षमतेचे सौर विद्युत प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत.