कुंडल दि. २४ : क्रांती साखर कारखान्याने यंदा 12 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, शेतकऱ्यांच्या ऊसाला उच्चांकी भाव देण्याची परंपरा क्रांतीकडून कायम राखली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला ऊस क्रांतीस पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी केले.
कुंडल (ता. पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचा 24 वा गळीत हंगाम सुरू झाला. यावेळी उद्योजक संग्राम पाटील, मुंबई उच्च न्यायालय येथे कार्यरत असणारे विशेष सरकारी वकील अँड. कुलदीप पाटील, आमदार अरुण लाड व शरद लाड यांच्या हस्ते हंगामाची सुरुवात करण्यात आली. प्रारंभी सुरेश दत्तू शिंदे व सौ. शारदा सुरेश शिंदे यांचेहस्ते विधिवत पूजन झाले. याप्रसंगी कारखान्याचे आजी-माजी संचालक, अधिकारी, कर्मचारी यांचेसह शेतकरी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शरद लाड म्हणाले, कारखान्यामध्ये आधुनिकीकरणाचे काम सुरु असते. शिवाय गाळपक्षमता देखील वाढली आहे. कृत्रिम बुद्धीमतेच्या वापराने एकरी उत्पादन क्षमता वाढली आहे. बाहेरील जिल्ह्यात किंवा कर्नाटक राज्यात ऊस पाठवणाऱ्या शेतकऱ्यांनी यावेळी आपल्या सुख-दुःखात सहभागी असणाऱ्या, वेळेत ऊसतोडणी करून चांगला दर देणाऱ्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करावा. शेतकरी, अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्यानेच जिल्ह्यातील एक नामवंत असा आपला साखर कारखाना राज्य व देशपातळीवरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे. यापुढेही अशीच घोडदौड सुरु ठेवण्यासाठी एकजुटीने कार्यरत रहा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कार्यकारी संचालक अप्पासाहेब कोरे यांनी तर उपस्थितांचे आभार संचालक जयप्रकाश साळुंखे यांनी मानले. सूत्रसंचालन पवन चव्हाण यांनी केले.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰




