BANNER

The Janshakti News

मकरसंक्रांत आणि त्याचे आयुर्वेदातील महत्व




======================================
======================================



मकरसंक्रांत हा 'तीळ गूळ घ्या, गोड गोड बोला' अशा गोड शब्दांनी साजरा केला जाणारा वर्षातील पहिला उत्सव होय. लग्नानंतरची पहिली संक्रांत, तसेच नवजात बालक असणाऱ्या घरात संक्रांत विशेषत्वाने साजरी केली जाते. हलव्याचे दागिने, काळ्या रंगाचे कपडे घालून साजरा केला जाणारा एकमेव सण म्हणजे संक्रांत. संक्रांतीला इतके महत्त्व येण्यामागचे मुख्य कारण म्हणजे यानंतर सुगीचे दिवस येतात, शेतातील धान्य तयार झालेले असल्याने बळिराजा आनंदात असतो. म्हणूनच, भारतासारख्या कृषिप्रधान देशात मकर संक्रांतीला महत्त्वाचे स्थान आहे.
मकर संक्रांत येते त्या हेमंत शिशिर ऋतूत वातावरणात वाढलेली थंडी व कोरडेपणा यांचे निवारण करण्यासाठी तीळ व गूळ यांच्यासारखे पदार्थ खाण्यास आयुर्वेदातही सुचविलेले आहे. उसापासून बनविलेले गुळासारखे पदार्थही या दिवसात आवर्जून खावेत असे सांगितले आहे. स्निग्ध द्रव्यांपासून बनविलेली उटणी वापरणे,उन्हात बसणे हेसुद्धा आयुर्वेदाने सुचविलेल्या उपचारात मोडते आणि नेमके हेच सर्व आपण आपल्या संस्कृतीनुसार वर्षानुवर्षे करत आलो आहोत. संक्रांतीच्या दिवशी तिळाचा अधिकाधिक उपयोग करण्याची पद्धत आहे.
     तिळगुळ खाण्याबरोबर तीळमिश्रित पाण्याने स्नान करणे, तीळ अग्नीवर टाकून धूप करणे, तीळ वाटणे वगैरे निरनिराळ्या मार्गांनी तीळ वापरायचे असतात. आयुर्वेदाने सांगितलेला अभ्यंगही औषधांनी सिद्ध तीळ तेलाचाच करायचा असतो. स्निग्ध द्रव्यांचे उटणे बनविताना त्यात पोचला हितकारक तीळ असावीच लागतात. पतंग उडविण्याचा निमित्ताने अंगावर ऊन घेतले जाते.
इतर सणासुदीच्या दिवसात तितकीशी मान्यता नसणारे काळ्या रंगाचे कपडे संक्रांतीच्या दिवशी मात्र आवर्जून घातले जातात, कारण काळ्या रंगामुळे सूर्य शक्ति अधिकाधिक आकर्षित करून घेतली जाते. यामागे थंडीचे निवारण हा हेतू असतोच, बरोबरीने सूर्यशक्ती, सूर्याचे तेज आरोग्याला उत्तम हातभार लावणारे असते.
         आयुर्वेदात सूर्याचा दृष्टी म्हणजेच डोळ्यांची संबंध जोडलेला दिसतो. सूर्य हा विश्वातील प्राण आहे आणि या सूर्यामुळेच डोळ्यात प्राण असतो असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. शरीराचा फीकटपणा, निस्तेजता कमी होण्यासाठी सूर्यकिरण उत्तम आहेत. वाढलेल्या पित्ताचा पिवळेपणा आणि हिरवेपणा सूर्यकिरणांनी नाहीसा होतो व सौंदर्य तसेच बळाची प्राप्ती होते त्यामुळेच निरोगी दीर्घायुष्याचा लाभ होतो.
सूर्यनमस्कार हा व्यायाम प्रकार ही सहज करता येण्यासारखा व अनेक आसनांचा एकत्रित फायदा करून देणार आहे. नियमित व योग्य प्रकारच्या सूर्यनमस्कारामुळे हृदय, फुप्फुसाची कार्यक्षमता वाढण्यास, शरीरशक्‍ती वाढल्यास तसेच शरीराला बळकटी येण्यास अतिशय चांगला उपयोग होतो.
भारतासारख्या देशात सुदैवाने सूर्यप्रकाशाची कमतरता नाही. उगवत्या सूर्याला अर्ध्य देण्याची पूर्वीपासूनच प्रथा भारतीय संस्कृतीमध्ये होती. आपल्याला जरी अर्ध्य देता आले नाही तरी कोवळ्या उन्हात दहा ते पंधरा मिनिट बसणे आपल्याला अशक्य नाही. त्याचबरोबर ध्यान व प्राणायाम केले तर दुधामध्ये साखर पडल्यासारखे होईल.
म्हणूनच सूर्यप्रकाशाचा आपल्या आरोग्यासाठी चांगला वापर करुन घेण्यासाठी संक्रांत साजरी केली जाते. संक्रांतीच्या निमित्ताने सुरुवात केलेली सूर्योपासना जर वर्षभर सुरू ठेवली तर निश्चितच संपूर्ण वर्ष आरोग्यदायी होईल.

संकलन- 
निसर्ग उपचार तज्ञ 
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे. 
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक 
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆