BANNER

The Janshakti News

सांगलीच्या जागेचा मविआमधील तिढा येत्या 24 तासात सुटेल..खासदार संजय राऊत




कुंडल : वार्ताहर                  दि. ०६ एप्रिल २०२४

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील लोकसभेची उमेदवारी चंद्रहार पाटील यांना दिली आहे ही उमेदवारी सर्वांना विश्वासात घेऊनच दिली होती पण काही लोक वेगळी भूमिका घेत आहेत परंतु येत्या 24 तासात सांगलीतील विषय मार्गी लागेल असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

ते कुंडल (ता.पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यावर भेटी दरम्यान बोलत होते. यावेळी आमदार अरुणअण्णा लाड, क्रांतीचे अध्यक्ष शरद लाड, जिल्हाध्यक्ष संजय विभूते, साजन सातपुते, पै.चंद्रहार पाटील, कुंडलिक एडके, मोहन पाटील, सुरेश शिंगटे यांच्यासह तालुक्यातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

राऊत म्हणाले, सांगलीत आलो आणि बापूंच्या समधीचे दर्शन घेतले नाही असे शक्य नाही. आमदार लाड तत्वांना बांधील असल्याने त्यांनी महाविकास आघाडी सोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. सांगलीतील वातावरण ढवळले आहे ते काही लोकांच्यामुळे. या मतदार संघाचा पेच राहू नये यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. 

देशात एक वेगळं वातावरण आहे ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात आपलं रक्त सांडले त्यांच्या विरुद्ध असलेले इंग्रज जेव्हा देश सोडून जात होते तेव्हा त्यांचा बिस्तारा उचलणारे ते हे आत्ताचे सरकार चालवणारेच होते.

आमची भूमिका ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठीची होती आणि नेहमी असणार. मुंबई ही राज्याची राजधानी रहावी यासाठी आम्ही गेली 50 वर्षे प्रयत्न करतोय, पण हे सरकार मुंबई आपल्यातून तोडण्यासाठी प्रयत्न करत आहे, यासाठी लढा दिला म्हणून आम्हाला तुरुंगात टाकलं. 

चंद्रहार पाटील हा एका शेतकऱ्यांचा मुलगा आहे यांना बळ देणे आपलं कर्तव्य आहे. शिवसेनेने लहाणातील लहान माणसांना मोठं करायचं ठरवलं आहे कारण ज्या मोठ्या माणसांना मोठं केलं ती आम्हाल सोडून गेली असा टोला मुख्यमंत्र्यांना नाव न घेता लगावला.

स्वातंत्र्य वाचवायचे असेल तर यंदा मोदींचा माणूस निवडून पाठवू न देता, मोदी यंदा 200 च्या आत लटकतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आमदार लाड म्हणाले, 2014 सलापासून देशात यांनी गोंधळच गोंधळ घातला यात आपल्यातील काही गोंधळी जाऊन मिळालेत. त्यामुळे देशात गोंधळ वाढला आहे. पण गोंधळ घालणाऱ्यांबाबत जनता योग्य वेळी निर्णय घेईल. कोणालाही कितीही गोंधळ घालुदे आपण भाजपाने काय केलं, देशाची अधोगती कशी केली हे सर्वश्रुत आहे, आपल्यातील इंडिया आघाडी मोडीत काढणाऱ्यांनी एक व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आमदार जयंत पाटील यांनी बूथ कमिटीतून सांगितल्या प्रमाणे काम करून, आघाडी धर्म पळाला तर विरोधकांना चितपट करणे सोपं होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी. बापू लाड यांच्या समाधीचे दर्शन घेताना खासदार संजय राऊत, आमदार अरुणअण्णा लाड, पै.चंद्रहार पाटील, शरद लाड आदी.


हेही पहा ---





◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆