कुंडल दि. 29 : काल आ. विश्वजीत कदम यांनी पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्जभरल्यानंतर भर सभेत मा. अरुण (अण्णा) लाड यांच्या अनुपस्थितीचा उल्लेख केला. आपण बोलला, की त्यांना वरिष्ठांचा आदेश आल्याशिवाय ते बाहेर पडणार नाहीत. त्यामध्ये तुम्हाला त्यांचे चुकीचे वाटले म्हणून तुम्ही मा. अरुण अण्णांच्या वरती टीका केली आणि चार भिंतीच्या आड झालेली चर्चा चव्हाट्यावर आणली. आमदारसाहेब तुम्हाला थोडी आठवण करून देतो, आत्ताचा पलूस-कडेगांव मतदारसंघ म्हणजेच सन १९८५ चा भिलवडी-वांगी मतदारसंघ. सन १९८५ साली स्व. डॉ. पतंगराव कदम यांना क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांनी पाणी प्रश्नावर पाठिंबा दिला व या पाठिंब्यावर पतंगराव कदम अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम साहेबांच्या निधनानंतर जी पोटनिवडणूक (२०१८) झाली; त्यावेळी तुम्हाला आम्ही जो पाठिंबा दिला, त्यावेळी अरुण अण्णांनी वरिष्ठांची वाट पाहिली नव्हती. त्यानंतर (२०१९) ला विधानसभा झाली, त्यावेळीसुद्धा पारंपरिक मित्राला सोडून व कोणत्याही वरिष्ठांना न विचारता तुम्हाला पाठिंबा दिला. तसेच पुढे येणार्याय कोणत्याही निवडणुकीसाठी तुम्हाला बांधुन घेतले नाही. उलट दोन्ही निवडणुकीला बिनशर्त पाठींबा दिला. पण तुम्ही पदवीधर निवडणुकीला आम्हाला बांधुन घेण्यासाठी काय काय केले..? हे सुद्धा कालच्या सभेमध्ये सविस्तर बोलला असता तर बरे झाले असते. म्हणुनच आम्हाला २०२४ लाच वरिष्ठांना विचारावं का लागत आहे? त्याचे उत्तर- २०१८ व २०१९ ची विधानसभा पार पडली आणि २०२० च्या पदवीधर निवडणुकीची वेळ आली, तेव्हा तुम्ही साहेबांच्याकडे वर पाहिले नाही. तुम्ही पहिल्यांदा कुंडलमधील तुमच्या सहकार्यांरना विचारले आणि त्यामध्ये तुमचे ठरले, यांना पहिल्यांदा बांधून घेऊया व यासाठी तुमची मुंबईमध्ये एक बैठक पार पडली. त्या बैठकीचे काही फोटो, त्यामध्ये मा. बाळासाहेब थोरात, मा. बंटी पाटील, मा. जयंत पाटील, मा. सुप्रिया सुळे तसेच तुमचे कुंडलचे सहकारी मा. महेंद्र लाड, मा. बाळासाहेब पवार सुद्धा दिसत आहेत. मग मा. अरुण (अण्णा) लाड वरिष्ठांशी चर्चा करतो, अस म्हंटल्यावर एवढा राग का..? ते असे तर बोलले नाहीत की पाठिंबा देणार नाही.
‘क्रांतिवीरांचा वारसा आहे.. खोटे कधी वागणार नाही!’
आताच्या २०२४ च्या निवडणुकीपूर्वी आमच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार आमच्या मनातील प्रश्न त्यांनी बैठकीतून मांडून मोकळ्या मनाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे काम करायचे आहे. त्यानुसार हि बैठक घ्यायची ठरली, यात की चुकीचे आहे? या सगळ्या बैठकींचा पायंडा तर तुम्हीच घातला होता ना? तुमच्या १५०००० माताधीक्यामध्ये राष्ट्रवादीचा वाटा तुम्ही नाकारणार आहात का? आम्ही महाविकास आघाडीतच आहे, जर तुम्हाला विरोध करायचा असता, तर आम्ही उमेदवारी केली असती. विश्वजीत कदम साहेब तुम्ही अर्धसत्य मांडता. आमचा मुद्दा हा आहे, की महाविकास आघाडी म्हणून आत्ताच फक्त एकत्र यायचं का? विधानसभेनंतर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, नगरपरिषद, ग्रामपंचायत, बाजार समिती अशा निवडणुकीला मात्र आमच्या विरोधात उभे राहता आणि आता मात्र आशीर्वाद, मदत मागता? पदवीधरच्या निवडणूकी अगोदर आम्ही सुद्धा तुम्हाला बिनशर्त पाठिंबा देऊन राज्यात दुसऱ्या क्रमांकाच्या मताधिक्याने निवडून आणले आहे. हे सुद्धा विसरून चालणार नाही. आम्ही पवार साहेब व मा जयंत पाटील साहेब यांच्या विचारांशी एकनिष्ठ आहोत. वरिष्ठांसमोर सर्व चर्चा करून एकत्रित येऊया, असे आमचे मत आहे; पण त्याचा अर्थ तुम्ही वेगळाच काढला 'वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहतो’, असं आम्ही बोलल्याचे आपण सांगत आहात. आम्ही आमची भूमिका महाविकास आघाडी म्हणून अद्याप सोडलेली नाही. डॉ. पतंगराव कदम साहेबांच्या निधनानंतर राजकीय आम्हीसुद्धा आपल्यातील राजकीय संघर्ष संपवलेला आहे, मात्र तुमच्या बोलण्यातून आम्ही तुमचे विरोधक असल्यासारखं जाणवत आहे. तुम्हीसुद्धा पदवीधरच्या वेळेस मुंबईमध्ये वरिष्ठांसमोर आम्हाला बांधून घेतले, नंतरच पाठिंबा दिला हे तुम्ही जनतेसमोर सांगितलं पाहिजे. आम्ही सुद्धा आमच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.
त्यामुळं यापुढे अशी बेताल वक्तव्य करून महाविकास आघाडीत बिघाडी होणार नाही, याची काळजी आ. कदम यांनी घ्यावी.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰