BANNER

The Janshakti News

वनांच्या, पर्यावरणाच्या रक्षणात प्रत्येकाचा सहभाग आवश्यक...; कुंडल वन प्रबोधिनी महासंचालक जे.पी.त्रिपाठी


======================================
======================================

        सांगली दि. 22 (जि.मा.का.) : वनांचे संरक्षण झाले तरच भविष्यात आपल्याला हवा, पाणी व अन्न यासंबंधीच्या गरजा पूर्ण होणार आहेत. सध्या नैसर्गिक संसाधनांवर कमालीचा ताण पडत असून, स्थानिकांच्या सहभागानेच आपण वनांचे रक्षण व वनसंपदेत वाढ करून पर्यावरणीय प्रश्नांची सोडवणूक करू शकतो. त्यासाठी प्रत्येकाचा सहभाग व योगदान आवश्यक आहे, असे प्रतिपादन कुंडल वन प्रबोधिनीचे महासंचालक जे. पी. त्रिपाठी यांनी केले.

             जागतिक वन दिनानिमित्त कुंडल वन प्रबोधिनी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्य वनसंरक्षक मदन कुलकर्णी व प्रबोधिनीचे संचालक डॉ. शैलेंद्रकुमार जाधव उपस्थित होते.


            संचालक डॉ. शैलेंद्रकुमार जाधव  यांनी जागतिक वन दिवस साजरा करण्यामागची भूमिका विशद केली. संयुक्त राष्ट्रसंघाने दि. २८ नोव्हेंबर २०१२ ला आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा करण्याचा ठराव मंजूर केल्यानंतर, वनांचा मानवी जीवनाशी असलेला सरळ संबंध, जंगलावर अवलंबून असणारी प्राचीन औषध प्रणाली आणि सोबतच जंगलावर आपली उपजीविका भागवणाऱ्या जमाती आणि जैवविविधता याबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी आणि जंगल निर्माण, संवर्धन आणि संरक्षणाच्या उद्देशांसाठी २१ मार्च २०१३ पासून आंतरराष्ट्रीय वन दिन दरवर्षी साजरा करण्यात येतो.


            या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय वन दिनाची  संकल्पना ‘फॉरेस्टस अँड इनोव्हेशन : न्यू सोलूशन्स फॉर बेटर वर्ल्ड’ (Forests and Innvation : New Solutions for Better World) अशी आहे.

            वन विषयक आपले ज्ञान अद्यावत करून,नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून वनसंपदेत वाढ करणे, नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण करणे, प्रत्येक परिसंस्थेचे, जैवविविधतेचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मदन कुलकर्णी यांनी संगितले.

यावेळी प्रशिक्षणार्थी वनपरिक्षेत्र अधिकारी कु. निशी साहू, दुर्गेश पांडे, अमित सिंग चंडेल यांनीही समयोचित विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रामदास पुजारी यांनी केले.

या प्रसंगी सेवानिवृत्त सहायक वनसंरक्षक रामदास पुजारी व दत्तात्रय शेटे, वनक्षेत्रपाल चैतन्य कांबळे व गायत्री वसावे, व्याख्याते सी.ए. कुलकर्णी तसेच वनक्षेत्रपाल प्रशिक्षण सत्र 11 मधील व  मध्यप्रदेश राज्यातील 37 प्रशिक्षणार्थी वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆