BANNER

The Janshakti News

आंंबेडकरी साहित्याचा वैचारिक अग्रदूत : अण्णाभाऊ साठे




=====================================


=====================================

दिनांक - १७ जुलै २०२२

आंंबेडकरी साहित्याचा वैचारिक 
अग्रदूत : अण्णाभाऊ साठे 

स्वातंत्र्यपूर्व काळात एका गरीब दलित कुटुंबात जन्म झालेला,अकरा-बारा वर्षाचा शाळा सोडून दिलेला एक मुलगा आपल्या आई-वडिलाबरोबर भाकरीच्या शोधात सुमारे तीनशे किलोमीटर पायी चालत मुंबईला येतो.अपार कष्ट करतो,हमाली करतो,बुटपाॕलिश करतो,मजुरी करतो,गिरणीत काम करतो.रात्री जागून झपाटल्यासारखे वाचन करतो.जगाच्या दुःखात स्वतःचे दुःख मिसळून टाकतो.अपार मायेने दुसऱ्यांची वेदना ऊराशी कवटाळतो.वेदनेची मोती करतो.शोकाचे श्लोक करतो.पुरुषार्थाचे पोवाडे गातो.कवणे रचितो.तमाशामध्ये बेभान होऊन ढोलकी वाजवितो.तमाशाचे लोकनाट्य करतो.चळवळीत तहान-भूक हरवून जातो.एका हातात डफ घेतो.दुसऱ्या हाती लेखणी धरतो.आणि बघता बघता सयुंक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा बुलंद आवाज होतो.महाराष्ट्राचा "लोकशाहीर" होतो.मराठी रसिकांचा "साहित्यरत्न" होतो.कथा,कादंबरी,वगनाट्य,कवने,लावण्या असा अक्षरांचा नेटका प्रपंच करुन मराठी मायबोलीचे पांग फेडतो.सांगली जिल्ह्यातील वाटेगावचा" तुकाराम भाऊ साठे" हा संतप्त फाटका-तुटका तरुण महाराष्ट्राचा,दीनदलिंताचा,शोषिंताचा,वंचितांचा,कामगारांचा "काॕम्रेड आण्णा भाऊ साठे" होतो.हा सारा प्रवासच विलक्षण रोमांचकारी आहे.
  एखाद्या महाकाव्याचा विषय व्हावा असे आण्णा भाऊ साठे यांचे जीवन चरित्र आहे.सांगली जिल्ह्यातील "वाटेगाव" या लहानशा गावात रविवार दि.१ आॕगष्ट १९२० रोजी एका गरीब दलित कुटुंबात आण्णा भाऊ साठे यांचा जन्म झाला.त्यांचे औपचारिक शालेय शिक्षण झाले नाही.परंतु ते जन्मजात तीव्र बुद्धीचे होते.त्यांच्या अंगी अनेक गुण होते.जगाच्या ऊघड्या शाळेत ते शिकत गेले.आपल्या मावसभावाच्या तमाशात त्यांनी काही काळ काम केले. ते ढोलकी,तुणतुणे,डफ वाजविण्यात वाकबगार होते.तमाशासाठी त्यांनी खटकेबाज संवाद लिहिले.ते शीघ्र कवी होते.त्यांनी तमाशासाठी लावण्या,वगनाट्य लिहिले.
 ते अत्यंत निर्भय,धाडसी आणि बंडखोर वृतीचे होते.त्यांना अशा गोष्टीचे खूप आकर्षण होते.क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पराक्रमी व्यक्तिमत्त्वाची त्यांना भूरळ पडली होती.देशभक्तीची प्रखर भावना आणि १९४२ च्या आंदोलनात सहभाग ही त्यांची प्रेरणा त्यांना क्रांतिसिंह नाना पाटलाकडून मिळाली होती.मुंबईत आल्यानंतर काॕम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा खूप मोठा प्रभाव त्यांच्यावर पडला होता.त्यांच्यामुळे ते कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य झाले.डांगे,मॕक्झिम गाॕर्की,मार्क्स,लेनिन हे त्यांचे प्रेरणास्त्रोत्र होते. 
मुंबईला आल्यानंतर सुरुवातीला आण्णा भाऊंचे कुटुंब भायखळ्यातील चांदबीबी चाळीत राहिले होते.ती कामगार वस्ती होती.तेथील दैन्य,दारिद्रय,आणि कळाहीन जीवन पाहून ते अस्वस्थ झाले.त्यांच्यातील संवेदनशील लेखक बैचेन झाला.ते हे सारे भोगीत होते.जन्मापासूनच त्यांच्या वाटेला दारिद्रय आणि अवहेलनेचे जिणे आलेले होते.या अस्वस्थ अवस्थेत त्यांनी प्रचंड वाचन केले.ना.सी.फडके,वि.स.खांडेकर हे त्यावेळचे लोकप्रिय कादंबरीकार होते.त्यांच्या कादंबऱ्या त्यांनी झपाटल्यासारख्या वाचल्या.कम्युनिस्ट पक्षाचे काम करीत असताना कामगारांचे दैन्य,त्यांचे व्यसन,झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचे हलाखीचे जगणे हे त्यांनी पाहिले.ते स्वतः एक गिरणी कामगार होते.यावर मार्क्सवाद हा एक ऊपाय आहे,या निष्कर्षाला ते आले होते.जगातील सर्व श्रमिकांनो एक व्हा हा मार्क्सचा आवाज त्यांनी ऐकला होता. कष्टकरी,मजुर,कामगार फक्त राबतात.त्यांना त्यांच्या श्रमाचे मोल मिळत नाही.भांडवलदार त्यांच्या श्रमावर जगतात.त्यांचे शोषण करतात.लोकांच्या दारिद्र्याला भांडवलदार जबाबदार आहेत.हे त्यांनी अभ्यासले होते.आणि ही गुलामगिरी नष्ट करण्यासाठी त्यांनी लोकांच्यात जागृती केली."स्टालिनग्राडचा पोवाडा" त्यांनी लिहिला.वर्गसंघर्षाला लोकांची मने त्यांनी तयार केली.
 वर्गलढा तीव्र करण्याठी त्यावेळी तीन तरुण एकत्र आले.त्यांची गाढ मैत्री झाली.लोकसेवेने भारलेले हे तीन तरुण त्यावेळी सर्वच गोरगरीबांच्या गळ्यातील ताईत बनले होते.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास या तिघाना डावलून लिहिताच येणार नाही.हे तीन तरुण म्हणजे काॕम्रेड आण्णा भाऊ साठे,कोल्हापूरचे (आजरा) काॕम्रेड दत्ता गव्हाणकर,बार्शीचे मेहबूब हुसेन पटेल तथा काॕम्रेड अमर शेख.हे तिघे कवी होते.शाहिर होते.सृजनशील कलावंत होते.त्यांनी १९४४ साली कम्युनिस्ट पक्षाच्या अंतर्गत "लालबावटा" हे कलापथक स्थापन केले.महाराष्ट्राभर या शाहिरांचा गगनभेदी आवाज दुमदुमला.शाहिर आण्णा भाऊ साठे यांचा हा अत्यंत बहराचा कालखंड होता.या कलापथकासाठी गीते,पोवाडे यांची रचना त्यांनी केली.शाहिर अमरशेख यांचा आवाज पहाडी होता.शाहिर आण्णा भाऊ साठे पोवाडे लिहायचे आणि शाहिर अमरशेख आपल्या बुलंद गावाजात गायचे.शाहिर दत्ता गव्हाणकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा जवळचे "महागोंड"गावचे १९३५ साली कोल्हापूरच्या राजाराम काॕलेजमधून इंग्रजी विषय घेऊन बी.ए.झाले होते.अस्सखलित इंग्रजी बोलणारे शाहिर काॕ.दत्ता गव्हाणकर, आण्णा भाऊ साठे यांच्यासारखेच बेकारी,दारिद्रय,ऊपासमार पाहून बेचैन झालेले बंडखोर तरुण होते.श्रीपाद अमृत डांगे यांचा प्रभाव असलेल्या तिघानी सयुंक्त महाराष्ट्राच्या चळवळीला प्रचंड ताकद दिली होती.
"लालबावटा" कलापथकामुळे आण्णा भाऊ साठे यांच्या लेखनाला बहर आला.कलापथकासाठी वगनाट्य,लावण्या,लोकनाट्य,गीते असे त्यांनी खूप लेखन केले."लोकशाहिर"म्हणून त्यांना सारा महाराष्ट्र ओळखू लागला.सयुंक्त महाराष्ट्राच्या चळचळीत प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे,आचार्य प्र.के.अत्रे,श्रीपाद अमृत डांगे असे अग्रगण्य नेते होते.या नेत्यांच्या भाषणापूर्वी आण्णा भाऊ साठे,अमरशेख,दत्ता गव्हाणकर यांचे पोवाडे व्हायचे.पोवाडे ऐकण्यासाठी लोक प्रचंड संख्येने गर्दी करत होते.
  १९५० च्या दशकात आण्णा भाऊ साठे कादंबरी लेखनाकडे वळले.त्यांनी वास्तव जीवनात जे पाहिले होते,जे अनुभवले होते,जे भोगले होते. ते त्यांच्या लेखनात रसरशीतपणे प्रकट झाले.वारणेच्या खोऱ्यातील त्यांच्या मामाने ब्रिटिशांच्या विरोधात बंड केले होते.त्यांच्या रोमांचकारी कथा त्यांनी लहानपणी ऐकल्या होत्या.त्या कथेवर आधारीत त्यांनी "फकिरा" ही कादंबरी लिहिली.या कादंबरीत अन्यायाविरुध्द लढणारा एक बंडखोर नायक त्यांनी रंगविला.या कादंबरीला प्रख्यात साहित्यिक भाऊसाहेब खांडेकरांनी प्रस्तावना लिहिली.खांडेकरांनी आण्णा भाऊ साठेंच्या कादंबरीचा गौरव केला.या कादंबरीमुळे आण्णा भाऊ साठे यांना लेखक म्हणून मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली.महाराष्ट्र सरकारचा १९६१साली "फकिरा"ला पुरस्कार मिळाला.व्यंकटेश माडगूळकरांच्या "बनगरवाडी" आणि आण्णा भाऊंच्या "फकिरा" ने मराठी कादंबरीला एक वेगळे वळण दिले.त्यांनी पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या.त्यामध्ये सात कादंबऱ्यावर चित्रपट निघाले.तेरा कथासंग्रह,पंधरा वगनाट्य,लावण्या,पोवाडे,छक्कड अशी प्रचंड साहित्य निर्मिती त्यांनी केली आहे.सयुंक्त महाराष्ट्र होऊन आता तब्बल साठ वर्षे होऊन गेली आहेत.परंतु सयुंक्त महाराष्ट्राच्या निर्मिती नंतर त्यांनी लिहिलेली राजकीय "छक्कड" त्यावेळी प्रत्येकाच्या ओठावर होती.
  माझी मैना गावावर राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
ही पहिली राजकीय छक्कड होती.हिला राजकीय संदर्भ होता.सयुंक्त महाराष्ट्र मिळाला.मुंबई महाराष्ट्राला मिळाली.परंतु "मैना"सारखे सुंदर "बेळगाव,कारवार"मात्र कर्नाटकत राहिले. महाराष्ट्राला ते मिळाले नाही.बेळगाव,कारवारला"सुंदर "मैना" समजून तो विरह त्यांनी या "छक्कड" मधून गायिला.ती छक्कड प्रचंड गाजली होती.ती आजही तेवढीच लोकप्रिय आहे.
 आण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लोकप्रिय लेखनाचे मर्म सांगताना कम्युनिस्ट पक्षाच्या "युगांतर" मध्ये लिहिलेल्या एका लेखात म्हटले आहे,"मला जे सत्य वाटते तेच मी लिहितो.लिहिताना माझे जे ध्येय आहे त्यास अनुरुप असेल ते लिहितो," कम्युनिस्ट विचारधारेत धर्माला स्थान नाही.आणि आण्णा भाऊ साठे कम्युनिस्ट होते.त्यामुळे लिहिणे हा त्यांनी धर्म मानला होता.त्यांच्या साहित्यातील नायक अन्यायाविरुध्द झुंजणारा आहे.त्यांच्या विचारधारेशी ही सर्व पात्रे एकरुप झालेली आहेत.ते म्हणायचे माझ्या लेखनाचे नायक मला भेटलेले आहेत,माझ्या ध्येयाशी ते संवादी आहेत.कल्पनेने मला लिहिता येत नाही.आण्णा भाऊंनी कामगार,कष्टकरी,दलित यांचा दुःखाने फुटलेला टाहो  आपल्या साहित्यातून अधिक व्यापक केला.मराठी साहित्यात आण्णा भाऊंच्या एवढा दलितांचा पुरूषार्थ,पराक्रम कोणीही रेखाटला नाही.मार्क्स,लेनिन,गाॕर्की यांचे तत्वज्ञान त्यांनी ग्रंथात वाचले होते.परंतु प्रत्यक्षात ते त्यांनी कामगारांच्या वस्तीत,दलितांच्या झोपडीत,मोर्चात,संपात,आणि स्वतःच्या संसारात अनुभवले होते.विषमतेचे आणि दारिद्र्याचे जन्मभर चटके त्यांनी सोसले होते.जीवन जगण्याचा प्रत्येकांना हक्क आहे.परंतु ते कुरुपतेचे असू नये.ते शोषणरहित बंधुत्व व समानतेचे असले पाहिजे.असा सुंदरतेचा ध्यास लागलेला हा एक थोर मानवतावादी कलावंत होता.
१९४४ ते १९६९ हा त्यांच्या कर्तृत्वाचा आणि तेवढाच धामधुमीचा कालखंड होता. कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता,कलापथक,सयुंक्त महाराष्ट्र चळवळ,गोवामुक्ती आंदोलन अशा विलक्षण वेगवान आयुष्यात त्यांनी एवढे प्रचंड लेखन कसे केले? या प्रश्नाच्या ऊत्तराला फक्त  नतमस्तकच झाले पाहिजे.आण्णा भाऊ साठे यांचा पिंड क्रांतिकारक होता.दबलेल्या माणसाचा पराक्रम ही त्यांच्या  लेखनाची एक प्रेरणा होती.त्यांचे साहित्य व कला ही रंजना करिता नसून माणसाला जगण्याला बळ देणारे आहे.आण्णा भाऊंचे दोन विवाह झाले होते.कम्युनिस्ट पक्षाच्या चळवळीत जयवंताबाईशी त्यांचा परिचय झाला. परिचयाचे रुपांतर प्रेमात आणि लग्नात झाले.१९४५ नंतर आण्णा भाऊ साठे यांच्या जीवनाला चांगले स्थैर्य लाभले.
जयवंताबाईंनी आण्णा भाऊंच्या
लेखनाला बळ दिले.आण्णा भाऊंचे जीवन संघर्षशील होते.आयुष्यभर त्यांना खूप दगदग झाली होती.कदाचित त्यामुळे ते अल्पायुषी ठरले.शुक्रवार दि.१८ जुलै १९६९ रोजी फक्त एकोणपन्नासाव्या वर्षी त्यांचे देहावसन झाले.नारायण सुर्वे,बाबूराव बागूल,राजा ढाले,दया पवार,प्र.श्री.नेरुरकर,वामन होवाळ,काॕ.जी.एल.रेड्डी,डाॕ.सदा कऱ्हाडे,अर्जुन डांगळे,ए.के.हंगल इत्यादी साहित्य आणि चळवळीतील त्यांचे चाहते त्यांच्या अंत्यसंस्काराला ऊपस्थित होते.त्यांचे घनिष्ठ मित्र शाहिर अमरशेख यांना आण्णा भाऊंच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर ते धावत आले.ज्यांच्याबरोबर महाराष्ट्भर दौरे केले.ज्यांचे पोवाडे बुलंद आवाजात गायले.त्या आपल्या मित्रांचे दर्शन घेताना शाहिर अमरशेखंनी हंबरडा फोडला.महाराष्ट्राचा लाडका शाहिर,शोषिंताचा बुलंद आवाज खामोश झाला होता.या साहित्यसम्राटाला जाऊन आता ५३ वर्षे झाली.त्यांना माझे शत शत प्रणाम.
          
प्राचार्य बी एस जाधव 
  बांबवडे, ता. पलूस जि, सांगली




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆