BANNER

The Janshakti News

भिलवडी व परिसरातील नागरिक अनेक संकटांशी करत आहेत सामना.... ठोस उपाययोजना करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे.....



भिलवडी व परिसरातील नागरिक अनेक संकटांशी करत आहेत सामना....


ठोस उपाययोजना करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे.....

भिलवडी | दि. 21/11/ 2021

भिलवडी तालुका पलूस येथे रोगराईने थैमान घातले असून भिलवडी व परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. लहान मुलांच्या पासून ते वयोवृद्ध अनेक लोक आजारी पडले आहेत. आजपर्यंत न पाहिलेले वेगवेगळे रोग देखील आता तोंड वर काढताना दिसून येत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


भिलवडी व परिसरातील नागरिकांना गेल्या दोन ते तीन वर्षापासून अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. दोन-तीन वर्षांमध्ये अतिवृष्टी, वादळ, कोरोना सारख्या महामारीचे संकट व प्रलयकारी महापूर यातून सावरत असताना आता नव्यानेच उद्भवणार्‍या रोगराईमुळे परिसरातील नागरिकांच्या पुढे जाण्याचा फार मोठा प्रश्न उभा टाकला आहे.
अतिवृष्टी आसमानी वादळ व महापूर यामुळे नदीकाठचा संपूर्ण भाग उध्वस्त झाला आहे. अनेक शेतकरी देशोधडीला लागला आहे.


या महाभयंकर संकटामुळे अनेकांना जीव देखील गमवावा लागला आहे. या महाभयंकर संकटामुळे ज्या ज्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता त्या दुःखातून अजूनही काही लोक बाहेर पडलेले नाहीत.अशी परस्थिती असताना देखील अतिवृष्टीमुळे व महापुरामुळे नुकसान झालेल्या अनेक नागरिकांना अजूनही शासकीय मदत मिळालेली नाही.


 त्यामुळे भिलवडी व परिसरातील नागरिक आर्थिक दृष्ट्या पूर्ण खचून गेला आहे.अशी परिस्थिती असताना आता नव्यानेच उद्भवलेल्या रोगराईमुळे नागरिक मोठ्या संकटात अडकले आहेत.
निसर्गाने माणसालाच संकटात जखडले आहे असे नाही तर शेतकऱ्यांच्या शेतीला सुद्धा सोडले नाही.गेल्या चार पाच दिवसापासून भिलवडी व परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिके हातातोंडाशी आलेली आहेत ते शेतकरी देखील चिंताग्रस्त दिसून येत आहेत. नदीकाठचा शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. त्यातच 2 ते 3 महिन्या नंतर मार्च महिना येणार. शेतकऱ्यांनी व सर्वसामान्य जनतेने शेतीसाठी आजारपणासाठी पोटाची खळगी भरण्यासाठी काढलेल्या कर्जाचे हाप्ते वसुलीचा तगादा मार्चमध्ये लागणार. हे आता शेतकऱ्यांचे , सर्वसामान्य लोकांचे व शेत मजूरांचे पुढचे संकट असणार हे नाकारता येत नाही.त्यामुळे आत्तापासूनच शेतकऱ्यांना , सर्व सामान्य जनतेला व शेतमजूरांना वाचवण्यासाठी या सर्व गंभीर बाबींची दखल राज्य शासनाने घेतली पाहिजे अशी चर्चा नागरिकांच्या मधून होत आहे.


आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र भिलवडी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे सांगितले की...
सध्या आजारी पडलेल्या लोकांचा कल हा खाजगी दवाखाना व खाजगी ब्लड टेस्टिंग लॅब कडे जास्त दिसून येत आहे. त्यामुळे भिलवडी व परिसरातील किती लोक आजारी पडले आहेत. याचा नक्की अंदाज प्राथमिक आरोग्य केंद्राला लागत नसल्याचेही आरोग्य केंद्राकडून सांगण्यात येत आहे.
शासनाने गोरगरीब लोकांच्या साठी अनेक आरोग्याच्या योजना काढलेल्या आहेत. परंतु सदर योजनेचा लाभ कोणालाही झाल्याचे दिसून येत नाही.कारण योजनेचे निकष , योजनेमध्ये सामाविष्ट असलेले आजार , योजनेचा लाभ घेण्यासाठी ठरवून दिलेले दवाखाने , रुग्ण दवाखान्यात गेल्यानंतर करावयाची प्रोसेस याची कसलीही माहिती नागरिकांना माहिती नसल्यामुळे व योग्य माहिती कोणीही देत नसल्यामुळे शासकीय आरोग्य योजनेचा गोरगरीब नागरिकांना कसलाही फायदा होत नाही.
त्यामुळे शासनाने गोरगरीब लोकांच्या साठी काढलेल्या आरोग्याच्या योजना कागदावरच आहेत की काय अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे. 
या गंभीर परस्थितीचा गांभीर्याने विचार करून भिलवडी व परिसरातील सर्व नेतेमंडळी ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी , सामाजिक कार्यकर्ते यांनी सर्व मतभेद , गटतट बाजूला ठेवून लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून व एकामागून एक येणाऱ्या संकटांमधून सर्वांना बाहेर काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन या गंभीर प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्यासाठी तालुका प्रशासन , जिल्हा प्रशासन यांच्याशी तातडीने बैठक आयोजित करून या गंभीर प्रश्नावरती योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात अशी चर्चा भिलवडी व परिसरातील नागरिकांच्या मधून होत आहे.