BANNER

The Janshakti News

चारा उपलब्धतेबाबत शास्त्रीय पद्धतीने सर्व्हे करा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचे निर्देश




 

            सांगली, दि. 11 (जि.मा.का.) :- जिल्ह्यातील पशुधनास आवश्यक चारा उपलब्ध व्हावा या दृष्टीने कृषी, महसूल, पशुसंवर्धन आणि जिल्हा परिषदेमार्फत चारा टंचाई जाणवणाऱ्या तालुका, गावात प्रत्यक्ष भेट देऊन चारा उपलब्धतेबाबत शास्त्रीय पद्धतीने सर्व्हे करून याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज दिले.


            खरीप हंगाम 2023 मध्ये दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यातील जनावरांकरिता चारा डेपो सुरू करणे संदर्भात जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ.  राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात झाली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, मिरज उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे, जतचे उपविभागीय अधिकारी अजय नष्टे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी शशिकांत शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अजयनाथ थोरे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी मनोजकुमार वेताळ आदी उपस्थित होते.


            जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, चारा उपलब्धतेबाबत सर्व्हे करताना प्रत्यक्ष त्या त्या क्षेत्रावर भेट देऊन करावा. गावातील लहान मोठे पशुधन, उपलब्ध सुका चारा, ओला चारा याबाबत माहिती संकलित करावी.  त्यानुसार ओला चारा, सुका चारा याबाबतच्या मागणीबाबत सविस्तर अहवाल तयार करावा. अहवाल तयार करताना झालेला पाऊस, होणारा पाऊस यामुळे उपलब्ध होणारा चारा याचीही माहिती  घेण्यात यावी. चारा उपलब्धतेबाबत संबधित ग्रामपंचायत येथे बैठक घेऊन गावातील उपलब्ध चारा याबाबत पदाधिकाऱ्यांना माहिती देऊन अवगत करावे. अहवालानंतर संबंधित तालुक्यात चारा डेपो सुरू करणे आवश्यक असल्यास या ठिकाणी चारा डेपोसाठी ठिकाण, चारा डेपो सुरू करण्यासाठी इच्छुक सेवा संस्था, दूध उत्पादक संस्था इत्यादींची माहिती तयार ठेवावी. तसेच या भागातील पशुधनांचे इयर टॅगिंगही पशुसंवर्धन विभागाने तातडीने करून घ्यावे. शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यात समाविष्ठ नसलेल्या जत व आटपाडी तालुक्यात चारा उपलब्धतेबाबत  प्रस्ताव सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या.


            या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी टंचाई परिस्थिती, टँकरद्वारे सुरू असलेला पाणी पुरवठा, पेरणी, पीक कर्ज वाटप, ई पीक पाहणी, इ केवायसी संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖