तासगाव : वार्ताहर दि.२८ जून २०२३
तासगाव : अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंच अंगीकृत ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियान संघटनेचा तासगाव तालुका मेळावा रविवार दि. 25 जून 2023 रोजी पंचायत समिती सभागृह तासगाव येथे 11.3o ते 3.3o या वेळेत संपन्न झाला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री जगन्नाथ मोरे पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
गजानन पाटील आणि आर्. एन. मोहिते यांनी गायलेल्या खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे या साने गुरुजींच्या सर्व धर्मीय प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील दिवंगत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
उपस्थित प्रमुख पाहुणे आणि मान्यवर ज्येष्ठ नागरिकांचे शाब्दिक स्वागत करून कार्यक्रमाचे संयोजक जिल्हा सचिव गजानन पाटील यांनी प्रास्ताविक केले.
"प्रत्येक ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्तीच" या एक ओळीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित असून त्या अंतर्गत मागण्यांचे सविस्तर विवेचन केले. सरकारला मताचीच भाषा कळते म्हणून आपला प्रस्ताव 2024 च्या निवडणुकीपूर्वी मान्य करून घ्यायचाच या उद्देशाने ज्येष्ठ नागरिकांची स्वतंत्र मतदार यादी तयार करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.
केंद्र सरकार कडील या प्रस्ताव मंजुरीत एकत्र कुटुंब पद्धतीचे बळकटीकरण, कौटुंबिक आर्थिक सक्षमीकरण, ज्येष्ठांचे स्वास्थ्यपूर्ण आरोग्य, तरुणांच्या आत्महत्येवर नियंत्रण, मार्केटमधील क्रयशक्तीची वाढ, तरुण आणि सुशिक्षित बेकारांच्या हाताला काम, उद्योग व्यवसायासाठी शहराकडे जाणाऱ्या लोंढ्यावर नियंत्रण आणि जाती-धर्माच्या पलीकडील मानवतावादी जीवनाची सुरुवात होईल. हे सर्व आजच्या सुखकर समाज जीवनासाठी अत्यावश्यक असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील, उपाध्यक्ष नारायण सावंत, कोषाध्यक्ष चंद्रशेखर मोरे, कायदेविषयक सल्लागार एडवोकेट किरण पाटील , यशस्वीता स्वयंसेवी संस्थेच्या एनजीओ सौ सुनीता बने मॅडम, वाळवा तालुक्याचे अध्यक्ष ) डी पी सावंत , सचिव आर्. एन मोहिते, प्राचार्य नेवरीकर सर, आटपाडी तालुक्याचे भास्कर गायकवाड, अण्णासाहेब भोरे या पाहुण्यांचा फेटा व गुलाब पुष्प देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला.
संघटनेचे राज्य समन्वयक तथा जिल्हा सचिव गजानन पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नागरिक सेल च्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते फेटा, शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मान व विशेष सत्कार करण्यात आला.
यानंतर डॉ. साळी, प्राचार्य माणिकराव पाटील, प्राचार्य शिवाजीराव पाटील, निंबळकचे उपसरपंच मेजर शरद पाटील, विसापूरचे भास्कर माने पाटील सर, निमणी हायस्कूलचे गुरव सर, हातनूर चे पैलवान आत्माराम तात्या, निमणी चे प्रकाश यादव, मांजर्डे चे हनुमंत साळुंखे सर इत्यादी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे पाहुणे जिल्हा उपाध्यक्ष नारायण सावंत, कोषाध्यक्ष चंद्रशेखर मोरे, वाळवा सचिव आर्. एन. मोहिते, वाळवा अध्यक्ष डीपी सावंत, एडवोकेट किरण पाटील, सौ सुनीता बने आदी मान्यवरांनी संघटनेची भूमिका, वाटचाल, ध्येय धोरणे आणि प्रस्ताव मान्यतेसाठी कराव्या लागणाऱ्या सर्व प्रकारच्या उपक्रमाची माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री जगन्नाथ मोरे पाटील यांनी आजच्या ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथा मांडल्या. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी आपापल्या क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन देशाचे स्थैर्य आणि प्रगती तसेच विकासात फार मोठे काम केले आहे. पूर्ण क्षमतेने देशसेवा केली याशिवाय आजची तरुण आणि कर्तबगार युवा पिढी देशाला अर्पण केली. आता वयोमानानुसार शारीरिक कार्यक्षमता कमी झाल्याने पूर्वीसारखे काम होत नाही. हात पाय, कान डोळे यांचीहीकार्यक्षमता कमी झाली. घरी येण्याचा आर्थिक स्रोत कमी झाला. त्यामुळे वैयक्तिक आरोग्याचा आणि औषध पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे.
आत्तापर्यंत आम्ही सरकारचे सर्व कर भरले आहेत, सर्व कायदे कानून पाळले आहेत, आम्ही कोणता गुन्हाही केला नाही, आता आमच्या अपेक्षाही काही नाहीत, आता आम्हाला काहीही मिळवायचे नाही. या सर्व पार्श्वभूमीवर आम्हाला फक्त आमच्या जीवनाची संध्याकाळ सोनेरी हवी आहे, त्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा आणि आमचा एक ओळीचा प्रस्ताव आणि त्या अंतर्गत च्या सर्व मागण्या मान्य कराव्यात एवढीच माफक अपेक्षा. असे विचार मांडून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
शेवटी जिल्हा सचिव गजानन पाटील यांनी अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंच अंगीकृत जेष्ठ नागरिक जीवनगौरव अभियान संघटनेची सन 2023 ते 2026 या तीन वर्षाकरिता नवीन कार्यकारिणी जाहीर केली आणि मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष मोरे पाटील यांनी त्यांना निवडीचे अधिकृत पत्र आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचे अभिनंदन केले.
आज पर्यंतचे आमचे सामाजिक क्षेत्रातील काम पाहून संघटनेने आमचे वर टाकलेली संघटनात्मक जबाबदारी पूर्ण क्षमतेने आम्ही पार पाडू व त्या पदास न्याय देऊ आणि झालेली निवड आमच्या कार्यकर्तृत्वाने सार्थ ठरवू अशी ग्वाही नूतन पदाधिकारी यांनी सभागृहाला दिली.
नूतन सचिव श्री अरुण पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले, राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. चहापानानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला.
प्रस्तावा अंतर्गत च्या मागण्या
1. साठ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीय व्यक्तीस जेष्ठ नागरिकत्वाचा दर्जा.... मग तो कोणत्याही जात, धर्म, लिंग, प्रांत आणि भाषेचा असो ..... राष्ट्रीय संपत्तीचा दर्जा हा त्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचा कायदेशीर हक्क असेल.
2. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकास शासकीय कोशातून दरमहा दहा हजार रुपये मानधन मिळण्याचा हक्क असेल.. ... संदर्भ मार्च 2019 च्या राष्ट्रीय सर्वेनुसार देशातील प्रत्येक व्यक्तीची दरडोई उत्पन्न एक लाख 26 हजार रुपये.
3. देशातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकास मिळणाऱ्या सामाजिक सेवा विशेष दर्जाच्या मिळाव्यात, उदा. आरोग्य, वैयक्तिक संरक्षण, पादचारी मार्ग, वाचनालय, उद्याने, स्वच्छतागृहे, करमणूक केंद्र, विरंगुळा केंद्र इत्यादी.
4. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाच्या सामाजिक आदर आणि सन्मानासाठी ॲट्रॉसिटी कायद्याच्या धरतीवर विशेष कायदेशीर आचारसंहिता निश्चित केली जावी.
5. प्रस्तावाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र व
राज्य शासन स्तरावर कॅबिनेट दर्जाचे स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक सन्मान मंत्रालय स्थापन करावे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆