BANNER

The Janshakti News

भिलवडी व परिसरात महावितरणकडून जबरदस्तीने होत असलेली वीज बिल वसुली व अधिकाऱ्यांची उर्मट भाषा तात्काळ थांबवा.....



भिलवडी व परिसरात महावितरणकडून जबरदस्तीने होत असलेली वीज बिल वसुली व अधिकाऱ्यांची उर्मट भाषा तात्काळ थांबवा.....

महावितरणकडून कोणतीही कल्पना न देता विज कनेक्शन बंद करणे सुरू, नागरिकांमधून संतापाची लाट...



भिलवडी | दि. २४ / ०९ / २०२१

भिलवडी व परिसरामध्ये महावितरणकडून थकीत विज ग्राहकांना कोणतीही कल्पना न देता, संबंधित वीज ग्राहकांचे विज कनेक्शन बंद करण्याचे काम जोमात सुरू असून,कोरोना व महापूराचा तडाखा बसलेल्या कृष्णाकाठच्या नागरिकांना आता महावितरणच्या वीज बिलाचा करंट बसत आहे.

यावर्षी जुलै महिन्यात आलेला महापूर, गेल्या दीड-दोन वर्षांपासून आलेले कोरोनाचे संकट यामुळे आर्थिक फटका बसलेल्या व दैनंदिन जीवनाची घडी सुरळीत करताना मेटाकुटीला आलेल्या कृष्णाकाठच्या नागरिकांपुढे आता थकीत वीजबिल भरण्याचे मोठे संकट आले आहे.

आपण वीज वापरली आहे. त्याचे विज बिल देणे गरजेचे आहे याची जाण ग्राहकांना आहे परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक घडी विस्कटलेल्या नागरिकांना सध्या तरी वीज बिल भरणे शक्‍य नसल्याचे दिसून येत आहे. विज बिल न भरल्यामुळे संबंधित ग्राहकाचे वीज कनेक्शन बंद करण्याचे काम महावितरण कडून करण्यात येत आहे. विज कनेक्शन तोडण्यापुर्वी संबंधित ग्राहकांना याची कल्पना देणे, याबाबतची नोटीस देणे गरजेचे असताना देखील याबाबत कोणतीही कल्पना न देता संबंधित ग्राहकाचे वीज कनेक्शन तोडले जात आहे.

ग्राहकांना वीज बिलाबाबत सवलत मिळणे करीता भिलवडी येथील नागरिक बुधवार दि.२२ सप्टेंबर रोजी महावितरणच्या कार्यालयामध्ये गेले असता, याबाबत योग्य ती माहिती देण्यासाठी महावितरणच्या कार्यालयांमध्ये कोणतेही जबाबदार अधिकारी नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी नागरिकांनी फोनवरून संपर्क केला असता, त्यांच्याकडून नागरिकांना योग्य ते सहकार्य मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

त्याचबरोबर काही ग्राहकांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांनी उद्धटपणे बोलल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर असून, प्रशासनाने पूर बाधित नागरिकांना विज बिल भरणेबाबत काही दिवसांची सवलत द्यावी तसेच उद्धटपणे बोलणाऱ्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

**********************************













**********************************