महाराष्ट्र शासन, आरोग्य विभागाकडून वैद्यकीय अधिकारी (बि. ए. एम. एस.) यांच्यावर 23 वर्षांपासून अन्याय...
२३ वर्षांपासून एकही पदोन्नती नाही..!
" गट अ " करिता बि.ए. एम.एस. वैद्यकीय अधिकारी पदोन्नतीच्या प्रतिक्षेत...
=====================================
==============================
मुंबई: गेल्या 23 वर्षापासून निमूटपणे फक्त आणि फक्त आरोग्य सेवेचे व्रत धारण केलेल्या वैद्यकीय अधिकारी " गट ब " (बि.ए.एम.एस.) यांना "गट अ" मध्ये पदोन्नतीची प्रदीर्घ प्रतिक्षा असून आता अन्याय व अन्यायाच्या सहनशिलतेची परिसिमा झालेली आहे. तरी हा अन्याय आता दूर व्हावा आणि पदोन्नतीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात व हक्क असलेली "गट अ " ची पदोन्नती मिळावी, ही प्रमुख मागणी आहे. २३ वर्षे पासून रेंगाळत असलेला हा प्रश्न तात्काळ मार्गी लागावा व न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकिय अधिकारी महासंघाचे अध्यक्ष डॉ. अरुण कोळी यांनी केली आहे.
कोव्हिड पॅनडेमिक कालावधीमध्ये भारतात, टॉप-5 मध्ये महाराष्ट्र राज्याला आणण्यात सिंहाचा वाटा उचलणा-या वैद्यकिय अधिकारी " गट ब " (बि.ए. एम.एस.) यांच्या पदोन्नती बाबत महाराष्ट्र शासनाचे दुर्लक्ष व उपेक्षा होत असल्याची खंत व तिव्र खेद असल्याचे वैदयकिय अधिकारी गट ब संवर्गात प्रचंड असंतोषासह दुःख व वेदना यांचे संमिश्रण पहावयास मिळते आहे. ग्रामीण आरोग्य यंत्रणेचा कणा व ग्रामीण आरोग्याचा डोलारा समर्थपणे पेलणाऱ्या व सांभाळणाऱ्या वैदयकिय अधिकारी " गट ब " (बि.ए.एम.एस.) यांच्या पदोन्नती बाबत मात्र महाराष्ट्र शासन गेल्या २३ वर्षापासून गप्प व निष्क्रिय असल्याचे दिसत आहे.
दरम्यान महाराष्ट्र शासनाने दि. १४ जून २०२२ रोजीच्या पत्रान्वये वैद्यकिय अधिकारी " गट ब " (बि.ए. एम.एस.) यांच्या सेवाज्येष्ठता व बिंदुनामावली याद्या अद्ययावत करण्यासंदर्भात आरोग्य विभागांस आदेश दिले आहेत. याच पत्रातून " गट ब " - वैदयकिय अधिकारी यांना "गट अ" संवर्गात पदोन्नती देण्याबाबत लोकप्रतिनिधी व संघटनेकडून मागणी होत असून अनेक निवेदने देखील देण्यात आली आहेत. या विषयाबाबत राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण यांचे अध्यक्षतेखाली दि. २४.०२.२०२२ रोजी बैठक होऊन शासन अधिसूचना २०१९ नुसार समावेशन झालेल्या वैद्यकिय अधिकारी " गट ब " यांना " गट अ " संवर्गात समावेशन करण्याबाबत झालेली आहे.
या बैठकीत राज्यमंत्री यांनी या विषयाबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवालासह प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागास दिले आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकिय अधिकारी महासंघ संघटनेतर्फे, सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांना अनेकवेळा याबाबत निवेदने देण्यात आलेली आहेत.
या निवेदनातून प्रामुख्याने वैद्यकिय अधिकारी " गट अ " सेवाप्रवेश नियमात सुधारणा करून मवैआसे " गट ब " यांना २५% पदे आरक्षित करणे. तसेच २०१९ मध्ये सेवा समावेशन झालेल्या वैद्यकिय अधिकारी " गट ब " यांना " गट अ " मध्ये पदोन्नती मिळणे.
वरील दोन्ही प्रमुख विषयांसंदर्भात किमान १३७ सर्वपक्षिय आमदार, अनेक लोकप्रतिनिधी, खासदार यांची शिफारसपत्रेही आरोग्य मंत्री महोदयांना देण्यात आलेली आहेत. या निवेदनांवर आरोग्यमंत्री यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत बैठक आयोजीत करण्याचे निर्देश दिलेले असूनही आजपर्यंत आरोग्यमंत्री महोदयांच्या अध्यक्ष्यतेखाली बैठक आयोजीत करण्यात आलेली नाही.
तरी सन २०१३ सालच्या सेवा प्रवेश नियमीत बदल करण्यात येवून पूर्वीप्रमाणे नियम ४ मध्ये पदभरतीचे प्रमाण २५ : ७५ करने. मागील २३ वर्षापासून बि. ए. एम. एस. वैद्यकिय अधिकारी " गट ब " यांच्या पदोन्नतीचा रिक्त असलेला अनुशेष आहे, सदर पदावर आज रोजी कार्यरत वैद्यकिय अधिकारी " गट ब " संवर्गातील सर्व अधिकारी यांना " गट अ " संवर्गात पदोन्नती देण्यात यावी. वैद्यकिय अधिकारी यांचा एकच संवर्ग असावा.
सदर निवेदने व विषयाबाबत वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत बैठक आयोजित करण्यात येवून योग्य ते निर्देश देण्यात यावेत. अशी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकिय अधिकारी महासंघाचे अध्यक्ष डॉ. अरुण कोळी यांनी केली आहे.
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆