आडसाली क्षेत्र कमी करणेसाठी उचलले पाऊल
=====================================
=====================================
कुंडल : वार्ताहर दि. ०६ जून २०२३
कुंडल (ता.पलूस) : आडसाली क्षेत्रावर नियंत्रण करणेसाठी, पूर्वहंगामी लागण करणा-या शेतक-यांना निम्म्या किंमतीत ऊस बियाणे पुरवठा करण्याचा निर्णय कारखान्याने घेतला असल्याची माहिती क्रांतिअग्रणी डॉ जी. डी. बापू लाड सहकारी साखर साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार अरूणअण्णा लाड यांनी दिली.
आमदार लाड म्हणाले, संशोधन केंद्राच्या शिफारशीनुसार कारखान्याकडे उपलब्ध असणा-या एकूण ऊस क्षेत्रापैकी आडसालीचे प्रमाण १५ टक्क्यापर्यंत असणे आवश्यक आहे. तथापी मागील काही हंगामांचा आढावा घेतल्यास, आडसाली क्षेत्र ४० टक्क्यापेक्षाही जास्त वाढले आहे. लागण तारखेच्या प्राधान्यक्रमानुसार या ऊसाची तोड जानेवारी अखेरपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त लांबते त्याचा परिणाम पुढील तारखेच्या ऊस तोडीवर होती. पुढच्या तारखेच्या ऊसाला लवकर तोडणी येत नसल्यामुळे उत्पादनाचे अर्थशास्त्र समजून न घेता लवकर तोडणीच्या हव्यासापोटी आडसालीचे क्षेत्र वाढत चालल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, कारखान्याचे आडसाली ऊसाचे क्षेत्र सरासरी एकरी उत्पादन ५६ मे. टन इतके आहे. तोडणीचा कालावधी १८ महिने आहे. या कालावधीनुसार आडसाली ऊसाचे उत्पादन ३ मे. टन प्रती महिना इतके मिळते पूर्वहंगामी ऊसाचे सरासरी एकरी उत्पादन ४५ मे. टन इतके आहे. तोडणीचा कालावधी १५ महिने आहे. या कालावधीनुसार पुर्वहंगामी ऊसाचेही प्रती महिना उत्पादन आडसाली ऊसाइतकेच मिळते. त्यामुळे आपण महिन्याला किती मे. टन ऊसाचे उत्पादन घेतले याचा विचार शेतक-यांनी करावा. आपल्या भागातील हवामान ऊसपिकाला पोषक आहे. योग्य व्यवस्थापन केलेस, पूर्वहंगामी ऊसाचे उत्पादन आडसाली ऊसाबरोबर मिळू शकते. आडसाली हंगामामध्ये फायद्यापेक्षा तोटे जास्त असल्याचे दिसून येते. यामध्ये अतिवृष्टी झाल्यास फुटवे न येता ऊस एकशेवडी होणे. पावसाची उघडीप झालेनंतर जेठा कापून उशिरा फुटवे घेतल्यामुळे होणारे परिणाम, आंतरपिक घेतलेस त्याच्या वसपीमुळे फुटव्यावर होणारा परिणाम दोन पावसाळ्यामुळे तणनियंत्रणावरील वाढणारा खर्च ऊस पडल्यामुळे कठीण होणारे रोगकिड नियंत्रण याशिवाय लांबलेल्या तोडीमुळे उत्पादनात होणारी घट या प्रमुख अडचणी येतात.
पूर्वहंगामी लागण आडसालीपेक्षा अधिक फायद्याची आहे. यामध्ये खरीपाचे एक पिक घेता येते. ऊसाची उगवण फुटवे मोठी भरणी या सर्व अवस्था व आंतरमशागतीची कामे योग्यवेळी होतात. उत्पादन खर्चात बचत होते, तणाचा प्रादुर्भाव तुलनेने कमी होतो. ऊस पडण्याचे प्रमाण कमी राहते. या सर्व गोष्टीचा विचार करून, सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत कारखान्याच्या बेणेमळ्यातील बेणे घेऊन जे शेतकरी लागण करतील त्या शेतक-यांना निम्म्या किंमतीत येणे पुरवठा करणेचा निर्णय कारखान्याने घेतला आहे. यामध्ये संशोधन केंद्राने शिफारशीत केलेल्या सर्व ऊसजातींचा समावेश व एकरी ७ हजार, २ डोळ्याची टिपरी ही कमाल मर्यादा धरून बेणे पुरवठा केला जाणार आहे. जे शेतकरी स्वतःच्या शेतात गादीवाफ्यावर ऊसरोपे तयार करून, लागण करतील त्यांना "माझी नर्सरी माझी लागण" या योजनेतील अनुदानाव्यतिरिक्त बेणे दराच्या सवलतीचा फायदा मिळणार आहे. कारखाना अथवा खासगी रोपवाटीका येथून खरेदी केलेली रोपे तसेच कारखान्याच्या बेणेमळ्या व्यतिरिक्त परस्पर खरेदी केलेले बियाणे यासाठी सदरची सवलत दिली जाणार नाही, असे सांगून इच्छुक शेतक-यांनी १५ ऑगस्टपर्यंत ऊसविकास विभागाकडे या योजनेत सहभागी होणेसाठी अर्ज करावेत असे आवाहन त्यांनी केले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆