BANNER

The Janshakti News

भिलवडी व परिसरातील गावांचा प्रशासनाच्या महालसीकरण अभियानास चांगला प्रतिसाद..



भिलवडी व परीसरातील गांवाचा प्रशासनाच्या महालसीकरण अभियानास चांगला प्रतिसाद.




भिलवडी | दि. १६ / ०९ / २०२१

बुधवार दि.१५ सप्टेंबर रोजी प्रशासनाच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण महाअभियान राबविण्यात आले. यामध्ये भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत भिलवडी, अंकलखोप,वसगडे व ब्रम्हनाळ या गावांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात आली.




या मोहिमे अंतर्गत नागरिकांना पहिला व दुसरा डोस देण्यात आला.भिलवडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, पंचशील नगर,स्वामी समर्थ मठ,ऐतवडे चौक अंगणवाडी, महादेव मंदिर परिसर अंगणवाडी व पाटील गल्ली येथील जानकी हॉल या ठिकाणी ग्रामस्थांना लस देण्याची व्यवस्था करण्यात आली होती.


भिलवडी येथील १,३४५ ग्रामस्थांनी लसीकरणाचा लाभ घेतला. दिवसभरात अंकलखोप येथे ११४१ ब्रह्मनाळ ३६७ , वसगडे ८४४ , लोकांनी लसीकरण करून घेतले . भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत एकूण ३,६९७ लसीकरण झाले.तर पलूस तालुक्यात  दिवसअखेर  १० हजार ३०० नागरिकांनी  लसीकरण करून घेवून, प्रशासनाच्या महालसीकरण अभियानास चांगला प्रतिसाद दिला.


दरम्यान पलूस तालुका गटविकास अधिकारी स्मिता पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रागिणी पवार, ग्रामपंचायत विभाग विस्तार अधिकारी डी.सी.खाडे, पलूस ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अधिकराव पाटील, भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नरेंद्र पवार,कुंडलचे वैद्यकीय अधिकारी डॉ.किरण भोरे यांनी पलूस तालुक्यातील लसीकरण सुरू असलेल्या ठिकाणी भेटी देऊन नागरिकांना लसीकरण करून घेण्याबाबत प्रोत्साहन दिले.


सदर गावातील ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच, सदस्य तसेच नेतेमंडळींनी आपल्या गावातील नागरिकांचे जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण करून घेण्याबाबत प्रयत्न करून आरोग्य विभागाला सहकार्य केले.


परिसरातील शाळेमधील  शिक्षक, आरोग्य केंद्रातील  स्टाफ व आशा सेविका यांनी रजिस्ट्रेशन करणेकामी या महालसीकरण मोहिमेत सहभाग घेतला..