BANNER

The Janshakti News

सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदार एक रकमी एफ. आर. पी. जो पर्यंत जाहीर करत नाहीत तो पर्यंत ऊसाला कोयता लावू देणार नाही... "स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ठाम भूमिका"...



सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदार एक रकमी एफ. आर. पी. जो पर्यंत जाहीर करत नाहीत तो पर्यंत ऊसाला कोयता लावू देणार नाही...

           "स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ठाम भूमिका"...

कारखानदारांचा निर्णय होईपर्यंत ऊसतोड बंद ठेवण्याचा भिलवडी येथील बैठकीमध्ये निर्णय....





भिलवडी | दि. २९/१०/२०२१

भिलवडी ता.पलूस येथे भिलवडी पोलीस ठाणे, स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस वाहतूकदार यांची बैठक पार पडली यावेळी जोपर्यंत सांगली जिल्ह्यातील कारखानदार एक रकमी एफ. आर. पी. जाहीर करीत नाहीत, तोपर्यंत ऊस तोड करायचे नाही असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.



  भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, शेतकरी व ऊस वाहतूक ट्रक, ट्रॅक्टरचे चालक मालक यांची बैठक घेतली.या बैठकीत दिनांक - ३०/१०/२०२१ पर्यंत ऊस वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

यावेळी भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांनी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करून, कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन केले.



यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा म्हणाले.. सोनहिरा कारखान्याचे चेअरमन मोहन शेठ दादा कदम यांच्याशी  दूरध्वनीवरून चर्चा झाली आहे त्यावेळी त्यांनी दोन दिवसांमध्ये आमच्या कारखान्यासह इतर कारखान्यांची एकत्र बैठक घेऊन निर्णय जाहीर करतो इतर कारखानदारांचा निर्णय काही असो सोनहिरा सहकारी साखर कारखाना मागील वर्षाप्रमाणे एक रकमी एफ. आर. पी. किंबहुना त्याच्या पेक्षा जास्त रक्कम देण्यास बांधील आहे असे सांगितले.

त्यामुळे कारखानदारांची बैठक होई पर्यंत ऊस तोडणी वाहतूक बंद करण्याचे ठरले. कोल्हापूर जिल्ह्यातील एक रकमी एफ.आर.पी. जाहीर केलेल्या कारखान्यांकडे जी वाहने ऊस घेऊन जातात त्यांना अडविणार नाही असे यावेळी सांगण्यात आले तसेच कोल्हापूर जिल्ह्याकडे ऊस देण्याचा कल ही लोकांचा वाढलेला आहे असे सांगण्यात आले.



यावेळी  अंकलखोप, भिलवडी, वसगडे, खटाव, ब्रह्मनाळ व बारा वाड्यातील शेतकऱ्यांनी व वाहन मालकांनी कारखानदारांचा निर्णय होईपर्यंत ऊस तोड बंद ठेवून सहकार्य करावे असे आवाहन संग्राम (दादा)पाटील यांनी केले. 

या बैठकीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासो मगदूम, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष धन्यकुमार पाटील, अमोल बिरनाळे, दीपक सूर्यवंशी, श्रीकृष्ण पाटील, आनंदराव शिंगटे ,गणपती सावंत, निखिल शेटे, दिलीप जाधव ,विनायक शेटे तसेच वाहनमालक व शेतकरी उपस्थित होते.


दरम्यान दि.२८ ऑक्टोंबर रोजी सांगली साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी एक रकमी एफ. आर. पी. देण्याचे जाहीर करून,ऊस दराची कोंडी फोडली.यामुळे शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदिप राजोबा यांनी कारखाना व्यवस्थापनाचे धन्यवाद मानले.