BANNER

The Janshakti News

मका पिकावरील लष्करी अळी व्यवस्थापनासाठी बीज प्रक्रिया महत्वाची - डॉ. डी. बी. उंदिरवाडे
सांगली  दि. 13 (जि.मा.का.) : मागील काही हंगामापासून मका पिकावर फॉल आर्मीवर्म या लष्करी अळीचा प्रादुर्भाव होत आहे. मका पिकाची पेरणी ही बीज प्रक्रिया करूनच केल्यास सुरूवातीपासूनच या किडीच्या प्रादुर्भावास अटकाव करता येईल व याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. शेतकऱ्यांनी  बीज प्रक्रिया करून व शेताचे नियमित सर्वेक्षण करून या किडीचा बंदोबस्त करावा, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र  विभागाचे विभाग प्रमुख डॉ. डी. बी. उंदिरवाडे यांनी केले असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी कळविले आहे.


मका पिकावरील किडीचे व्यवस्थापना स्वच्छता मोहिम राबवावी व शिफारशीच्या मात्रेच खत द्यावे, नत्र खताचा अतिरीक्त वापर करू नये. लवकर पक्व होणाऱ्या वाणाची निवड करून लवकर पेरणी करावी व याचा गाव किंवा विभागीय पातळीवर अवलंब करावा. मका बियाण्यास सायंट्रेनिलीप्रोल 19.8 + थायोमेथोक्झाम 19.8 टक्के एफएस 2.38  मिली प्रति किलो या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत एकरी 20 या प्रमाणे पक्षी थांबे उभारावे (30 दिवसापर्यंत). मका +उडीद/मूग/तूर आंतर पीक घ्यावे. मका पिका सभोवताल सापळा पीक म्हणून हायब्रीड नेपीयरच्या 3 ते 4 ओळी पेराव्या व त्यावर प्रादूर्भाव दिसताच शिफारशीनुसार कीटकनाशकाची फवारणी करावी. पतंगाची संख्या 3 पतंग / कामगंध सापळा या प्रमाणात आढळताच ट्रायकोग्रामा प्रेटीओसम, टेलेमोनस रेमंस या परोपजीवी किटकांचे दर आठवड्याने एकरी 50 हजार अंडी याप्रमाणे शेतात सोडावे. त्यानंतर 3 ते 4 दिवसापर्यंत रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करू नये. पिकाच्या सुरूवातीच्या अवस्थेत पानावरील समुहात दिलेली अंडी किंवा अळ्यांचा समुह असलेली प्रादूर्भाव ग्रस्तपाने (पांढरे चट्टे असलेली) अंडी / अळ्यांसहीत नष्ट करावी. प्रादूर्भाव दिसताच प्रादूर्भावग्रस्त पोंग्यामधे सुकलेली वाळू टाकावी. पतंग मोठ्या प्रमाणावर नष्ट करण्यासाठी कामगंध सापळ्यांचा एकरी पंधरा या प्रमाणे वापर करावा. सापळे पिकाच्या घेराच्या उंचीबरोबर प्राधान्याने सुरूवातीच्या पोंगे अवस्थेत लावावे. उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांनी या अळीचा प्रादुर्भाव सुरू होतो. सुरवातीस पानातील हरीत लवक खावून पानावर पांढरे लांबट पट्टे/ रेषा किंवा ठिपके दिसतात त्याच वेळी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी.

बॅसीलस थूरीजीअसीस व कुर्सटाकी 20 ग्रॅम / 10 ली. पाणी किंवा 400 गॅम / एकर या प्रमाणे फवारणी करावी. अंड्याची उबवण क्षमता कमी करण्यासाठी व सुक्ष्म अळ्यांच्या नियंत्रणासाठी 5 टक्के प्रादुर्भाव असल्यास 5 टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरेक्टीन 1500 पीपीएम, 50 मिली प्रति 10 लिटर या प्रमाणे फवारावे.

रोपे ते सुरूवातीची पोंगे अवस्था (उगवणी नंतर 3 ते 4 आठवड्यांनी) : 5 टक्के प्रादुर्भाव ग्रस्त झाडे आढळल्यास फवारणी करावी. मध्यम उशिरा पोंगे अवस्था (उगवणी नंतर 5 ते 7 आठवड्यांनी) : मध्यम पोंगे अवस्थेमध्ये 10 टक्के पोंगयामध्ये प्रादुर्भाव तर उशिरा पोंगे अवस्थेमध्ये 20 टक्के पोंग्यामध्ये प्रादुर्भाव आढळल्यास फवारणी करावी. गोंडा ते रेशीम अवस्था (उगवणी नंतर 8 आठवड्यांनी) : फवारणीची गरज नाही परंतु 10 टक्के कणसामधे प्रादुर्भाव आढळल्यास फवारणी करावी.

ज्या शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया केली नसल्यास त्यांनी या किडीला व्यवस्थापनाकरीता उगवणीनंतर 12 ते 15 दिवसांनी फवारणीसाठी क्लोरॅन्ट्रनिलीप्रोल 9.3 टक्के प्रवाही + ल्यँब्डा सायहेलोथ्रिन 4.6 टक्के झेडसी प्रवाही 5 मिली किंवा स्पिनेटोराम 11.7 टक्के एससी प्रवाही, 5.12 मिली किंवा क्लोरॅन्ट्रनिलीप्रोल 18.5 टक्के प्रवाही एससी, 4.32 मि.ली. किंवा इमामेक्टीन बेंन्झोएट 5 टक्के एसजी, 8 ग्रॅम किंवा इमामेक्टीन बेंझोएट 5 टक्के + ल्युफेनुरॉन 40 टक्के डब्ल्युजी, 1.6 ग्रॅम किंवा थायोडिकार्ब 75 टक्के डब्ल्युजी, 20 ग्रॅम किंवा नोव्हाल्युरॉन 5.25 टक्के + इमामेक्टीन बेंन्झोएट 0.9 टक्के प्रवाही एससी, 30 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. चाऱ्यासाठी घेतलेल्या मका पिकावर कुठल्याही प्रकारच्या रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करू नये. त्याऐवजी जैविक कीटकनाशकाचा वापर करावा.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖