तुरचीत प्रशिक्षणार्थी पोलीस अंमलदारांचे दीक्षांत संचलन उत्साहात
सांगली, दि. 30 (जि. मा. का.) : पोलिसांनी सांघिकपणे कर्तव्य करावे, गणवेष अंगावर आला की आपण समाजाचे देणे लागतो हे लक्षात ठेवावे. "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” या महाराष्ट्र पोलीस दलाच्या ब्रीद वाक्यास शोभेल असे वर्तन ठेवावे. आपल्या कृतीने मानवी हक्काचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. आदर्श पोलीस अंमलदार म्हणून समाजाची सेवा करावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण व खास पथके चे अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी केले.
पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे सत्र क्रमांक 9 मधील 609 प्रशिक्षणार्थी पोलीस अंमलदार यांचा दीक्षांत संचलन सोहळा पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या कवायत मैदानावर संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सुमनताई पाटील, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरचीचे प्राचार्य धीरज पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
पीडित जनतेस कायद्याच्या चाकोरीत राहून जनतेची निस्वार्थी सेवा करावी, असे सांगून अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी यावेळी अथक प्रयत्न करून अत्यंत सुंदर असे कवायत संचलन केल्याबद्दल प्राचार्य धीरज पाटील व सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य धीरज पाटील यांनी प्रशिक्षणार्थी अंमलदार यांना सेवेची शपथ दिली व पोलीस प्रशिक्षण केंद्राचे अहवाल वाचन केले. यामध्ये त्यांनी प्रशिक्षणार्थींना परिपूर्ण पोलीस बनविण्यासाटी ई-लर्निंग, अॅम्बीस, संगणक व ट्रॉफिक मॅनेजमेंट या पूरक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे सांगितले. अद्ययावत ई-ग्रंथालय व ई-बुक उपक्रम चालू करणारे पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची राज्यात पहिले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांच्या हस्ते बेस्ट फायरर वृषभ जगदाळे, बेस्ट कॅडेट इन पीटी हरिकिशन कुंठंबरे, बेस्ट कॅडेट इन स्पोर्टस संदिप कलवर, बेस्ट कॅडेट इन कमांडो कोर्स जालिंदर वाघमारे, बेस्ट कॅडेट इन-डोअर विषय क्र. 1 ते 3, बेस्ट कॅडेट इन-डोअर व बेस्ट कॅडेट ऑफ द बॅच-9 रविंद्र तिकुडवे, बेस्ट कॅडेट इन-ढडोअर विषय क्र. 4 ते 8 व बेस्ट कॅडेट ऑफ द बॅच-रनर-अप विशाल पाटील, बेस्ट कॅडेट आऊट-डोअर रघुनाथ काळे, बेस्ट कॅडेट इन डिसिप्लीन /बिव्हीयर संतोष ढवळे, बेस्ट टर्न ऑऊट प्रसाद माने यांना बक्षिस वितरण करण्यात आले.
प्रारंभी दीक्षांत संचलन परेड प्रसंगी अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी मानवंदना स्विकारली. या संचलनाचे परेड कमांडर नवप्रविष्ठ प्रशिक्षणार्थी पोलीस अंमलदार तानाजी माने होते.
सूत्रसंचलन राखीव पोलीस निरीक्षक राजु शिंदे यांनी केले. या कार्यक्रमास संजय पाटील, तुरची गावचे सरपंच व इतर मान्यवर तसेच प्रशिक्षणाथीचे नातेवाईक, उप-प्राचार्य, प्रशासन श्रीमती राजश्री पाटील, उप-प्राचार्य प्रशिक्षण सुजय घाटगे, सत्र समन्वयक श्रीकृष्ण हारुगडे व सर्व आंतरवर्ग अधिकारी, बाह्यवर्ग अधिकारी, प्रशिक्षक, सर्व पोलीस अंमलदार व त्यांचे कुटूंबिय, कर्मचारी उपस्थित होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖