BANNER

The Janshakti News

अन्न व औषध प्रशासनामार्फत 45 लाखावर पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त
 

            सांगली, दि. 27 (जि. मा. का.) :  अन्न व औषध प्रशासन विभागाच्या विशेष भरारी पथकाने आज सांगली शहरामध्ये कारवाई करुन 45 लाख 25 हजार 960 रूपये किंमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थ पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.


            याबाबत दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, विशेष भरारी पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा अधिकारी श्री. स्वामी व श्री. पवार यांनी जुने बुधगाव रोड येथील अलताफ रमजान मुलाणी यांच्या शेडची तपासणी केली असता या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले पानमसाला व सुगंधित तंबाखू यांचा साठा आढळून आला. तसेच शेडच्या समोर उभ्या असलेल्या दोन वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये देखील पानमसाला व सुगंधित तंबाखू यांचा साठा आढळून आला. अन्न व औषध प्रशासन, सांगलीच्या पथकाने या ठिकाणी कारवाई करून 45 लाख 25 हजार 960 रूपये   किंमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा व 2 वाहने (किंमत 5 लाख 50 हजार रूपये) जप्त करुन ताब्यात घेवून शेड सीलबंद करण्यात आले. या प्रकरणी पुढील तपासाकरीता शहर पोलीस स्टेशन, सांगली येथे प्रथम खबर अहवाल दाखल करण्यात आला आहे.


            ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री यांच्या नियंत्रणाखालील विशेष भरारी पथकाने अरविंद कांडेलकर, श्री. समुद्रे व सहायक आयुक्त (अन्न) श्री. मसारे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्री. स्वामी व श्री. पवार यांनी केली आहे.

जिल्ह्यातील सर्व व्यवसायिकांनी प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा, विक्री करु नये असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा, विक्री करताना आढळल्यास त्यांचविरुध्द अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖