कुंडल (ता. पलूस) : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना, कुंडल याठिकाणी ऊसतोड मजूर आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटन २० डिसेंबर रोजी कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्याहस्ते करण्यात आले. आयुष्मान आरोग्य मंदिर, कुंडल या संस्थेच्या माध्यमातून ऊसतोड मजूर व लहान बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
महाराष्ट्रातील साखर कारखाना परिसरात ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी साखर शाळेची व्यवस्था करण्यात येते. स्थलांतरित असणारे मजूर आपल्या मुलांना शालेय शिक्षण देण्यात असमर्थ राहतात आणि मुलांचे शैक्षणिक नुकसान होते. या मजुरांच्या मुलांमध्ये साक्षरतेचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचा अहवाल लक्षात घेता साखर शाळांची निर्मिती करण्यात आली. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड साखर कारखाना याठिकाणी असलेल्या साखर शाळेत पन्नासहून अधिक विद्यार्थी शालेय शिक्षण घेत आहेत. ऊसतोड मजूर व त्यांच्या लहान मुलांसाठी आरोग्याच्या दृष्टीने या तपासणी आणि उपचार शिबीराचे आयोजन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. या शिबिरात डोळे तपासणी, त्वचा रोग, बालरोग, अस्थि रोग, कान-नाक-घसा रोग, दंत रोग तपासणी, अशा विविध व्याधींची तपासणी व उपचार देण्यात आले.
कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी नरेंद्र देशमाने, प्रदीप अनुसे, रविराज पाटील, दिपाली पाटील, विशाल पाटील, वैभव पाटील, प्रशांत गोरे, अजित बोडरे यांनी हे आरोग्य शिबीर यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे, शेती अधिकारी दिलीप पार्लेकर, सेक्रेटरी वीरेंद्र देशमुख तसेच इतर विभागाचे कर्मचारी यांचेसह शिबिरार्थी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰