=====================================
=====================================
वांगी / कडेगाव | दि. ०१ डिसेंबर २०२२
वांगी : कडेगाव तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या वांगी गावामध्ये ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर, इच्छुक उमेदवारांची चुरस पहावयास मिळत आहे.मुख्य तीन पक्षांमध्ये हि निवडणूक रंगणार आहे.त्यामध्ये नेहमीप्रमाणे कदम आणि देशमुख गट एकमेकांशी भिडणार आहेत त्यातच आणखी आमदार अरुण लाड यांनीही राष्ट्रवादी पक्षाची पाळेमुळे नव्याने रोवली आहेत. अनेक गावात राष्ट्रवादी पक्षाचे लहान - मोठे गट पहावयास मिळत आहेत. त्यामुळें आताची हि निवडणूक मात्र तिरंगी होणार आहे असे दिसते आहे. परंतु सत्तेसाठी कोण कोणाशी युती करणार की, सर्व पक्ष स्वतंत्र लढणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. काँग्रेस पक्षात इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाची रणनिती अवलंबून असणार आहे.
१८ डिसेंबर ला वांगी ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. सर्वसाधारण महिलेसाठी सरपंचपद राखीव आहे. वांगी ग्रामपंचायतीवर काँग्रेस पक्षाचा नेहमी वरचष्मा राहिला आहे. गावात सहा वॉर्ड असून १७ सदस्य निवडले जाणार आहेत.१९८६ नंतर प्रथमच सर्वसाधारण महिला आरक्षण आल्याने यंदाची निवडणूक फारच चुरशीची होणार असल्याची चर्चा आहे. गावात ठिकठिकाणी बैठकांना सूरवात झाली आहे. संपूर्ण गावात, चौकात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तसेच भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
२०१७ साली डॉ. विजय होनमाने १७२३ मताधिक्याने विजयी झाले होते. १७ पैकी १५ सदस्य काँग्रेस चे विजयी झाले होते. एकहाती सत्ता आली.त्यांच्या कार्यकाळात भरपूर निधी उपलब्ध झाला त्यामूळे विकासकामेसुद्धा भरपूर झाली. विविध पुरस्कार सुद्धा ग्रामपंचायतीला मिळाले. असाच विकास कामांचा अजेंडा पुढेही चालत रहावा त्यामूळे, काँग्रेस पक्षाने उमेदवारी देताना विचारपूर्वक उमेदवारी द्यावी हिच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे.
संपूर्ण महिनाभर ग्रामपंचायत निवडणुकीमुळे तालुक्याचे लक्ष राहणार आहे. एकंदरीत संपूर्ण निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆