BANNER

The Janshakti News

" निधन वार्ता "....... शिवराम (बापू) यादव यांचे निधन.. वयाच्या ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...



" निधन वार्ता "..........

शिवराम (बापू) यादव यांचे निधन..

वयाच्या ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...

भिलवडी | दि.०२/११/२०२१

सांगली जिल्ह्यात परिचित असलेले राजकारणातील संयमी, निर्भिड व हजरजबाबी व्यक्तीमत्व, चोपडेवाडी गावचे सुपुत्र शिवराम (बापू) यादव यांचे वयाच्या ८० व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.







पलुस तालुक्यातील चोपडेवाडीसह परिसरामध्ये राजकारणासह समाजकारणामध्ये नेहमी अग्रेसर असणारे नाव म्हणजे शिवराम (बापू) यादव. बापूंनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये मोठा दबदबा निर्माण केला होता. सर्वपक्षीय राजकीय नेते बापूंचा आदर करीत असत. राजकारणाबरोबरच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांमध्ये बापूंचे योगदान मोठे होते. 


शिवराम (बापू) यादव हे वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक, भिलवडी शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष तसेच तासगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक होते.


 बापू काही दिवसांपासून आजारी होते. मंगळवार दिनांक ०२ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवाचे चोपडेवाडी गावातून सजविलेल्या ट्रॅक्टर मधून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी चोपडेवाडी वासियांना अश्रू अनावर झाले होते. बापूंच्या पश्चात दोन मुले,सुना, एक मुलगी,
चार नातवंडे असा मोठा परिवार आहे. 


महेंद्र (आप्पा) लाड,जि.प.सदस्य सुरेंद्र (भैय्या) वाळवेकर, उद्योजक विश्वास चितळे, गिरीश चितळे, मकरंद चितळे, राजू (दादा) पाटील संग्राम (दादा) पाटील, विजयकुमार चोपडे यांच्यासह राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी शिवराम (बापू) यादव यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. सायंकाळी सातच्या सुमारास त्यांच्या पार्थिवास मुखाग्नी देण्यात आला. बापूंना अखेरचा निरोप देण्यासाठी चोपडेवाडी, भिलवडीसह परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते..
बापूंचा रक्षाविसर्जन कार्यक्रम बुधवार दि.३ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता चोपडेवाडी येथे होणार आहे.