जिल्हा प्रशासनातर्फे रयतेच्या राजाला मानाचा मुजरा
“जय शिवाजी जय भारत” पदयात्रा उत्साहात संपन्न
सांगली, दि. 19 (जि. मा. का.) : हिंदवी स्वराज्य निर्मितीसह छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यभर लोकांच्या हितासाठी, कल्याणासाठी झटले. म्हणूनच त्यांचा ठसा 400 वर्षांनंतरही या मातीमध्ये टिकलेला आहे. शिवाजी महाराज उत्तम योद्धे होते. त्याचबरोबर उत्तम प्रशासकही होते. त्यांच्या कार्यातून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रेरणा घ्यावी व लोकाभिमुख प्रशासन चालवावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे रयतेच्या राजाला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्हा परिषदेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील, अतिरीक्त पोलीस अधीक्षक रितू खोखर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, महानगरपालिका अतिरीक्त आयुक्त रविकांत आडसूळ, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, शहर पोलीस उपाधिक्षक आर. विमला, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
शिवजन्मोत्सवाच्या नागरिकांना शुभेच्छा देवून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज कधीतरी सांगलीतून गेले असतील, त्यामुळे ही माती मस्तकी धारण करावी अशीच आहे, हे आपणा सर्वांचे भाग्य आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या उत्कर्षासाठी प्रयत्न केले, तसेच, आपण आपल्या जिल्ह्याच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करूया. लोकाभिमुख प्रशासनाद्वारे शेतकरी व सामान्य माणसाच्या कल्याणासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रयत्नरत राहावे. जिल्ह्यात सुरू असलेल्या अनिष्ट बाबींच्या पार्श्वभूमिवर आज शिवजयंती दिनी सर्वांनी सांगली जिल्हा ड्रग्ज मुक्तीसाठी संकल्प करूया व पुढील वर्षीच्या शिवजयंतीपर्यंत जिल्हा ड्रग्ज मुक्त करू, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी मनोगतात छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून, शिवाजी महाराजांची न्याय, सुशासन आणि लोककल्याणाची शिकवण डोळ्यासमोर ठेऊन पुढे वाटचाल करावी, असे आवाहन करून उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषद वसंतदादा समिती सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. प्रारंभी पोलीस बँड पथकाच्या वतीने राज्यगीतवादन करण्यात आले. त्यानंतर शिवजन्मोत्सव पाळणागायन करण्यात आले.
यावेळी शिवजयंतीनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांना प्रातिनिधीक स्वरूपात प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले. तसेच राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडुंचा सत्कार करण्यात आला.
“जय शिवाजी जय भारत” पदयात्रा उत्साहात
केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम और खेल मंत्रालय युवा कार्यक्रम विभाग व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार “जय शिवाजी जय भारत” पदयात्रा कार्यक्रमातून शिवजागर करण्यात आला. जिल्हा परिषद सभागृह – राम मंदिर चौक - स्टेशन चौक मार्गे “जय शिवाजी जय भारत” असे मार्गक्रमण करून छत्रपती शिवाजी पुतळा (तरूण भारत मंडई, मारूती चौक) येथे पदयात्रेची सांगता झाली. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास जिल्हाधिकारी अशोक काकडे व अन्य विभागप्रमुखांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले. पदयात्रेदरम्यान स्टेशन चौक येथील महात्मा गांधी पुतळा व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यासही पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. राज्यगीत वादनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
पदयात्रा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात दांडपट्टा, तलवारबाजी, लाठी...काठी, कराटे आदि प्रात्यक्षिके सादर केली. पदयात्रेस जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी हिरवा झेंडा दाखवला. या पदयात्रेमध्ये विविध कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, महिला यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. पारंपरिक वेशभूषेतील उपस्थित, प्रतिकात्मक बालशिवबा, बालजिजाऊ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.