yuva MAharashtra रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी सामाजिक चळवळ उभी राहावी - प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी सामाजिक चळवळ उभी राहावी - प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2025 चे उद्घाटन

   


सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : वाढते अपघात टाळण्यासाठी व रस्ते सुरक्षेसाठी शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देऊन, त्याचे पालन करण्याची सवय लावणे आवश्यक आहे. वाहतूक नियम व रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती ही केवळ प्रशासकीय पातळीवरच न राहता यासाठी सामाजिक चळवळ उभी राहावी, असे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या अध्यक्षा तृप्ती धोडमिसे यांनी आज येथे केले.



उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली जिल्हा पोलीस दल व सार्वजनिक बांधकाम विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सडक सुरक्षा - जीवन रक्षा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान २०२५ च्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. वसंतदादा औद्योगिक वसाहतीच्या चारूभाई शहा सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमास सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तथा जिल्हा रस्ते सुरक्षा समितीचे सदस्य प्रसाद गाजरे, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते.


    नूतन वर्षारंभाच्या शुभेच्छा देतानाच वाहतूक नियमांचे पालन करण्याचा नववर्षाचा संकल्प करूया, असे आवाहन करून प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, दर्जेदार रस्ते, रस्ते सुरक्षेसाठी विविध माध्यमांतून प्रबोधन करूनही रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. यासाठी गृहित धरणे ही मानवी प्रवृत्ती कारणीभूत आहे. वाहतूक नियमांचे पालन न केल्याने जीवित हानी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते. वाहन चालविताना आपल्या छोट्या कृतीही अपघात टाळू शकतात. वाहन चालविताना मोबाईल फोनवर न बोलणे, योग्य वेगमर्यादा राखणे, हेल्मेट वापरणे व सीलबेल्ट लावणे अशा गोष्टींमुळे आपले कुटुंब सुरक्षित राहील, याची जाणिव सर्वांनी ठेवावी, असे त्या म्हणाल्या.




महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता म्हणाले, वैयक्तिक जीवनात आपणास अपघातास सामोरे जावे लागल्याने रस्ते सुरक्षेचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले. वाहतूक नियमांचे पालन गांभीर्याने करणे आपल्या प्रत्येकाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत सुरक्षा उपायांचा आढावा घेतला जातो. या उपायांची अंमलबजावणीही केली जाते. यासाठी नागरिकांच्या सूचनांचेही स्वागत असल्याचे सांगून पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, रस्ते अपघात टाळता आल्यास जीवित व वित्तहानी होणार नाही, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही. त्यामुळे रस्ते सुरक्षेत समाजातील प्रत्येक घटकाने सहभागी व्हावे. नवीन वर्षात अपघातसंख्या शून्यवर आणणे हे आपले लक्ष्य आहे. त्याला नागरिकांनाही सहकार्य करावे. जबाबदार नागरिक म्हणून वाहतूक नियमांचे पालन करावे, असे ते म्हणाले.



यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आकाश गालिंदे, महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दलाचे महासमादेशक अनिल शेजाळे यांच्यासह उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस प्रशासनातील अधिकारी, मोटर वाहन निरीक्षक, कर्मचारी, वाहतूक संघटनेचे पदाधिकारी, ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी, तानुबाई खाडे इंग्लिश स्कूल, मिरजचे आर. एस. पी. बालसैनिक व विक्रांत गौंड, शासकीय तंत्रनिकेतनचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



प्रास्ताविकात प्रसाद गाजरे यांनी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचा हेतू विषद केला. हे अभियान मर्यादित न ठेवता वर्षभर जनजागृतीपर विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यानी सांगितले.

यावेळी शालेय वाहतूक सुरक्षा दलाला प्रोत्साहन दिल्यास वाहतूक साक्षरता होऊन संभाव्य अपघात टळण्यास मदत होणार असल्याचे अनिल शेजाळे यांनी सांगितले.




सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे बाळासाहेब कलशेट्टी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस व सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने तयार करण्यात आलेल्या वाहतूक नियम जनजागृतीपर दोन स्वतंत्र माहिती पुस्तिकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, उपस्थितांना रस्ते वाहतूक नियमांच्या पालनाबाबतची शपथ देण्यात आली. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रेलरवर प्रातिनिधीक रिफ्लेक्टर्स प्रदर्शित करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सूत्रसंचालन सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक सुनील मुळे यांनी केले. आभार पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी मानले.






🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰