सांगली, दि. 19 (जि. मा. का.) : सैनिक संकटकाळात देशाचे आणि प्रत्येक देशबांधवाचे रक्षण करतात. देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या माजी सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधी संकलन केले जाते. त्यामुळे प्रत्येक शासकीय कार्यालयाने ध्वजदिन निधी संकलनाची 100 टक्के उद्दिष्टपूर्ती महिनाभरात पूर्ण करावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.
जिल्हा सैनिक मंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात पार पडलेल्या या बैठकीस मंडळाचे उपाध्यक्ष ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर (निवृत्त), शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा मंडळाचे सदस्य सचिव कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांच्यासह मंडळाचे शासकीय, अशासकीय सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन म्हणून कटिबद्ध आहोत. सैनिकांच्या प्रती, आपल्या देशाप्रती आपली आत्मियता, भावना व्यक्त करण्यासाठी ध्वजदिन निधी संकलनाचे काम सामाजिक कार्य समजून विविध विभागांनी यास प्राधान्य द्यावे. प्रत्येक विभागाने विहित वेळेआधीच ध्वजदिन निधी संकलनाचे दिलेले उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करावे. तसेच, माजी सैनिकांच्या शासकीय किंवा वैयक्तिक अडचणी सोडवून त्यांचे जीवन सुकर करण्यासाठी महसूल विभागाने समन्वय करावा, असे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सैन्य दलात असताना देशसेवा बजावलेल्या माजी सैनिकांनी महापुरासारख्या आपत्तीप्रसंगी स्वयंसेवकांची भूमिका पार पाडावी. यासाठी स्थानिक स्तरावर आपले नाव व भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवावा.
यावेळी उपस्थित सदस्यांनी त्यांच्या समस्या, मत मांडले. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी सादरीकरण केले.
हेही पहा ---
https://youtu.be/iAAv8RU2hKI?si=C2tmp72vsUPMRtoW
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰