भिलवडी ता. २० : दारु पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरुन पत्नीचा खून करणारा पती गणपत दाजी पवार ( वय ५०, मुळ - आंबेगांव, ता. मावळ, जि. पुणे, सध्या - धनगांव, ता. पलूस, जि. सांगली ) यास दोषी धरून विटा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. भागवत यांनी जन्मठेप व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावल्याचे सहायक पोलिस निरीक्षक भगवान पालवे यांनी सांगितले.
आरोपी गणपत पवार याने त्याची पत्नी कांताबाई हिने दारु पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरुन चिडून शिवीगाळ करुन काठीने तिचे तोंड, पाय व पाठीवर तसेच कोयत्याने कपाळावर उजव्या बाजुस, हनवटी, गळ्यावर मारुन गंभीर जखमी करुन तिचा १८ सप्टेंबर २०२१ रोजी पहाटे चारच्या सुमारास धनगांव गावच्या हद्दीत शेतजमीन गट नंबर ४१२ मध्ये असलेल्या झोपडीमध्ये खून केला होता. याबाबत नवनाथ गोवर्धन राठोड ( तागडखेल, ता. आष्टी, जि. बीड ) यांनी भिलवडी पोलिसांत फिर्याद दिली होती. त्याच्यावर गुन्हा दाखल करून आरोपी गणपत पवार यास अटक करण्यात आली होती. ७ ऑक्टोबर २०२१ पासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. सदरचा गुन्हा विटा येथील जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला होता. त्याची सुनावणी सुरू होती. आज आरोपीस दोषी धरून त्यास वरील शिक्षा सुनावण्यात आली. असे श्री. पालवे यांनी सांगितले. या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक संदिप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक रितु खोखर, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भगवान पालवे, तत्कालीन तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक कैलास कोडग, पोहेकाँ. चंद्रकांत कोळी, पो.काँ. मंगेश गुरव, पो.हे.काँ तानाजी देवकुळे, पो.काँ. धीरज खुडे, पो.काँ. विशाल पांगे पो. ना.शिवाजी कोकाटे पो. काँ. प्रविण जाधव पो. काँ. गणेश चव्हाण यांनी केला. सदर गुन्ह्याचे सुनावणीकामी सरकारी वकील व्ही. एम. देशपांडे, कोर्ट अंमलदार अंकुश लुगडे, माधुरी सदाकळे यांनी सरकार पक्षास सहकार्य केले.
हेही पहा ---
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖