BANNER

The Janshakti News

बँकांनी पीक कर्ज व प्राथमिक क्षेत्राकरिता कर्ज वाटप गतीने करावे - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी            सांगली दि. 20 (जि.मा.का.): खरीप हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक साधनसामग्री वेळीच उपलब्ध होणे महत्वाचे असून यासाठी पतपुरवठा करणाऱ्या सर्व बँकांनी शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. याबरोबरच प्राथमिक क्षेत्राकरीता देण्यात आलेले कर्ज वाटपाचे उद्दिष्ट  बँकांनी गतीने पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.

            जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला बँक ऑफ इंडियाचे विभागीय प्रमुख राजीव कुमार सिंग, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ, आरबीआयचे अग्रणी अधिकारी बिस्वजीत दास, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निलेश चौधरी, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सांगली  विवेक कुंभार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे श्री. पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या नंदिनी घाणेकर, माविम चे व्यवस्थापक कुंदन शिनगारे, बीओंआय आरसेटी चे संचालक महेश पाटील तसेच जिल्ह्यातील बँकांचे व्यवस्थापक व विविध महामंडळांचे जिल्हा व्यवस्थापक उपस्थित होते.            बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी पीक कर्ज वाटपाचा बँक निहाय आढावा घेतला. चालू वर्षाचे पीक कर्ज वाढवून उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांना पीक विमा व हवामान आधारित फळ पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदण्याकरिता बँकांनी पीक विमा हप्ते विमा कंपनीकडे वेळेत वर्ग करावेत. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्याकरिता बँका आणि विविध महामंडळानी परस्पर समन्वय ठेवून लाभार्थ्यांना लाभ द्यावा. कर्ज वाटपात अत्यल्प काम झालेल्या शासकीय विभाग, महामंडळे व बँकांना कामगिरी सुधारण्यासाठी संबंधितांना नोटीस बजवण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.            कृषी पायाभूत विकास निधी (AIF व AHIDF), प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME), पीएम विश्वकर्मा, पीएमइजीपी,एनएलएम,  सीएमइजीपी, पीएम स्वनिधी व महामंडळाच्या योजनांचा लाभ देऊन नवनवीन व्यवसाय उभारणीस प्रोत्साहन देण्याबाबत बँकाना व सर्व शासकीय विभागांना  जिल्हाधिकारी यांनी सूचना केल्या.
जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचे प्रस्ताव बँकांनी वेळेत पाठवण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ यांनी जिल्हा वार्षिक पतपुरवठा सन २०२४-२५ अहवालाची माहिती दिली. त्यांनी वार्षिक पतपुरवठा आराखड्या अंतर्गत कृषी, सूक्ष्म, लघु व मध्यम क्षेत्राचे एकूण प्राथमिक क्षेत्राचे उद्दिष्ट ८ हजार ७९० कोटी व अप्राथमिक क्षेत्राकरिता ३ हजार ५०० कोटी असे एकूण उद्दिष्ट १२ हजार २९० कोटीचे ठेवल्याचे सांगितले. सन २०२४-२५ करिता गाई-म्हैशी व मासेमारी करिता कर्ज वाटपाचे आवाहन नाबार्ड जिल्हा व्यवस्थापक निलेश चौधरी यांनी केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी PMFME व AIF योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन बँकांना केले. यावेळी उपस्थितांना उप आयुक्त पशुसंवर्धन विभाग डॉ. अजय थोरे यांनी NLM योजना व AHIDF योजने संदर्भात उपस्थितांना माहिती दिली.


            बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, सांगली यांनी सन २०२४-२५ मधील प्रशिक्षणाचा आढावा दिला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी नवनवीन उपक्रमांचे प्रशिक्षण आयोजित करून जास्तीत जास्त नागरिकांना लाभ देण्याबाबत सूचना केल्या.

            या बैठकीत वार्षिक पतपुरवठा आराखडा सन २०२४-२५ व आरसेटी च्या वार्षिक कार्यअहवालाचे चे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गत वर्षात CMEGP योजनेत चांगली कामगिरी केलेल्या बँकांना प्रमाणपत्र जिल्हाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले. गत वर्षात महिला बचत गटांना उमेद अभियान, माविम व इतर वैयक्तिक लाभार्थ्यांना पीएमस्वनिधी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या योजना चांगल्याप्रकारे राबवल्याबद्दल संबंधित महामंडळ व सर्व बँकांच्या कामाचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी कौतुक केले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


Youtube Link
👇

https://youtube.com/@thejanshakatinews5707

Portal Link
👇

www.thejanshaktinews.in

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖