BANNER

The Janshakti News

क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड यांच्या नावाने दरवर्षी देण्यात येणारा यावर्षीचा " क्रांतिअग्रणी पुरस्कार" पुरोगामी विचारवंत व समाजसेवक पद्मश्री डॉ. गणेश देवी यांना जाहीर

======================================
======================================

कुंडल | दि. २९ नोव्हेंबर २०२२

क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड यांच्या नावाने दरवर्षी देण्यात येणारा यावर्षीचा " क्रांतिअग्रणी पुरस्कार" पुरोगामी विचारवंत व समाजसेवक पद्मश्री डॉ. गणेश देवी यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार माजी राज्यपाल, खासदार श्रीनावास पाटील यांच्या हस्ते दिला जाणार असून हा पुरस्कार वितरण सोहळा दि 4 डिसेंबर रोजी कुंडल (ता पलूस) येथे होणार असून या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे असेल अशी माहिती आमदार अरुणअण्णा लाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आमदार लाड म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे, या वर्षात आपण अनेक समाजउपयोगी उपक्रम राबवून बापूंच्या मनातील राष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत आपण यावरच न थांबता असे उपक्रम पुढेही घेणारच आहोत.

                              पद्मश्री डॉ. गणेश देवी

या वर्षीचे "क्रांतिअग्रणी पुरस्कार" देणेत आलेले डॉ देवी हे बडोद्याच्या भाषा संशोधन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नी सुरेखादेवी या 'भाषा' नावाची संस्था चालवतात, ही संस्था गुजरातमधील आदिवासी क्षेत्रात बोलीभाषांवर काम करते. आजवर इतिहासातील भाषांचे सर्वात मोठे सर्वेक्षण 300 स्वयमसेवकांच्या मदतीने करून ते 50 खंडांमध्ये प्रसिद्ध केले आहे. डॉ गणेश देवी हे मराठी, गुजराती आणि इंग्रजी या तीन भाषांत लिहितात. त्यांनी साहित्यिक टीका, मानववंशशास्त्र, शिक्षण, भाषाशास्त्र, तत्वज्ञान यासह सुमारे नव्वद पुस्तके लिहिली व संपादित केली आहेत. त्यांच्या साहित्यिक आणि शिक्षण क्षेत्रातील कामगिरीस 2014 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतातील वाढती असहीष्णूता आणि अनेक विचारवंतांच्या हत्यांचा निषेध म्हणून त्यांनी कलाकार, लेखक आणि विचारवंतांची दक्षिणायन चळवळ सुरू केली आहे.

आमदार लाड पुढे म्हणाले, यापूर्वी या पुरस्‍काराने कवीवर्य नारायण सुर्वे,समाजसेविका मेघा पाटकर, शबाना आझमी, डॉ.श्रीराम लागू,जलतज्ञ डॉ.राजेंद्रसिंह राणा,डॉ.वसंतराव गोवारीकर, समाजसेविका डॉ.राणी बंग, जेष्‍ठ पत्रकार उत्‍तम कांबळे, पत्रकार पी.साईनाथ, डॉ.शिवानंद सोरटूर, डॉ.प्रकाश आमटे, डॉ.बाबा आढाव, जेष्‍ठ कम्युनिष्‍ठ नेते ए.बी.बर्धन, डॉ.आ.ह.साळुंखे,
डॉ.रघुनाथ माशेलकर, डॉ.एन.डी.पाटील, पद्मश्री डॉ.तात्‍याराव लहाने, प्रा.पुष्‍पा भावे, डॉ. रवींद्र कोल्हे यांना गौरविण्‍यात आले आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा दि 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता ग्रामपंचायतीच्या समोरील पटांगणावर होणार आहे तरी परिसरासतील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, दिलीप लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, रणजित लाड, व्ही वाय पाटील, डॉ प्रताप लाड, चंद्रकांत रोकडे,  कुंडलिक एडके, अनिल लाड, मुकुंद जोशी, अशोक पवार, जयवंत आवटे, कार्यकारी संचालक सी एस गव्हाणे  यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆