BANNER

The Janshakti News

अ‍ॅलर्जी.....?                                 अ‍ॅलर्जी.....?

कोणाला कशाचे वावडे असते, तर कोणाला कशाचे. अ‍ॅलर्जी हा याचाच एक समानार्थी शब्द म्हणावा लागेल. अनेक स्त्रिया कुंकू लावतात; पण एखादीलाच त्यामुळे कपाळावर पुरळ येते, खाज येते. काँग्रेस गवताला अनेकजण हात लावतात; पण एखाद्यालाच त्वचेवर काळे चट्टे, खाज अशी लक्षणे दिसून येतात. यावरून एक लक्षात येईल की, अ‍ॅलर्जी ही व्यक्ती विशिष्ट आहे. धुळीत काम केल्यावर काहीजणांना खूप शिंका येतात. काहींना दम्याचा त्रास होतो; बऱ्याच लोकांवर मात्र काहीच दुष्परिणाम होत नाही.

अ‍ॅलर्जी करणारे पदार्थ शरीरात गेल्यानंतर शरीरातील पेशी त्यांच्याविरुद्ध प्रतिद्रव्ये तयार करतात. लस दिल्यानंतर याच प्रक्रियेतून रोग प्रतिबंधक प्रतिद्रव्ये वा अँटीबॉडीज् तयार होतात. अ‍ॅलर्जीत चुकीच्या प्रतिसादामुळे विपरीत परिणाम घडवून आणणाऱ्या अँटीबॉडीज तयार होतात. या अँटीबॉडीज्च्या परिणामामुळे हिस्टामीन, संथगतीने क्रिया करणारा 'अ' पदार्थ अशा घटकांची निर्मिती होते. या घटकांच्या परिणामामुळे छोटया श्वासनलिकांचे स्नायू आकुंचन पावतात. रक्तवाहिन्या रुंदावून रक्तदाब कमी होतो. याखेरीज पूरळ येणे, खाज येणे अशी स्थानिक लक्षणेही दिसतात. रुग्णाला चक्कर येते. श्वास घ्यायला त्रास होतो. गंभीर प्रकारच्या अ‍ॅलर्जी मध्ये व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.

हे टाळण्यासाठी कोणत्या पदार्थाची अ‍ॅलर्जी आहे ते शोधून त्याचे डिसेन्सेटायझेशन करता येते. डिसेन्सेटायझेशन म्हणजे ज्या पदार्थाची अ‍ॅलर्जी आहे तो पदार्थ आधी अल्प प्रमाणात व त्यानंतर हळूहळू वाढत्या प्रमाणात इंजेक्शनद्वारे शरीरात सोडला जातो. असे केल्याने त्या पदार्थाची अ‍ॅलर्जी राहत नाही. तसेच कोणतेही इंजेक्शन देताना आधी थोड्या प्रमाणात त्वचेत टोचून अ‍ॅलर्जी आहे का ते बघता येते. अ‍ॅलर्जी असेल त्या पदार्थापासून (जसे धूळ, परागकण इ.) दूर राहणे हाही अ‍ॅलर्जी पासून वाचण्याचा एक मार्ग आहे. हिस्टामीन विरोधी औषघे, स्टेरॉईड सारखी औषधे यांचाही उपयोग केला जातो.

संकलन-
निसर्ग उपचार तज्ञ 
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे. 
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक

हेही पहा -----➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖