=====================================
=====================================
आद्य समाजक्रांतीकारक म.फुले
धर्मभेदाचा,जातीभेदाचा धिक्कार करुन समतेचा झेंडा आपल्या बलदंड बाहूनी महाराष्ट्रात फडकविणारे आद्य समाजक्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुले यांची आज १३२ वी पुण्यतिथी आहे.भगवान तथागतानंतर हजारो वर्षे ठप्प झालेले समतेचे चक्र आपल्या बलदंड बाहूनी महात्मा फुल्यांनी पुन्हा गतीमान केले.
म.फुल्यांचा जन्म १८२७ रोजी पुण्यात झाला.त्यांचे आईवडील निरक्षर होते त्यामुळे त्यांची जन्मतारीख निश्चित नाही.फुल्यांचे घराणे माळी समाजातील.म.फुल्यांचे वडील गोविंदराव पुण्याच्या मीठगंज पेठेत राहत होते.जवळच त्यांची जमीन होती.तेथे ते काम करीत होते.अठरापगड जातींचा समाज या परिसरात राहत होतो.म.फुल्यांचे बालपण त्यांच्या समवेत गेले.
त्यांच्या शेजारी राहत असलेल्या गफारबेग मुनशी आणि लिजिटसाहेब या दोन ऊदारमतवादी सज्जनांचा ऊपदेश आणि संस्कार यांचा लाभ त्यांना झाला.हिंदुधर्मातील अमानुष विषमता,नाना प्रकारच्या दुष्ट चालीरीती यांचे ज्ञान त्यांना लहान वयातच झाले.सदाशिव बल्लाळ गोवंडे,मोरो विठ्ठल वाळवेकर,आणि सखाराम यशवंत परांजपे हे तीन ब्राम्हण समाजातील शाळासोबती त्यांचे कायमचे मित्र झाले.त्यांनी प्रचंड वाचन केले.सर्व धर्मग्रंथाचा अभ्यास केला.विशेषतः बायबल व थाॕमस पेनचा "राइटस आॕफ मॕन"हा ग्रंथाने त्यांचे जीवन बदलून केले.ते चिंतनशील झाले,ते बुद्धिप्रामाण्यवादाला शरण गेले.हिंदूधर्मातील विषमतेने ते अस्वस्थ झाले.त्यांचे जीवनध्येय निश्चित झाले.बहुजनसमाजाचा ऊध्दार हा त्यांचा ध्यास झाला.स्त्रीयांची सामाजिक गुलामगिरीतून मुक्तता करणे ही त्यांची जीवननिष्ठा झाली.संपूर्ण समाजपरिवर्तन हे तर या महापुरुषाच्या जगण्याचे प्रयोजन होते.
थाॕपस पेनच्या समतेच्या विचाराने भारावलेल्या तरुण जोतिरावांच्या जीवनात असा एक प्रसंग घडला की त्यामुळे ते चवताळून ऊठले! आपल्या एका ब्राम्हण मित्राच्या लग्नाच्या वरातीत ते ब्राम्हणेतर आहेत म्हणून त्यांचा अपमान केला.हा घाव त्यांच्या जिव्हारी लागला.ते प्रचंड अस्वस्थ झाले.त्यांच्या मनात विचांरांचे काहूर माजले.ते चिंतन करु लागले.समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात एका विशिष्ट जातीचे प्राबल्य का आहे? शूद्र,अति शूद्र शतकानुशतके दारिद्रयात खितपत का पडले आहेत? ते मानसिक गुलामगिरीचे भोग का भोगत आहेत?या प्रश्नाने ते बेचैन झाले. ते भटशाहीविरुध्द त्वेषाने ऊभे राहिले.
मग भटशाहीवर त्यांनी जिवाच्या आकांताने एकामागून एक असे घणाघाती घाव घातले.ज्योतिरावांच्या या प्रचंड घणाघाताने सारे सनातनी हादरुन गेले.आपली गुलामगिरी ही पूर्वजन्माचे प्राक्तन आहे.अशी बहुजनांची भोळी समजुत होती.ती समजूत मूळापासून ऊखडून टाकली पाहिजे या निष्कर्षाला ते आले.परंतु हे शस्त्राने होणार नाही.हे हिंसेने होणार नाही.हे होईल फक्त वैचारिक क्रांतीने हे त्यांनी मनोमन जाणले.आणि म्हणूनच त्यांनी समाजक्रांतीचा झेंडा हाती घेतला.सारा बहूजनसमाज त्यांनी समाजक्रांतीच्या झेंड्याखाली एकत्र आणला.
स्त्रीदास्य,अडाणीपणा,निरक्षरता,अज्ञान,दारिद्रय, अंधश्रद्धा,धर्मभोळेपणा या साऱ्या दुष्टगोष्टीवर त्यांनी बेधडक हल्ला केला. सारे समाजजीवन ढवळून गेले.दीन-दलित,स्त्रीया,ऊपेक्षित समाज यांच्या अंधारलेल्या वाटा या ज्योतीच्या लख्ख प्रकाशाने ऊजळून गेल्या.
ज्योतिरावांनी १८४८ साली पुण्याच्या बुधवार पेठेत भिड्यांच्या वाड्यात मुलींच्यासाठी शाळा स्थापन केली.एका भारतीयांने मुलींच्या शिक्षणासाठी काढलेली ही पहिली शाळा.त्यानंतर त्यांनी वर्षभरात मागास समाजातील मुलांच्यासाठी शाळा ऊघडली.दोन्ही शाळांना शिक्षक मिळत नव्हते.मग सावित्रीबाई पुढे सरसावल्या.सनातन्यांनी त्यांना जाता येता त्रास दिला.शेणाचे गोळे मारले.दगडधोंडे भिरकावले.वाटेत काटे पुरले.पण फुले पती-पत्नी डगमगले नाही.अंगावर टाकलेल्या शेणाच्या गोळ्यांना,भिरकावलेल्या दगडधोंड्यांना,वाटेत टाकलेल्या काट्याना फुलेच समजून ज्योतिराव व सावित्रीबाई फुल्यांनी बहुजन समाजाच्या जीवनात फुले ऊधळली.
त्यावेळी न कळत्या वयात मुलींचे विवाह होत असत.आणि अकाली वैधव्य येत असे.मग अशा दुर्दैवी विधवा अबलांना त्यांचा काहीही दोष नसतांना समाजात ऊघडपणे फिरण्यास मनाई होती.त्यांचे तोंड पाहणे अशुभ मानले जात होते.मग अशा स्त्रिया घरी राबराब काम करुन ऊरलेला वेळ अंधाऱ्या खोलीत नशीबाला दोष देत दिवस कंठीत असत.काही वेळेला तरुण विधवा स्त्रीया नैसर्गिक मोहाच्या आहारी जात असत.अशा स्त्रियांच्या अनौरस बाळांची हत्या होऊ नये म्हणून १८६० साली "बालहत्या-प्रतिबंध गृहाची"स्थापना म.फुल्यांनी केली.आणि अशा दुर्दैवी स्त्रीयांच्या सुईणीचे काम स्वतः सावित्रीबाईंनी केले
१८६८ साली त्यांनी मागासवर्गीय समाजासाठी आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला केला.स्पृश्य-अस्पृश्य भेदाभेद अमंगल मानणाऱ्या सनातनी लोकांनी "धर्म बुडाला"अशी बोंब ठोकली.म.फुल्यांनी त्याची पर्वा केली नाही.आपल्या समाजक्रांतीला स्थैर्य मिळावे व माणूस व देव यांच्यातील दलाल नष्ट व्हावेत म्हणून २४ सप्टेंबर १८७३ साली म.फुल्यांनी "सत्यशोधक समाजाची"स्थापना केली.त्यांनी जशा अशा संस्था स्थापून समाज जागृती केली.तसे आपल्या परखड आणि क्रांतिकारक शब्दांत त्यांनी ब्राम्हण्यावर "आसूड"ओढले.बहुजनसमाजाचीही कडक शब्दांत कानऊघडणी करण्यास मागेपुढे पाहिले नाही.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्यापासून ते सार्वजनिक सत्यधर्म पर्यंत त्यांनी खूप गद्य-पद्य लेखन केले."विद्येविना गती नाही"हे निरक्षर समाजाला त्यांनी अखेरपर्यंत कळवळून सांगितले.
आज त्यांना जाऊन १३२ वर्षे झालेली आहेत.तरी त्यांच्या विचारांची गरज संपलेली नाही.अंधश्रध्दा,देवपुजा,नवससायास यांची गुंगी ऊतरलेली नाही.देवळासमोरच्या रांगाची लांबी वाढू लागली आहे.बुवांची-बाबांची घाऊक बाजारपेठ गजबजलेली आहे.सुटाबुटातील स्त्री-पुरुष ( हो स्त्री सुध्दा ) सत्यनारायणाच्या पुजेला बसत आहेत.तीच साधू वाण्याची भाकड कथा श्रध्येने श्रवण करत आहेत.नवीन घेतलेल्या कारची,काॕम्प्युटरची हळदी कूंकू लावून पूजा केली जात आहे.दर आमावस्येला नारळ फोडला जात आहे.म.फुल्यांच्या विचारांची गरज अधिक वाटू लागली आहे.शुक्रवार दि.२८ नोव्हेंबर १८९० रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.आज त्यांचा १३२वा स्मृतीदिन आहे.महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या शब्दांत त्यांना माझे शतशः वंदन.
सत्याचा पालनवाला |
हा धन्य जोतिबा झाला |
पतितांचा पालनवाला |
हा धन्य महात्मा झाला |
प्राचार्य बी .एस ,जाधव
बांबवडे ता पलूस जि सांगली
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆