BANNER

The Janshakti News

क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाची सांगता

=====================================
=====================================

कुंडल | दि. २३ मार्च २०२३
----------------------------------------------------------------------

क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाची सांगता झाली. हा गाळप हंगाम शेतकरी, तोडणी व वाहतूक कंत्राटदार, अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे यशस्वी रित्या पार पडला असल्याचे मत आमदार अरुणअण्णा लाड यांनी यावेळी व्यक्त केले.

ते कुंडल (ता.पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम सांगता कार्यक्रमावेळी साखर पोत्यांचे पूजन आणि काटा पूजन प्रसंगी बोलत होते यावेळी उपाध्‍यक्ष उमेश जोशी, कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे प्रमुख उपस्थित होते.

आमदार लाड म्हणाले, यंदा कारखान्याने ९ लाख ३० हजार १६६ मेट्रिक टन ऊस गाळप केला आहे यातून ९ लाख ५६ हजार ३०० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन १४३ दिवसांत झाले आहे. यंदा निव्वळ साखर उतारा १०.३१ टक्के आहे परंतु, इथेनॉल निर्मितीसाठी सिरप व बी हेवी मोलॅसिसमध्ये वळवलेल्या साखरेचा विचार करता साखर उतारा सुमारे १२.६५ टक्के येत आहे परंतु हा साखर उतारा वसंतदादा साखर संस्था पुणे यांच्याकडून प्रमाणित करून घेतल्यावरच जाहीर करता येईल.

साखर कारखानदारी सध्या अडचणीत जरी असली तरी काटेकोर आर्थिक नियोजनाच्या जोरावर कारखानदारी यशस्वी होऊ शकते हे आजवर क्रांती ने दाखवून दिले आहे.

कारखान्यांनी तयार केलेली वीज ही प्रदूषण विरहित असल्याने जुन्याच दराने ती शासनाने खरेदी केली पाहिजे. कारखाण्याकडून ऊसविकास सारख्या पथदर्शक प्रकल्पातून ऊस क्षेत्र वाढवून आत्त्यधुनिक प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे मिळेल याकडे लक्ष दिले जात आहे. ऊस पिकाचे शरीर शास्त्र लक्षात घेऊन खर्च केला तर उत्पादन खर्च कमी करता येतो त्यासाठी क्रांती कारखान्याने ठिबक सिंचन प्रकल्प हाती घेऊन महत्वाचे पाऊल उचलले आहे.

आजवर कारखान्‍याने शेतक-यांची, बँकांची, कर्मचाऱ्यांचे पगार, बोनस व तोडणी वाहतूक कमिशन डिपॉजिट अशी सर्व देणी वेळेत दिली आहेत. कारखान्याचा आसवणी प्रकल्‍प हा अद्ययावत स्‍वरुपाचा आहे हा प्रकल्‍प प्रदुषण मुक्‍त असा उभारण्‍यात आला आहे.

यावेळी कारखान्‍याचे  क्रांती दूध संघाचे अध्‍यक्ष किरण लाड, जिल्‍हा परिषद सदस्‍य शरद लाड, नागेश पवार, डॉ.व्ही.डी.पाटील, मुकुंद जोशी, संभाजी लाड, बबन निकम, वसंत लाड, जी.के.जाधव, ग्रामपंचायत सदस्य किरण लाड, अर्जुन कुंभार, संचालक रामदास सावंत, संदीप पवार, नारायण पाटील, जयप्रकाश साळुंखे, आप्पासाहेब जाधव, सतीश चौगुले, भगवंत पाटील, संपतराव सावंत, पोपट संकपाळ,दिलीप पाटील, अंकुश यादव, अरुण कदम, शीतल बिरणाळे, कुंडलिक थोरात, अलका पाटील, मंगल पाटील, जयवंत कुंभार, सचिव आप्पासाहेब कोरे, मुख्य अभियंता आशिष चव्हाण, विरेंद्र देशमुख, महादेव माने, चिप केमिस्ट किरण पाटील यांचेसह कर्मचारी उपस्थित होते.

क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा सांगता समारंभप्रसंगी साखर पोत्यांचे पूजन करताना आमदार अरुणअण्णा लाड,शरद लाड, सी.एस.गव्हाणे आदी.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆