BANNER

The Janshakti News

भिलवडी येथे विद्यार्थी दिन मोठ्या उत्साहात साजरा... पंचशील नगर येथील युवकांनी केले बाबासाहेबांना अभिवादन....



======================================
======================================

भिलवडी | दि. 08 नोव्हेंबर 2022

भिलवडी (ता. पलूस) येथील पंचशील नगर मधील भीम अनुयायांनी विद्यार्थी दिन मोठ्या उत्साहात साजरा करून, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.


दि. ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतापसिंग हायस्कूल, राजवाडा चौक, जि. सातारा येथे शाळा प्रवेश झाला. त्यांनी शाळेत प्रवेश घेतला त्यावेळी त्यांचे नाव भिवा असे होते. या शाळेच्या रजिस्टरला १९१४ या क्रमांकासमोर आजही बाल भिवाची स्वाक्षरी असून, हा ऐतिहासिक दस्तऐवज शाळा प्रशासनाने जपून ठेवला आहे.अशी माहिती मिळते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन म्हणजे एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहूल म्हटली पाहिजे कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पाऊल शाळेत पडल्यामुळे ते स्वतः सुशिक्षित आणि प्रज्ञावंत तर झालेच शिवाय करोडो दलितांचे-वंचितांचे उध्दारकर्तेही झाले. शाळेत गेल्यामुळे ज्या संविधानाचा आज सर्वात आदर्श संविधान म्हणून जगभर गौरव होत असतो, त्या भारतीय संविधानाचे ते शिल्पकारही ठरले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन ही अत्यंत महत्वाची आणि इतिहासाला कूस बदलावयास लावणारी क्रांतिकारी घटना ठरते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आजीवन विद्यार्थी होते. त्यांनी आपला हा विद्या व्यासंग आयुष्याच्या शेवटपर्यंत जपला.


इतिहासात डोकावले असता असे दिसून येते की,बाबासाहेबांना आपल्या शैक्षणिक वाटचालीमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागला. बाबासाहेब हे मागासवर्गीय जातीचे असल्याचे कारण पुढे करीत, बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर हाकलून दिले जात असे. तरीही बाबासाहेबांनी जिद्द सोडली नाही. वर्गाच्या बाहेर बसून, त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण घेतले.तत्कालीन जातीयतेला तोंड देत या महामानवाने देशासह, परदेशात जावून उच्च शिक्षण घेतले. स्वतंत्र भारताचे संविधान लिहून, सर्व जाती -- धर्माच्या लोकांना एकत्रितपणे कायद्याच्या बंधनात बांधून समता, न्याय,बंधूता समाजामध्ये रुजू केली. परदेशातील बहुतांश कॉलेज, महाविद्यालयांमध्ये एक आदर्श व हुशार विद्यार्थी म्हणून बाबासाहेबांचा नामोल्लेख अजूनही होताना दिसून येतो. समाज परिवर्तनासाठी बाबासाहेबांनी केलेले कार्य, त्यांची शिक्षणाबाबत असलेली तळमळ, त्यांनी घेतलेल्या उच्च पदव्या, त्यांनी लिहिलेली भारतीय राज्यघटना हे सर्व एक असामान्य व्यक्तिच करू शकते. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मौलिक मंत्र देवून, महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अज्ञानी समाजामध्ये शिक्षणाचे महत्व पटवून दिले.शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो हे दूध पितो, तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही असा संदेश देत बाबासाहेबांनी लोकांच्या मध्ये शिक्षणाविषयी जनजागृती केली आणि म्हणूनच आज सर्वच समाजातील लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटू लागले आहे. ‌ आज मुलांच्या बरोबर मुलीही अनेक क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळवित आहेत. उच्च शिक्षा विभूषित आहेत. हे सर्व केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या संदेशामुळे शक्य झाले आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ ७ नोव्हेंबर हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याबाबत पावले उचलली गेली.


विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी सातारा येथील शाळेमध्ये ७ नोव्हेंबर १९०० रोजी घेतलेल्या शालेय प्रवेशादिनास विद्यार्थी दिवस म्हणून संपूर्ण राज्यभरात साजरा करण्याचा निर्णय २७ ऑक्टोंबर २०१७ रोजी घेण्यात आला. त्याचे औचित्य साधून, भिलवडी (पंचशील नगर) येथील भीम अनुयायांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, त्रिसरण, पंचशील ग्रहण करून बाबासाहेबांना अभिवादन केले आणि जमलेल्या भीम अनुयायांनी यावेळी आपल्या मुलांमुलींना चांगले शिक्षण देण्याचा निश्चय केला. पंचशील नगर येथील भीम अनुयायांनी बाबासाहेबांना दिलेली हिच खरी मानवंदना म्हणावी लागेल.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●




■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆