सांगली, दि 6 (जि. मा. का.) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत महानगरपालिका क्षेत्र, नगरपालिका क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील व्यक्तींसाठी रमाई आवास योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
राज्यातील नगरपरिषद व महानगरपालिका क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द व्यक्तींना पक्क्या घराचे बांधकाम करणे, कच्च्या घराचे पक्क्या घरात रुपांतर करणे तसेच शासकीय अभिकरणामार्फत घर खरेदी करण्याकामी शहरी भागासाठी रु. 2.50 लक्ष अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत रमाई आवास योजनेतून दिले जाते.
महानगरपालिका क्षेत्रासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सांगली, जुना बुधगांव रोड सांगली व सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका या कार्यालयाशी, नगरपालिका क्षेत्राकरिता- संबंधित मुख्याधिकारी नगरपरिषद/ नगरपंचायत कार्यालयाशी अर्ज करता येईल.
अर्ज सादर करताना जागेचा 7/12 उतारा / मालमत्ता नोंदपत्र, जातीचा दाखला, रहिवासी व उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, आधारकार्ड, घरपट्टी/ पाणीपट्टी/ वीजबील इ. कागदपत्रे आवश्यक आहेत. योजनेतून लाभ घेण्यासाठी शहरी भागासाठी रु. 3.00 लक्ष इतकी उत्पन्न मर्यादा असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰