BANNER

The Janshakti News

सण, उत्सव साजरे करताना ध्वनी प्रदुषण नियमांचे काटेकोरपणे पालन करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी





        सांगली, दि. 29 (जि. मा. का.) : सण, उत्सव साजरे करताना ध्वनी प्रदुषण नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याबाबत संबंधित यंत्रणांनी आवश्यक कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत.

जिल्ह्यामध्ये दि. 7 ते 17 सप्टेंबर 2024 या काळात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव सण साजरा होत आहे. या काळात मा. उच्च न्यायालय व शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत पुढीलप्रमाणे सूचना दिल्या आहेत.  ध्वनी प्रदुषण नियम 2000 मधील नियम 7 नुसार नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रात ध्वनीप्रदुषण नियमाच्या उल्लंघनाच्या तक्रारी संदर्भात तक्रार निवारण यंत्रणा सुरु करावी. अनुज्ञप्ती विषयक संस्थांनी ध्वनी प्रदुषण नियमांच्या उल्लंघनाबाबत प्रत्येक तक्रारीची, निनावी तक्रारीची देखील दखल घ्यावी. प्रचलित / पारंपारिक पध्दतीशिवाय महानगरपालिकांनी व नगरपालिकांनी टोल फ्री क्रमांकही ध्वनीप्रदुषण तक्रारी स्विकारण्याकरीता उपलब्ध करुन द्यावा. ई-मेल, लघुसंदेश व व्हॅटसअॅप व्दारे देखील तक्रारी दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करुन द्यावी.

             महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या तरतुदी अंतर्गत ध्वनीप्रदुषण नियंत्रणाकरीता पोलीस अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्याबाबत गृह विभागाने दिनांक 14 जुलै 2015 रोजी अधिसुचना प्रसिध्द केली आहे. ध्वनी प्रदुषणाकरीला तक्रारीसाठी नियुक्त यंत्रणेचे नाव, दुरध्वनी क्रमांक इत्यादी माहिती प्रदर्शित करावी. गणेशोत्सव, नवरात्री इत्यादी सणापुर्वी महानगरपालिका आयुक्त, उपविभागीय दंडाधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी उत्सव साजरे करणाऱ्या महत्वाच्या संघटनांची बैठक घेवून ध्वनी प्रदुषण कायदेविषयक आणि पदपथावर तात्पुरत्या स्वरुपात मंडप उभारण्याबाबतच्या नियमांची माहिती व कायदेशिर तरतुदीच्या भंगाचे परिणाम याबाबतची माहिती द्यावी. आवश्यकतेनुसार स्थानिक राजकीय नेते, मोहल्ला समित्यांचे सदस्य यांना देखील बैठकीसाठी बोलविण्यात यावे. रस्त्यावर, पदपथावर तात्पुरत्या स्वरुपात मंडप उभारण्या बाबतच्या व ध्वनि प्रदुषण विषयक नियमांचे पालन करणे बाबत संबंधीताना आयोजित बैठकीत सुचना द्याव्यात.

             ध्वनी प्रदुषण नियमांचे सक्त पालन होईल या बाबत महानगरपालिका व नगरपालिका यांनी आवश्यक कार्यवाही करावी.  रस्त्यावर, पदपथावर तात्पुरत्या स्वरुपात मंडप उभारण्याबाबत मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करावे.  रस्त्यावर पदपथावर तात्पुरत्या स्वरुपात मंडप वा तत्सम रचना उभारण्यासाठी मुंबई महागनरपालिका कायदा, 1888 कलम 317 व महाराष्ट्र महानगरपालिका कायदा 1949 कलम 234 नुसार परवानगी देतेवेळी परवानगी पत्राची प्रत दर्शनी भागात प्रदर्शीत करण्याची अट समाविष्ट करावी व अशी कार्यवाही झाली नसल्याच्या ठिकाणी अशा रचना तातडीने निष्काषित कराव्यात. उचित पूर्वपरवानगीशिवाय उभारण्यात येणाऱ्या तात्पुरत्या स्वरुपातील मंडप, कमानी व तत्सम रचना तातडीने निष्काषित करण्याची कार्यवाही महानगरपालिका आयुक्तांनी करावी. धार्मीक कार्यक्रमापूर्वी देखील या प्रमाणे कार्यवाही करावी.

मुंबई महानगरपालिका कायदा, 1888 वा महाराष्ट्र महानगरपालिका कायदा 1949 नुसार तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यावर / पदपथावर रचना उभारण्यासाठी परवानगी देताना वाजवीरित्या पदपथ, रस्ते, पादचारी मार्ग नागरिकांना अडथळाविरहित राहतील याची खबरदारी घेऊन संविधानाच्या कलम 21 नुसार विहित नागरिकांच्या मुलभूत हक्कांना बाधा येणार नाही याची दक्षता घ्यावी. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना कायदा 1966 नियम 3 मधील उपनियम 4 नुसार विकास आराखडा तयार करताना नियोजन प्राधिकरणाने व स्थानिक स्वराज्य संस्थेने ध्वनी प्रदूषण विषयक विहित पातळी राखली जाईल व ध्वनी प्रदुषण विषयक तरतूदींचे कटाक्षाने पालन होईल याकडे लक्ष द्यावे. ध्वनीप्रदूषण (विनियमन व नियंत्रण) नियम 2000 मधील 3 च्या उपनियम 4 चे पालन करण्याबाबत प्रादेशिक आराखडा व विकास आराखडा तयार करताना आवश्यक कार्यवाही करावी. हेलिपेंड तयार करण्यासाठी परवानगी विषयक अर्जावर विचार करताना प्रस्तावित हेलिपॅडच्या ठिकाणी संभाव्य ध्वनीप्रदूषणाची पातळी विचारात घ्यावी.

             ध्वनी प्रदूषण नियम 2000 मधील नियम 5 उपनियम 1 नुसार पूर्वपरवानगी शिवाय ध्वनीक्षेपक यंत्रणा वापरण्यात येणार नाही, जाहिरात फलक, फ्लेक्स, तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात येणाऱ्या मंडप व तत्सम रचना जवळ वा त्या ठिकाणी पूर्वपरवानगी शिवाय लावण्यात येऊ नयेत. रस्त्यावर व पादचारी मार्ग खोदण्यात येऊ नयेत. या अटी तात्पुरत्या स्वरुपात मंडप व तत्सम रचना उभारण्यासाठी परवानगी देतेवेळी स्पष्टपणे परवानगी पत्रात नमूद करण्यात याव्यात. ध्वनीप्रदूषण नियमामधील परिशिष्टात नमूद ध्वनी प्रदूषण विषयक विहित मर्यादा पातळीचे निकष वेळेसह परवानगी पत्रात नमूद करून त्याच्या पालनाची अट समाविष्ट करावी. हे आदेश व यापूर्वीचे आदेश सर्व जाती धर्मांच्या उत्सवाना व प्रार्थनास्थळांना लागू राहतील.

            या सूचनांची कार्यवाही करण्याची जबाबदारी महानगरपालिका क्षेत्रात संबंधित आयुक्त तसेच नगरपालिका व ग्रामीण क्षेत्रासाठी जिल्हाधिकारी यांच्या वतीने संबंधित तालुक्याचे तहसिलदार यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. हे नियम सर्व जाती धर्मांच्या उत्सवांना व प्रार्थना स्थळांना लागू राहतील. त्यामुळे प्रत्येक सण, उत्सवा पुर्वी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा भंग होणार नाही याची दक्षता सर्व संबंधीत कार्यालय प्रमुखानी आपल्या अखत्यारीतील कामे पार पाडताना घ्यावी,  असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖