BANNER

The Janshakti News

दूध चांगले की अंडे ?

 

======================================
======================================


दूध न पिणारे वा न आवडणारे म्हणतील की, अंडे चांगले. याउलट अंडी न खाणारे म्हणतील, दूधच उत्तम. अंडे म्हणजे मांसाहार. मांसाहार चांगला कि शाकाहार चांगला, या वादामध्ये न पडता केवळ पोषण तत्वाच्या दृष्टीने दोहोंचा विचार केल्यास आपल्याला काय दिसते ते पाहूया.

सामान्यपणे एक अंडे ज्या किंमतीत मिळते त्याच पैशात १०० मिली म्हशीचे दूध मिळू शकेल म्हणजे सारख्याच किंमतीला एक अंडे किंवा १०० मिली म्हशीचे दूध येईल. या दोहोंची तुलना केल्यास काय दिसते? 

एका अंड्यात (वजन अंदाजे ६५ ग्रॅम) ६.२ ग्रॅम प्रथिने, ६.२ ग्रॅम मेदपदार्थ व ०.५ ग्रॅम क्षार असतात. क्षारात ३० मिग्रॅ कॅल्शियम व १.५ मिग्रॅ लोह असते. एका अंड्या पासून सुमारे ७० कॅलरी इतकी ऊर्जा मिळते. अंड्यातील प्रथिनांची निव्वळ उपयुक्तता (Net protein utilization) १०० इतकी म्हणजे सर्व प्रथिनांमध्ये सर्वात जास्त असते. 

अंड्यात जीवनसत्त्वेही असतात. अंड्यातील प्रथिने अव्वल दर्जाची असतात. इतर प्रथिनांची गुणवत्ता ठरवण्यासाठी अंड्यातील प्रथिनांचा मापदंड म्हणून वापर करतात. अंड्यातील एक दुर्गुण म्हणजे त्यात सुमारे १४० मिग्रॅ इतके कोलेस्ट्रॉल असते. त्यामुळे हृदयविकार असणाऱ्यांनी अंडी कमी खावीत. 

म्हशीच्या १०० मिली दुधात ८ ग्रॅम मेदपदार्थ, ४ ग्रॅम प्रथिने, ४.५ ग्रॅम दुग्धशर्करा १९० मीग्रॅ कॅल्शियम, ०.१८ मिग्रॅ लोह, ०.९ मिग्रॅ जीवनसत्त्व 'क' व ०.७ ग्रॅम क्षार असतात. १०० मिली म्हशीच्या दुधातून ११७ कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. यातील प्रथिनांची निव्वळ उपयुक्तता ७५ असते.

आता अंडे व त्याच किमतीचे दूध यांचे अंतरंग तुमच्या समोर आहेत. एक मात्र लक्षात घ्या कि, दुधात भेसळ होण्याची शक्यता खूप जास्त असते व ते लवकर खराब होते याउलट अंडी खूप दिवस टिकतात. 

प्रथिने मिळवण्यासाठी अंडी चांगली तर मेदपदार्थ अर्थात ऊर्जा तसेच कॅल्शियम मिळवण्यासाठी दूध चांगले. त्यामुळे अंडी व दूध हे दोन्ही आपापल्या परीने चांगले आहेत. प्रश्न तुमच्या आवडीचा, आवश्यकतेचा आहे.

संकलन-
निसर्ग उपचार तज्ञ 
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे. 
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक
संपर्क - ९२ ७१ ६६९ ६६९
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆