BANNER

The Janshakti News

आला खोकला, तब्येत सांभाळा...

आला खोकला, तब्येत सांभाळा...


=====================================
=====================================


खोकल्याचं औषध घेण्यापूर्वी आपल्याला नेमका कोणत्या प्रकारचा खोकला झाला आहे, हे समजायला हवं!

सर्दी-खोकला ही जुळी भावंडं असल्यासारखे असतात. सर्दी झाली की काही दिवसांनी खोकला होतोच. विविध प्रकारचे धूर-धूळ वा वास नाकातोंडात गेल्यानं खोकला येतो. विशिष्ट प्रकारचे सेंट वा अत्तरं, रसायनांचे वास उदा. बॅगान स्प्रे वगैरे, आइस्क्रीम, थंड पाणी, शीतपेयं, सरबतं यांच्यामुळे खोकला होतो. थंड वातावरणात राहणं वा जाणं, एअरकंडिशन (वातानुकूलन) चा वापर अतिप्रमाणत करणं यामुळे खोकला होऊ शकतो. भरभर जेवताना एखादा कण श्वासामार्फत गेल्यामुळेसुद्धा खोकला येतो.

अति व्यायाम, ओझं उचलणं, अति चालणं, अति जागरण, अति बोलणं, दिवसा झोपणं, अति मैथुन करणं, अत्याधिक उपवास करणं, वेळी अवेळी भोजन करणं, कोरडे पदार्थ, शिळे पदार्थ खाणं इ. कारणांमुळे खोकला होतो. अति गोड, खारट, बुळबुळीत, मलावरोध उत्पन्न करणारे, अतिशय तेलकट, आंबट, कृत्रिम रंग आणि प्रिझरव्हेटिव्ह असणारे पदार्थ यांच्यामुळे खोकला होतो.

वात-कफाचा खोकला खोकला झाल्यावर तो वातप्रधान म्हणजे कोरडा असल्यास खोकताना फुटक्या भांड्याप्रमाणे आवाज येतो. बऱ्याच वेळा खोकला आल्यावर थोडा कफ पडतो आणि नंतर ढास थांबते. कफप्रधान म्हणजे ओला खोकला असल्यास खोकताना कफ सुटत असतो. तो वारंवार थुंकून टाकावा लागतो. क्वचित थोडा दम लागतो. बारीक ताप येणं किंवा अंग दुखणं यासारखी लक्षणं उत्पन्न होतात. आवाज बसणं, खोकून तोंडाला कोरड पडणं, थकवा जाणवणं यासारखी लक्षणं दिसतात. कोरडा खोकला होतो. त्याला डांग्या खोकला म्हणतात.

कफाच्या खोकल्यावरचा इलाज  कफप्रधान खोकला असल्यास सुंठ, मिरी, पिंपळी यांचं चूर्ण मधातून चाटवावं. सुंठ टाकून उकळलेलं पाणी प्याल्यानं खोकला आणि कफ कमी होतो. अडुळसा या वनस्पतीचा रस काढून त्यात मध टाकून किंवा त्याचा काढा करून पाजल्यास खोकला कमी होतो. कोरफड भाजून त्यातील गर काढून त्यात मध मिसळून चाटवल्यास खोकला कमी होतो. दालचिनी पावडर मधातून वारंवार चाटवावी त्यानं खोकला कमी होतो. द्राक्षासव, कुमार आसव, अडुळसा सिरप, पिंपलासव ही बाजारात मिळणारी औषधे उपयुक्त आहेत. छातीला तीळ तेल आणि सैंधव एकत्र करून मॉलिश करावी आणि गरम पाण्याच्या पिशवीनं आणि कपड्यानं शेक द्यावा. दोन चमचे तुळशीचा रस आणि एक चमचा आल्याचा रस आणि मध असं चाटण द्यावं किंवा तुळशीचा काढा करून प्यावा. यामुळे खोकला कमी होतो. गवती चहाचा काढा करावा. त्यात सुंठ, पिंपळी, दालचिनी, मिरी आणि गूळ टाकून एक कपभर काढा पाजावा. कफ खोकला आणि सर्दी कमी होते. वेलदोडे आणि लवंग तव्यावर भाजून त्याची राख मधातून चाटवल्यास कफ खोकला त्वरित कमी होतो.

कोरड्या खोकल्यावरचे उपाय कोरडा खोकला किंवा वातप्रधान खोकला असल्यास खोबरेल तेल, तीळाचं तेल किंवा सहचर तेल वा दोन तीन चमचे गायीचं तूप, गरम पाणी आणि चिमूटभर सैंधव मीठ असं एकत्र करून पाजल्यास खोकल्याची ढास त्वरित कमी होते. तेल किंवा तूप हे या खोकल्यातील प्रभावी औषध आहे.

रुईची फुलं, पानं वाळवून ती जाळून त्याची राख करून ठेवावी व ती राख एक चिमूट मधातून किंवा तेलातून चाटविल्यास खोकला आणि दमा त्वरित कमी होतो. सागाची पानं, पळसाची पानं, रुईची पानं, फुलं, आवळकाडी जाळून त्याची राख, त्रिफळा किंवा बेहडा लवंग, वेलदोडा, गायीच्या शेणाची राख यांचा प्रभावी उपचार या खोकल्यामध्ये होतो. डाळिंबाची साल उगाळून चाटवणं किंवा सालीचा काढा करून त्यात तूप आणि सैंधव मीठ टाकून दिल्यास कितीही खोकला असेल तरी तो तत्काळ थांबतो. हळद, सुंठ आणि गूळ एकत्र करून त्याचा बोराएवढ्या गोळ्या करून ठेवाव्यात आणि दर १०-१५ मिनिटांनी चघळण्यास द्याव्या. यामुळेही खोकला कमी होतो. कोरडा खोकल्याचं प्रमाण अतिशय असल्यास तेलाची मात्रा बस्ती म्हणजे एनिमा द्यावा. तत्काळ उपयोग होतो.

संकलन- 
निसर्ग उपचार तज्ञ
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे. 
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक

हेही पहा ----





◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆