सांगली, (जि.मा.का.), दि. 26 : राज्यामध्ये कृषी विभागाच्या विविध योजनाअंतर्गत शेतकरी वर्गाला शेतीपयोगी यंत्रे व औजारे तसेच इतर आवश्यक बाबीचा अनुदान तत्वावर लाभ दिला जातो. अनुदान हे केंद्र व राज्य सरकार दोहोंच्या हिस्सेदारीने दिले जाते. लाभ देण्याची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य कृषी विभाग यांचे अधिकृत पोर्टल महाडीबीटी याद्वारे ऑनलाईन पद्धतीने केली जाते. योजनेचा लाभ घेण्याकरिता इच्छुक शेतकऱ्यांनी त्यांना आवश्यक शेतीपयोगी यंत्र व अवजारे व इतर आवश्यक बाबीकरिता पोर्टल वरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे बंधनकारक आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातर्फे प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
अर्ज केल्यानंतर भविष्यात होणाऱ्या सोडतीमध्ये ज्या अर्जदारांचे नाव येईल त्यात ते शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतात. चालू खरीप हंगाम 2025-26 पासून अर्ज व सोडत प्रक्रियेबाबत वरिष्ठ स्तरावरून काही बदल केले गेले आहेत. त्यामध्ये मुख्यत्वे "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य" या तत्वावर निवड झालेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जाईल.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर शेतकरी निवड बाबत सूचना पुढीलप्रमाणे - याबाबत निवड झालेल्या शेतकऱ्यांना लघुसंदेश पाठविण्यात आलेले आहेत. सदर यादी डी.बी.टी. पोर्टल, कृषि विभागाचे संकेतस्थळ तसेच कृषि विभागाच्या क्षेत्रिय अधिकारी यांच्या लॉगईन वर सुद्धा उपलब्ध करण्यात आलेली आहे.
ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे, अशा शेतकऱ्यांनी येत्या 10 दिवसांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावयाची आहे. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना लगेचच पूर्व संमती मिळेल. फार्मर आयडी च्या आधारे लॉग इन केल्यानंतर पुढील माहिती मिळू शकेल. फार्मर आयडी काढला नसल्यास नजीकच्या सी.एस.सी. केंद्राकडून तो काढून घ्यावा. पात्र लाभार्थ्यांकडून येत्या 10 दिवसात कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास तो अर्ज आपोआप रद्द होईल.
कृषी विभागाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य मध्ये समावेश असलेल्या विविध योजना - शेती यांत्रिकीकरण - एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, कृषी यांत्रिकीकरण उप अभियान. सिंचन - मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना - वैयक्तिक शेततळे, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रती थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन घटक), आरकेव्हीवाय शेततळ्याला प्लास्टिक आच्छादन. फलोत्पादन - एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, आरकेव्हीवाय भाजीपाला रोपवाटिका.
हेही पहा --
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰