BANNER

The Janshakti News

दलित महासंघाची "तिरंगा यात्रा" - भूमिका आणि इतिहास..



दलित महासंघाची "तिरंगा यात्रा" - भूमिका आणि इतिहास..

======================================


======================================

दि. 27 / 05 / 2022

मित्रहो,
 दलित महासंघ ही मातंग समाजाचा जनाधार असलेली आणि महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये तीस वर्षे कार्यरत असणारी, जनमानसाच्या हृदयापर्यंत पोहोचलेली सामाजिक संघटना आहे. या संघटनेचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत आक्रमक आणि वैशिष्ट्यपूर्ण आंदोलने तसेच वेळोवेळी घेतलेल्या अत्यंत महत्वपूर्ण व स्वाभिमानी भूमिका.
 दलित महासंघाच्या वतीने  9 मे ते 27 मे या कालावधीमध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आली. त्या मागची भूमिका आणि इतिहास महाराष्ट्राला  माहीत व्हावा म्हणून हे  लिहित आहे.
 मित्रहो,
 भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याला 2022 मध्ये 75 वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणजेच हे वर्ष स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. परंतु स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवी वर्षांमध्ये कुठल्याही प्रकारचा उत्साह किंवा तशा प्रकारचे क्रांतीमय वातावरण दिसत नाही. स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव संपूर्ण देशभर धूमधडाक्यात साजरा व्हायला हवा होता. परंतु ना प्रशासकीय स्तरावर, ना शासकीय स्तरावर, ना गावात, समाजात, शाळा-महाविद्यालयात, स्वातंत्र्याचा जल्लोष कुठेही दिसत नाही. ज्या देशातील लोक आपल्या क्रांतिकारकांना आणि हुतात्म्यांना विसरतात तो देश,  तो समाज हा मृत समाज मानला जातो आणि हीच गोष्ट आम्हाला अस्वस्थ करत होती. मी स्वतः क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांती अग्रणी जी. डी.बापू लाड, क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी, क्रांती विरांगणा इंदुताई पाटणकर, राजमती बिरनाळे ..अशा अनेक क्रांतिकारकांच्या सहवासात आलो होतो. या लोकांना मी पाहिले आहे. मी यांना भेटलो आहे, बोललो आहे, त्यांच्यासोबत राहिलो आहे, त्यांचे कार्य मी ऐकले आहे,वाचले आहे, त्यामुळे, स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये या स्वातंत्र्यवीरांचा, क्रांतिकारकांचा कुणी उच्चारही करीत नाही. विचारही करीत नाही ही गोष्ट मनाला सलत होती. म्हणूनच दलित महासंघाच्या वतीने या तमाम क्रांतिकारकांना अभिवादन करावयाचे ठरवले. त्यातूनच तिरंगा यात्रा काढण्याचा विचार पुढे आला आणि हि तिरंगा यात्रा "बिळाशी ते सावळज" अशाप्रकारे  काढण्याचे जाहीर करण्यात आले. 

बिळाशी येथूनच तिरंगा यात्रेची सुरुवात कशासाठी ?  
मित्रहो,
 भारत देशाच्या स्वातंत्र्य चळवळी मध्ये अनेक सत्याग्रह झालेले आहेत आणि गाजले आहेत. त्यामध्ये जसा मिठाचा सत्याग्रह महत्त्वाचा होता त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बिळाशी या गावचा ही सत्याग्रह तितकाच महत्त्वाचा होता. जंगल सत्याग्रह म्हणून तो इतिहासात अजरामर आहे. पण खरे तर तो तिरंगा सत्याग्रह आहे. या गावांमध्ये 1930 मध्ये तिरंगा फडकविण्यात आला होता. या गावातील लोकांनी जवळच्याच अस्वल दरा येथून एक सागवानाचा झाड (सोट)वाजत गाजत महादेवाच्या देवळात आणला आणि मंदिरातील दीपमाळेच्या जवळ उभा केला आणि त्या वरती तिरंगा फडकविला होता. ही बातमी ब्रिटिश अधिकाऱ्यांना कळाल्यानंतर बंकट सिंग नावाचा ब्रिटिश अधिकारी बिळाशी गावामध्ये आला. त्याने तिरंगा खाली घेण्याविषयी आवाहन केले. परंतु गावातील स्त्री-पुरुषांनी तिरंग्याचे रक्षण केले . यावेळी ब्रिटिशांनी गावकऱ्यांवर गोळीबार केला. या गोळी बारामध्ये दोन तरुण हुतात्मा झाले. त्यामध्ये एक चर्मकार समाजाचा होता तर, दुसरा कुंभार समाजाचा होता. ब्रिटीश पोलिसांनी हे आंदोलन, हा सत्याग्रह चिरडून टाकला. तिरंगा उतरविण्यास सुरुवात केली. त्यावेळी भारताचा हा तिरंगा खाली जमिनीवर पडेल. तिरंग्याचा अपमान होईल म्हणून विजेच्या चपळाईने पळत जाऊन तो  तिरंगा झेंडा आपल्या हातात घेऊन तितक्याच चपळतेने ब्रिटिश पोलिसांना चुकूवून  एक मुलगी तेथून निघून गेली आणि तिरंग्याचे रक्षण केले. त्या मुलीचे नाव होते मुक्ताबाई साठे.  मातंग समाजातील ही चौदा पंधरा  वर्षाची मुलगी आणि तिला साथ देणारी मैनाबाई ही धनगर समाजाची मुलगी तसेच आणखी दोन मराठा समाजातील मुली यांनी तिरंग्याचे रक्षण केले आहे. मुक्ताबाई साठे  हिच्या या देश प्रेमाचा लौकीक महाराष्ट्रभर व्हावा आणि अभिमानाने समाजाने तिला सॅल्युट करावा, या भावनेतुन आम्ही तिरंगा यात्रेची सुरुवात बिळाशी मधून केली आहे. 

समारोप सावळज या ठिकाणीच का? 
मित्रहो,
 सावळज हे तासगाव तालुक्यातील महत्त्वाचे गाव आहे.या गावांमध्येही स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये एक ऐतिहासिक आंदोलन झाले होते.1942 मध्ये क्रांती अग्रणी जी. डी.लाड यांच्या नेतृत्वाखाली सावळज येथील पोलीस कचोरीवर प्रचंड मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावर ही ब्रिटिश पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये सावळज मधील मातंग समाजाचा तरुण बाळू माग हा शहीद झाला. परंतु या बाळुमांगाची नोंद इतिहासात कुठेच नाही. यांच्या नावाची चर्चा समाजात आणि बाहेरही कुणी करीत नाही. म्हणूनच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांमध्ये दलित महासंघाच्या वतीने तिरंगा यात्रा काढून सावळजच्या या हुतात्मा बाळू मांगालाही  आदरांजली वाहण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. दलित महासंघ एक स्वाभिमानी आणि वैचारिक संघटना आहे. महाराष्ट्रातील अनेक संघटना जिथे पोहोचू शकत नाहीत... तिथून दलित महासंघाची सुरुवात होत असते. दलित महासंघाचे हेच वेगळेपण आहे. मला असे वाटते की, स्वातंत्र्याच्या या  अमृतमहोत्सवी वर्षांमध्ये तमाम क्रांतिवीरांना आपण सारेच अभिवादन करूया. आणि मन मोठे झाले तर, दलित महासंघाच्या या तिरंगा यात्रेचे ही समर्थन करू या. 
                                               डॉ. मच्छिंद्र सकटे
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆