BANNER

The Janshakti News

डॉ. लालासाहेब बाबर: एक तेजोमय इतिहास


======================================
======================================

     डॉ. लालासाहेब बाबर: एक तेजोमय इतिहास

सोनंद येथील माजी सरपंच व थोर गांधीवादी नेते लालासो बाबर यांचे 2013 मध्ये 94 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. 17 मार्च रोजी त्यांची प्रथम पुण्यतिथी त्यांच्या सोनंद येथील निवासस्थानी प्रसिद्ध व्याख्याते मा.सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या उपस्थितीत साजरी होत आहे.लालासाहेब बाबर यांना 92 व्या वर्षी  कॉमनवेल्थ व्होकेशनल विद्यापीठाची पी.एच.डी. प्रदान करण्यात आली होती.त्यांच्या सामाजिक,सांस्कृतिक ,राजकीय कार्याची दखल घेऊन कॉमनवेल्थ व्होकेशनल या आतंरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठाने डॉक्टरेट देऊन सन्मानित करण्यात आले होते.
                लालासाहेब बाबर यांचा जन्म मध्यप्रदेश मधील ग्वालियर(ग्वाल्हेर) येथे 1 जानेवारी 1930 मध्ये झाला. त्यांचे वडील माधवराव बाबर हे ग्वालियर येथील सिंधिया(शिंदे) संस्थान मध्ये हत्तीखाना व घोडदळ विभागाचे सरसेनापती म्हणून कार्यरत होते.बालपणीचे शिक्षण हे ग्वालियर मध्ये झाले.यावेळी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे वडील पण्डित कृष्ण बिहारी वाजपेयी  ग्वालियर संस्थान मध्ये  अध्यापनाचे कार्य करीत होते.कृष्ण बिहारी वाजपेयी व लाला साहेबांचे वडील माधवराव बाबर यांचे घरोब्याचे संबंध होते.त्यामुळे अटलबिहारी वाजपेयी यांचा शालेय जीवनामध्ये सहवास लाभला.त्यांच्याबरोबर सिंधिया संस्थान च्या शाळेत एकत्र शिक्षण घेत असताना एकाच घोडागाडी(बग्गी) मधून शाळेपर्यंतचा दररोज प्रवास  करता आला.त्यावेळी बालपण राजेशाही परिवारासोबत अनुभवता आले.त्यानंतरचे शिक्षण सोनंद येथील शाळेत झाले.त्यावेळी देशाच्या स्वातंत्र्याची चळवळ मोठया प्रमाणात सुरू होती.यावेळी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झाले व देशप्रेमाची बीजे मनात रुजली गेली. देशाच्या स्वातंत्र्य चळवळी मध्ये विद्यार्थीदशेत असताना सहभाग घेतला.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लालासाहेब बाबर यांनी 1946 ते 47 मध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा सुरू केली.यावेळी मानेगाव या ठिकाणी शाळा सुरू करून त्यांनी अध्यापनाच्या महान कार्यास सुरवात केली.त्यावेळी मुख्याध्यापक व शिक्षक या दोन्ही भूमिका निभावल्या .आपल्या अनुभवाच्या माध्यमातून आपले विध्यार्थी राष्ट्रप्रेमी,निर्व्यसनी,निरोगी,निस्वार्थी बनावे यासाठी चांगल्या पद्धतीने प्रयत्न.त्यावेळेला त्यांच्या कार्याची दखल अनेकांनी घेतली. शिक्षक म्हणून काम करत असताना सामाजिक कार्य करण्याच्या हेतूने सेवा केली परंतु देशासाठी अधीक योगदान देता यावे व समाजसेवा करता यावी म्हणून नोकरीचा 1950 मध्ये राजीनामा देऊन  स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले.


राजकीय क्षेत्रात प्रवेश केला.सोनंद गावचे सरपंच म्हणून पदभार हाती घेतला.यावेळी नुकतेच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशामध्ये एक उत्साहाचं वातावरण होतं.देशप्रेमाने भारावलेली पिढी कार्यरत होती. अशावेळी सरपंच म्हणून काम करत असताना त्यावेळी 1952 मध्ये तंटामुक्ती गाव अभियान योजना सोनंद ग्रामपंचायतीमध्ये अंमलात आणली.गावातील अनेक न्यायालयीन प्रकरण किंवा पोलीस स्टेशन मधील प्रकरण गावांमध्ये मिटवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. गावांमध्ये कायदा-सुव्यवस्था टिकवण्यासाठी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करून गाव भयमुक्त करण्याचा प्रयत्न केला. गाव स्वच्छ करण्यासाठी गाडगेबाबांच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार त्यांनी गावामध्ये केला आणि गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा प्रयत्न केला.असे अनेक क्रांतिकारी निर्णय घेऊन सोनंद ग्रामपंचायतीने जिल्ह्यामध्ये एक आदर्श निर्माण केला.त्यांच्या कार्यावर प्रभावित होऊन सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री झुबेरी साहेब यांनी स्वतःच्या अखत्यारीत  शंभर विहिरी मंजूर करून जलयुक्त गाव अभियान अजून बळकट केले. गावातील जिरायती शेती बागायती खाली आणण्यात महत्त्वाचं कार्य त्यांनी केले. त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सहा ते चौदा वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण देण्यासाठी आग्रही राहून पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले व सर्व शिक्षित झालेल्या झालेल्या तरुणांना प्राथमिक शिक्षक म्हणून  रुजू करण्यात महत्वाची भूमिका बजावली तसेच अन्य विभागांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून दिली.शेतीमध्ये  आधुनिकीकरण करण्याच्या बाबतीमध्ये मोठं कार्य केलं.जिल्हा बंडिंग कमिटीचे प्रमुख म्हणून  काम करत असताना  गावातील सर्व जलसंधारणाची काम प्रभावीपणे राबवली.गाव जलयुक्त करण्यामध्ये मोठा वाटा उचलला.आज शासन राबवत असलेल्या अनेक योजना त्यांनी त्या काळात आपल्या कल्पकतेने राबविल्या. आयुष्यामध्ये सकारात्मक जीवन जगले कधी कोणत्याही गोष्टीचा हव्यास केला नाही. राजकीय भूमिका घेत असताना घेत असताना
 निष्ठा आणि प्रामाणिक पणे काम केले. कधीही तत्त्वांमध्ये तडजोड केली नाही.त्याबरोबर विरोधकांशी सुद्धा राजकीय विरोध असताना कोणताही आकस व वैरभाव मनात न ठेवता सामंजस्याची भूमिका घेऊन राजकारण केले. वैयक्तिक संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे त्यांच्याविषयी आपलेपणाची भावना सतत सर्वांच्या मनामध्ये राहीली. गावामधील अनेक सामाजिक संस्था उभारण्यामध्ये पुढाकार घेतला.त्यामध्ये सहकार्यांना सामावून घेतले.सत्तेचे एकत्रीकरण न करता निस्वार्थी भावनेने सत्तेची विभागणी करून आपल्या साहकार्या सोबत काम केले.सांगोला तालुक्यातील विकासाच्या चळवळी मध्ये विविध पदावरती प्रामाणिकपणे काम केले.सांगोला तालुक्याच्या परिवर्तनाचा भाग बनले.आयुष्यभर त्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता एक विचार,एक पक्ष,एक भूमिका घेऊन आयुष्यभर कार्य केले.महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने काँग्रेस विचारासोबत कार्याला सुरुवात केली  व आजही वयाच्या 92 व्या वर्षी ते त्याच विचाराने कार्यरत आहेत. 
          यांनी कधीही व्यसन केलं नाही व तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला नेहमीच दिला.त्यांच्या निरोगी दीर्घायुष्याचे ते एक महत्वाचे कारण मानले पाहिजे. त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक व राजकीय कारकीर्दीत एकही गुन्हा त्यांच्यावर ती नोंद नाही किंवा न्यायालय मध्ये दावा नाही. अशा पद्धतीने निष्कलंक चारित्र्य व सकारात्मक जीवन तेथे त्यांनी व्यतीत केले. अनेकांना मार्गदर्शन करून एक-एक पिढी उभा करण्याचं महत्त्वाचं कार्य त्यांनी केले.'सायकल' हे संपूर्ण जीवनामध्ये त्यांच्या प्रवासाचे मुख्य साधन होते.  वयाच्या 92 व्या वर्षापर्यंत ते सायकलवरून प्रवास करतात.  कदाचीत त्यामुळेच आज कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या काळातही या वयामध्ये उत्तम निरोगी आरोग्य सांभाळून आहेत. कोणताही दीर्घआजार त्यांना नाही.अतिशय कठीण स्थितीवर सुद्धा मात करून ते आज निर्भयपणे,समाधानी जगले.
        सामाजिक कार्य करीत असताना त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक कौटुंबिक संकटे आली.कुटुंबाला प्रचंड आर्थिक परिस्थिलासुद्धा सामोरे जावे लागले.ती प्रामाणिक पानाची व निष्कलंक कार्याची काळाने घेतलेली एक परीक्षा सुद्धा असेल.त्या परिस्थितीलाही धीराने,निर्भयपणे तोंड दिले, त्यावेळी न डगमगता आपले कार्य व घेतलेला वसा त्यांनी सोडला नाही.वाईट त्यांनी काळातही संयमी व सरळमार्गी जीवन जागून त्यातून तावून सुलाखून बाहेर पडून व्यक्तित्वातला एक वेगळ्या उंचीवर पोहचवले.आपल्या आयुष्यात संपन्नता व टंचाई या दोन्ही टोकाची परिस्थिती अनुभवली. उत्कर्षाच्या काळामध्ये 'माज' व गरिबीच्या काळामध्ये 'लाज' या दोन्ही गोष्टी टाळून या काळात कसे वागावे व त्याला तोंड कसे द्यावे याचा एक आदर्श निर्माण केला होता.पडत्या काळातही आपल्या कुटुंबावर,मुलांच्यावर योग्य संस्कार व मार्गदर्शन केले, मुलांच्या  शिक्षणात खंड पडू न देता त्यांचे शिक्षण पूर्ण केले.त्याचाच परिणाम म्हणून आज त्यांचा मुलगा जगदीश, महेश व मुलगी सविता आपापल्या क्षेत्रात यशस्वी व संपन्न असून.आपले जीवन सुखी,समाधानी,प्रामाणिक व निरोगी जगत आहेत.तसेच त्यांच्या उच्च पदस्थ असणाऱ्या मीना व मानसी या दोन्ही सुना हा  सुखी,संपन्न व समृद्ध परिवार ही त्यांच्या प्रामाणिक व निष्कलंक चारित्र्याची व आयुष्याची सर्वात मोठी परमेश्वराने दिलेली देणगी व आशीर्वाद म्हटला पाहिजे.
         अशा या  गांधीवादी थोर नेत्याची 27 फेब्रुवारी 2023 रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबाबरोबर समाजातही फार मोठी कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली. लालासो बाबर हे स्वातंत्रपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील शंभर वर्षातील चालता-बोलता इतिहास होता.त्यांचे कार्य हे आधुनिक काळात जीवनाच्या सर्व बाजूंचा विचार करता,चोहो बाजुंना ज्ञानाचा,अनुभवाचा,संस्काराचा,निष्कलंक चारित्र्याचा,निरोगी आयुष्याचा,निस्वार्थी राजकारण व समाजकारणासाठी मार्गदर्शनाचा प्रकाश देणारे ठरले. असा हा त्यांचा तेजोमय इतिहास समाजाला निश्चित मार्गदर्शक ठरेल.


लेखक-
दिगंबर साळुंखे
मुख्याध्यापक ,केंद्रीय आश्रमशाळा सोनंद व
प्राचार्य
माणदेश हस्तकला अध्यापक विद्यालय,जत
मो. 9049106853


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆